माझ्या आयुष्यातील ती भाग ७

Question Arise In Pradnya's Mind.

माझ्या आयुष्यातील ती भाग ७


मागील भागाचा सारांश: प्रज्ञाला जेवण करताना कारल्याची भाजी न आवडल्याने ती जास्त जेवली नाही. वॉक करण्याच्या निमित्ताने प्रेरणा प्रज्ञाला खाली घेऊन गेली व चायनिज खाण्यासाठी हॉटेलमध्ये घेऊन गेली. प्रेरणाच्या अश्या वागण्याने प्रज्ञा सरप्राईज झाली होती. 


आता बघूया पुढे….


चहा, नाश्ता झाल्यावर घरात बसून करायचे तरी काय? हा प्रश्न मला पडला होता. प्रेरणा घरात नव्हती, ती परत कधी येणार हेही ठाऊक नसल्याने मला काहीच सुचत नव्हतं. शेवटी विचार करुन मावशींजवळ निरोप ठेऊन मी लायब्ररी शोधण्यासाठी घराबाहेर पडले. 


लायब्ररीचा पत्ता शोधत शोधत मी लायब्ररीत पोहोचले. इतकी मोठी लायब्ररी बघून मी शॉक झाले होते. सुरवातीला मी गोंधळले होते, मग तेथील रिसेप्शन वर चौकशी केल्यावर मेम्बरशीप घेण्याची प्रोसिजर मला कळली. मी काही क्षणांचा अवधी न घेता मेम्बरशीप घेऊन टाकली. 


पुढील काही वेळ पुस्तकं बघितली. आज कोणतं पुस्तक वाचायचं हा विचार करुन एक पुस्तक निवडलं आणि तिथेच एका खुर्चीत बसून पुस्तक वाचायला सुरुवात केली. लायब्ररीत कॅन्टीनही होते म्हणजे भूक लागली तरी काही टेन्शन नव्हते. मी एकदा वाचायला सुरुवात केली की, मला वेळेचे भान उरत नव्हते. जवळपास अर्धे पुस्तक वाचून झाल्यावर घड्याळात बघितले, तर बराच उशीर झाला होता. मी ते पुस्तक घेऊन घरी आले, तर गीता ताई हॉलमध्ये बसलेल्या होत्या.


मला वाटलं होतं की, ह्या मला रागावतील, पण झालं उलटंच. मला बघून त्या म्हणाल्या,

"तू लायब्ररीत रमशील हे मला ठाऊकचं होतं. काही खाल्लं नसशील तर जेवण करुन घे. मावशी तुला जेवण गरम करुन वाढतील. उद्या पासून हवंतर डबा घेऊन जात जा. रुममध्ये जास्त गडबड करु नकोस. प्रेरणा झोपली आहे, तिला झोपूदेत, तिला बरं नाहीये."


मी रुममध्ये जाऊन पुस्तक ठेवलं तर प्रेरणा खरंच ब्लॅंकेट घेऊन झोपलेली होती.प्रेरणाचा चेहरा सुकलेला होता. कालपर्यंत तर प्रेरणा ठीक होती, मग आज अचानक हिला एवढं काय झालं असेल? हा प्रश्न मला पडला होता. मी फ्रेश झाले व जेवण करण्यासाठी डायनिंग टेबलवर जाऊन बसले. जेवणात वरणभात असल्याने जेवणावर मस्त ताव मारला. पोटभर जेवण झाल्यावर झोप यायला लागली होती. पुस्तक वाचता वाचता मी झोपून गेले होते. 


संध्याकाळी मी झोपेतून उठले तेव्हाही प्रेरणा झोपलेली होती. गीता ताई रुममध्ये आल्या होत्या, त्यांनी तिला हळूच उठवून पाणी पाजलं. प्रेरणाच्या अंगात अजिबात त्राण राहिलेले नव्हते. 


