माझ्या आयुष्यातील ती भाग १

Story Of Pradnya

माझ्या आयुष्यातील ती भाग १


"प्रज्ञा आज इतक्या लवकर का चालली आहेस?" घड्याळात वेळ बघता बघता निलमने विचारले.


"अग आज २५ ऑगस्ट आहे ना, म्हणून लवकर चाललेय." प्रज्ञाने पर्समध्ये शोधाशोध करत सांगितले.


निलम तिच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाली,

"तू पर्समध्ये काय शोधत आहेस? आणि २५ ऑगस्टला विशेष असं काय असतं?"


"अग गाडीची चावी शोधत आहे. पर्समध्ये इतकं सामान आहे की, त्यात चावी सापडतचं नाहीये." प्रज्ञाने सांगितले.


"तुझ्या बर्थडेला मी एक डझन कीचेन गिफ्ट देते, म्हणजे तुला चाव्या लवकर सापडत जातील. तुझं हे रुटीन झालंय. एवढीशी चावी ह्या एवढ्या मोठया पर्समध्ये कशी सापडेल? त्यात इतकं काही सामान त्यात भरुन आणतेस. पर्सच्या छोट्या कप्प्यात चावी ठेवायला काय होतं काय माहीत." निलम चिडून म्हणाली.


"निलम माते कृपया आपण आपलं तत्वज्ञान आपल्याकडेचं ठेवा, कारण मला चावी सापडली आहे." आपल्या हातातील चावी दाखवत प्रज्ञा म्हणाली.


प्रज्ञाचं बोलणं ऐकल्यावर निलमच्या चेहऱ्यावर हसू आलं. निलम पुढे काही बोलणार तेवढ्यात प्रोजेक्ट हेड राखी तेथे येऊन म्हणाली,

"प्रज्ञा तू कुठे निघाली आहेस? आणि कोणाला विचारुन?"


"मॅम मी मागच्या महिन्यातच आजच्या हाफडे साठीचा अर्ज दिला होता आणि तो अपृव्ह पण झालेला आहे." प्रज्ञाने तोऱ्यात सांगितले.


यावर राखी म्हणाली,

"प्रज्ञा त्यावेळी आपला प्रोजेक्ट सुरु झाला नव्हता, त्यामुळे तुला सुट्टी मिळाली असेल, पण आज आपली अतिशय महत्त्वाची मिटिंग आहे. तुला त्या मिटिंगसाठी थांबावं लागेल."


"मला थांबता येणार नाही." प्रज्ञाने स्पष्टपणे सांगितले.


"प्रज्ञा मी तुला विचारत नाहीये, तर सांगत आहे." राखी आपल्या केबिनकडे जात म्हणाली.


"मॅम एक मिनिटं, तुम्ही काही म्हणाल्या तरी मी थांबणार नाहीये. माझं खूप महत्त्वाचं काम आहे आणि मी जाणारचं." प्रज्ञाने राखीला आवाज देऊन थांबवले.


राखीने जागीच यू टर्न घेऊन प्रज्ञाकडे बघितले. राखीचे डोळे रागाने लालबुंद झालेले होते. ती किती चिडली आहे, याचा अंदाज तिच्या चेहऱ्यावरुन येत होता. प्रज्ञा जोरात बोलल्याने ऑफिसमधील सर्वजण त्यांच्याकडे बघायला लागले होते. राखीच्या रागीट स्वभावाची ऑफिसमधील सर्वांना चांगलीच कल्पना होती. 

'ही प्रज्ञा पण ना कोणाशीही पंगा घेत बसते. आता ही हिटलर राखी प्रज्ञाला एवढ्या सहजासहजी काही सोडणार नाही.' निलम मनातल्या मनात म्हणाली.


राखी डोक्यावर आठ्या आणून डोळे विस्फारुन अतिशय चिडक्या स्वरात म्हणाली,

"तू स्वतःला काय समजतेस? तू माझी ज्युनिअर आहेस. आपल्या ऑफिसमधील सिनिअर स्टाफसोबत कसं बोलावं, एवढेही मॅनर्स नाहीयेत का? तुम्हाला प्रोजेक्ट वर्क म्हणजे एवढं साधं वाटतं का? मनाला येईल तसं वागायला हे तुमचं घर नाहीये. तू काय म्हणाली होतीस, तू थांबणार नाहीयेस ना. मग गेट लॉस्ट फ्रॉम दिस ऑफिस. तुला जर मिटिंगसाठी थांबता येणार नसेल तर पुन्हा इथे आली नाहीस तरी चालेल. तुझ्यासारखे छपन्न एम्प्लॉइज आम्हाला मिळतील."


राखीचं बोलून झाल्यावर त्याच वरच्या सुरात प्रज्ञा म्हणाली,

"एक्सक्यूज मी मॅम. तुमचं सर्वजण शांतपणे ऐकून घेतात म्हटल्यावर तुम्ही जास्तचं बोलत आहात. पहिली गोष्ट हे ऑफिस तुमच्या किंवा तुमच्या पिताश्रींच्या मालकीचे नाहीये, त्यामुळे तुम्ही मला नोकरीवरुन काढू शकत नाही. ह्या ऑफिसमधील प्रोजेक्ट जे वेळेत पूर्ण होतात ना, ते आमच्या सारख्या मेहनती एम्प्लॉईजमुळेचं. तुमच्यासारखी व्यक्ती जर ह्या ऑफिसमध्ये काम करत असेल, तर मलाचं ह्या ऑफिसमध्ये काम करायचं नाहीये. माझ्यासारखे छपन्न एम्प्लॉईज शोधूनचं दाखवा."


राखी अजून पुढे काही बोलणार इतक्यात मेहता सर तिथे येऊन म्हणाले,

"तुम्ही शाळेत आहात का? एवढ्या मोठ्याने कोणी बोलतं का? प्रज्ञा तुझा आज हाफडे आहे ना, मग तू इथे का थांबली आहेस? तू जाऊ शकतेस. राखी पुढील पाच मिनिटांत मला माझ्या केबिनमध्ये येऊन भेट. इथं काही मूव्ही चालू नाहीये, सो बाकीच्यांनी आपापल्या कामाला लागा."


एवढं बोलून मेहता सर त्यांच्या केबिनमध्ये निघून गेले. राखी रागात पाय आपटत सरांच्या पाठोपाठ त्यांच्या केबिनच्या दिशेने गेली. निलम प्रज्ञाकडे आश्चर्याने बघत होती.


"तुला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, ते उत्तर ऐकण्यासाठी आज रात्री माझ्या घरी ये. मग आपण निवांत बोलू." प्रज्ञा जाता जाता हळूच निलमच्या कानात सांगून गेली.


आता ही प्रज्ञा कोण? आणि ती कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी जाणार होती? हे बघूया पुढील भागात…


©®Dr Supriya Dighe










🎭 Series Post

View all