माझ्या आयुष्यातील ती भाग १०

Story Of Pradnya And Prerna

माझ्या आयुष्यातील ती भाग १०


मागील भागाचा सारांश: प्रेरणा व गीता ताई हॉस्पिटल मधून परतल्या होत्या. प्रेरणाची अवस्था बघून प्रज्ञाला खूप वाईट वाटले होते. प्रेरणाच्या या अवस्थेला प्रज्ञाच्या बाबांनी तिला जबाबदार धरले होते. प्रज्ञाचे बाबा प्रज्ञाला घेऊन गावी निघून गेले. प्रज्ञाला प्रेरणा सोबत बोलताही आले नव्हते. साधारणपणे एका वर्षाने प्रेरणाला प्रज्ञाचे बाबा गावाला घेऊन आले, तेव्हा प्रज्ञा व प्रेरणाची पुन्हा भेट झाली.


आता बघूया पुढे….


प्रेरणाने अचानक एवढे प्रश्न विचारल्यावर प्रज्ञाचा चेहऱ्यावरील रंगच बदलला होता. प्रज्ञाच्या डोळयात पाणी आले होते.


"मी काही चुकीचं विचारलं का?" प्रज्ञाच्या डोळ्यातील पाणी बघून प्रेरणाने विचारले.


यावर प्रज्ञा म्हणाली,

"नाही ग, पण आजवर कोणी माझी अशी चौकशी केलीच नव्हती. मी एकटी का राहते? माझ्या बाबांसोबत माझं एवढं पटत का नाही? मला मैत्रिणी आहेत का? हे प्रश्न आजवर कोणालाच पडले नाहीत. निदान माझ्या बाबांना तरी हे प्रश्न पडायला पाहिजे होते ना?


प्रेरणा तू या जगातील पहिली व्यक्ती आहेस, ज्या व्यक्तीला माझ्या पोटातील भूक डोळ्यातून समजली. तुला मला हे प्रश्न विचारावेसे वाटले.


प्रेरणा मला खरंच फार काही मैत्रिणी नाहीयेत. जिवलग मैत्रीण म्हणावी अशी कोणीच नाहीये. माझ्या आजोबांना व माझ्या बाबांना एक वेगळाच मान आहे. एका मोठया घरातील मुलीसोबत गावातील सामान्य घरातील मुली मैत्री करताना विचार करतात. शिवाय बाबांना मी कोणत्याही मुलीच्या घरी खेळायला गेलेलं आवडत नव्हते. 


शाळेत असताना माझी एक बेंच पार्टनर होती, तिच्या डब्यातील भाजी मला खूप आवडायची, म्हणून एकदा मी तिच्या घरी जेवायला गेले होते. तिच्या घरचं हसत खेळत वातावरण बघून मला त्या सगळ्याचा हेवा वाटला आणि आपल्याकडे असं काही होत नाही, याच वाईटही वाटलं. मी मैत्रिणीकडे जेवायला गेल्याचं कळल्यावर बाबा मला खूप ओरडले होते आणि वरुन पुन्हा कधीच कोणाकडे जेवायला जायचं नाही म्हणून सक्त ताकीद दिली होती.


मैत्रिणी जेव्हा त्यांच्या आई बाबा, बहीण, भावांबद्दल सांगायच्या तेव्हा खूप वाईट वाटायचं, पण कालांतराने या सगळयाची सवय करुन घेतली. आपल्यावर प्रेम करणारं, आपली काळजी घेणारं आपल्या आयुष्यात कोणीच येणार नाही, हे मनोमन मी स्विकारलं होतं.


बाबा एकतर घरी कधी नसायचेच, पण असले तरी माझ्याशी कधी प्रेमाने बोललेच नाही. माझी पुस्तकं हेच माझे सर्वस्व होऊन बसले. दहावीच्या सुट्ट्या लागल्या, तेव्हा बाबा स्वतः मला मुंबईला घेऊन आले होते. बाबांबरोबर फिरता येईल या आशेने मला आनंद झाला होता, पण तिकडे आल्यावर सुद्धा बाबा त्यांच्या कामात गुंग होते.


ऊसाचा रस पिण्याचा हट्ट तू केलास, त्यामुळे तुला त्रास झाला. आता या सगळ्यात माझा काय दोष होता? एकतर तुला नेमकं काय झालं होतं? असं का होतं? या प्रश्नांची उत्तरे मला कोणीच दिली नाहीत. तू माझ्या बाबांना बाबा म्हणतेस, पण तुझं आणि त्यांचं नातं काय? हेही मला माहित नाही.


या जगात कोणालाच मला काही सांगावं वाटत नाही. आता मी तुला गावात फिरायला घेऊन गेले असते, तर गावातील बायकांनी तू कोण? हा प्रश्न विचारला असता, तर त्याचे उत्तर मी काय दिले असते? 


एकतर आधीच गावात अशी चर्चा आहे की, बाबांनी दुसरं लग्न केलं असेल आणि त्यांची बायको शहरात राहत असेल, म्हणून ते तिकडेच असतात. काहीजण तर अशीही चर्चा करतात की, बाबा बाहेरख्याली आहेत म्हणून.


कसेही असले तरी ते माझे बाबा आहेत यार. मी त्यांच्या बद्दल असं कशी ऐकून घेऊ. आता हे मी बाबांसोबत बोलुही शकत नाही, कारण त्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. 


प्रेरणा मला ना आईचं प्रेम मिळालं, नाही बाबांचं. तू त्या दिवशी गीता ताईंसोबत खोटं बोलून मला चायनिज खायला घेऊन गेली होती, तेव्हा माझं तुझ्यासोबत जुळू शकतं असं वाटत होतं, पण तेही मला कोणीच जुळवू दिलं नाही. 


आज पहिल्यांदा कोणालातरी बघून मला आनंद झाला. मी माझं मन मोकळंही तुझ्याकडेच करते आहे. माणसांना भावना असतात, हे मला आजवर कधीच कळलं नाही. माझ्यासोबत कोणीच भावनाशील होऊन बघितलं नाही."


प्रज्ञाच्या डोळयात आलेलं पाणी प्रेरणाने पुसलं आणि प्रज्ञाने प्रेरणाला घट्ट मिठी मारली. प्रज्ञाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरु होत्या आणि प्रेरणानेही तिला थांबवलं नाही. प्रज्ञाचं रडून झाल्यावर प्रेरणा म्हणाली,


"प्रज्ञा आता आपण घरी जाऊयात का? अंधार होत आहे."


मग प्रज्ञा आणि प्रेरणा दोघीजणी घराकडे निघाल्या.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all