त्याचवेळी बाबांचा आवाज आल्यावर मी हॉलमध्ये गेले, तेव्हा बाबांनी मला तयार होऊन यायला सांगितलं. बाबा मला त्यांच्या मित्राकडे घेऊन जाणार होते. मला प्रेरणा सोबत बोलायचे होते, पण गीता ताईंनी मला तिच्याशी बोलू दिले नाही. बाबांनी सोबत मला कपडेही घ्यायला लावले होते.


बाबांना प्रश्न विचारण्याची मुभाचं नव्हती. काही वेळाने मी व बाबा त्यांच्या मित्राच्या घरी जायला निघालो, तेव्हा वाटेत समुद्र दिसला. बाबांनी गाडी थांबवून मला समुद्र दाखवला. बाबा पहिल्यांदा मला काहीतरी माहिती देत होते, तिथे एक वडापाववाला दिसल्यावर बाबांनी मला वडापाव घेऊन दिला. माझे बाबा इतकेही वाईट नाहीये, असं त्यावेळी मला जाणवलं. 


मी न सांगता त्यांनी मला समुद्र दाखवण्यासाठी गाडी थांबवली आणि वडापावही घेऊन दिला. मग आम्ही बाबांच्या मित्राकडे गेलो. बाबांच्या मित्राची मुलगी निशा माझ्याचं वयाची होती. ती मला लगेच तिच्या रुममध्ये घेऊन गेली. निशा व मी एकदम सारख्या होतो हे लगेच माझ्या लक्षात आले होते. आम्ही दोघींनी रात्रभर खूप गप्पा मारल्या.


दुसऱ्या दिवशी सकाळी निशाने बाबांना आग्रह केल्याने बाबा मला तेथे ठेवून निघून गेले. निशा मला मुंबई फिरवणार होती. खरंतर त्यावेळी प्रेरणा आमच्या सोबत असावी असं सारखं वाटत होतं.


निशा सोबत मुंबई फिरताना मजा येईल, म्हणून मीही नाही म्हटले नाही. पण त्यावेळी प्रेरणाचा निस्तेज चेहरा मला राहून राहून आठवत होता. निशा व माझी चांगलीच गट्टी जमली होती. आम्ही दोघींनी सोबत खूप मज्जा केली. मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन मूव्ही बघितला. लोकलमध्ये बसलो. मुंबईतील सगळ्या फेमस जागा तिने मला दाखवल्या. मी निशाकडे चार ते पाच दिवस होते.


बाबा घ्यायला आल्यावर मी आमच्या घरी परत आले. प्रेरणाला भेटण्यासाठी मी घाईघाईने रुममध्ये गेले तर ती एकदम मस्त होती.


"प्रेरणा तू कशी आहेस? तुला बरं वाटतंय ना?" मी काळजीने विचारले.


"मी तर मस्त आहे. तू माझ्या सोबत मुंबई बघणार होतीस ना. नवीन मैत्रीण भेटल्यावर माझी तुला आठवणही आली नाही ना?"प्रेरणा लटक्या रागात म्हणाली.


"अग बाबांनी अचानक प्लॅन केला. मला तर काहीच माहीत नव्हते. तू आमच्या सोबत असावीस असं मला वाटत होतं." मी सांगितले.


"माझ्या तोंडापुरतं गोड बोलण्याची काही गरज नाहीये." प्रेरणा म्हणाली.


"प्रेरणा तुला त्या दिवशी काय झाले होते? तू गीता ताईंबरोबर कुठे गेली होती?" मी विचारले.


"प्रज्ञा या प्रश्नांची उत्तरं मी वेळ आल्यावर देईल. तू जे लायब्ररीतून पुस्तक आणलं होतं, ते मी वाचलं. छान पुस्तक आहे. लायब्ररीत जाताना मला सांग. आपण दोघी जाऊयात." प्रेरणाने माझ्या प्रश्नाचं उत्तर देणे टाळलं होतं.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all