माझ्या आयुष्यातील ती भाग ८

Story Of Prerana And Pradnya

माझ्या आयुष्यातील ती भाग ८


मागील भागाचा सारांश: प्रेरणा घरात नसल्याने प्रज्ञा लायब्ररीत गेली होती. लायब्ररी हे तिचं आवडतं ठिकाण असल्याने प्रज्ञा तिथे बऱ्याच वेळ रमली होती. प्रेरणा हॉस्पिटल मधून आल्याचे प्रज्ञाला समजले. प्रज्ञाला तिचे बाबा त्यांच्या मित्राकडे घेऊन गेले, तिथे निशा व तिची गट्टी जमल्याने पुढील चार ते पाच दिवस प्रज्ञा तिथेच थांबली.


आता बघूया पुढे…


मी लायब्ररीत जाताना प्रेरणाला सोबत घेऊन गेले होती. एवढी मोठी लायब्ररी बघून प्रेरणा सुद्धा शॉक झाली होती.


"तू इथे पहिल्यांदाचं आली आहेस का?" मी तिच्या एकंदरीत हावभावावरुन विचारले.


"गीता ताई व बाबा मला एकटीला कुठेच जाऊ देत नाहीत." प्रेरणाने उत्तर दिले.


"आता तुला मी यामागील कारण विचारले तर, तू सांगशील की, माहीत नाही किंवा वेळ आल्यावर या प्रश्नाचे उत्तर देईल." मी एवढं बोलून पुस्तक शोधायला निघून गेले.


प्रेरणाने तिच्या आवडीचं एक पुस्तक घेतलं. आम्ही दोघीजणी आपापलं आवडतं पुस्तक घेऊन वाचत बसलो. मला कॉफी पिण्याची इच्छा झाल्याने मी प्रेरणाला विचारले,

"प्रेरणा तुला काही हवंय का? मी कॉफी घ्यायला चालले आहे."


"नाही नको. मला बाहेरचं काहीच पचत नाही." प्रेरणाने सांगितले.


मी प्रेरणाला त्यामागील कारण विचारले नाही. कॉफी पिऊन झाल्यावर आम्ही दोघी लायब्ररीतून बाहेर पडलो. आम्ही रस्त्याने जात असताना प्रेरणा अचानक मला म्हणाली,

"प्रज्ञा मला तुझी मदत हवी आहे. करशील का?"


"माझी तुला कसली मदत हवी आहे?" मी विचारले.


"मला बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहेत, पण गीता ताई व बाबा मला एकटीला पाठवत नाहीत. तू माझ्या सोबत येशील का?" प्रेरणाने म्हणाली.


"हो येईल ना, पण कुठे आणि का?" मी प्रश्न विचारला.


"मी माझी एक बकेट लिस्ट बनवली आहे, त्या सर्व इच्छा मला पूर्ण करायच्या आहेत. घरी गेल्यावर तुला मी दाखवते." प्रेरणाने सांगितले.


मी मान हलवून होकार दर्शवला, पण माझ्या मनात एकाच वेळी अनेक प्रश्न निर्माण होत होते. प्रेरणाचे एकंदरीत वर्तन मला संशयास्पद वाटत होते, तिच्या बोलण्याचा, वागण्याचा हेतू मला समजत नव्हता. 


घरी गेल्यावर प्रेरणाने मला तिची बकेट लिस्ट दाखवली. मी बकेट लिस्ट वाचल्यावर म्हणाले,

"प्रेरणा तुला थिएटर मध्ये जाऊन मूव्ही बघायचा आहे ना, ही इच्छा तर आपण अगदी उद्या सकाळीचं पूर्ण करु शकतो." 


यावर प्रेरणा म्हणाली,

"हो चालेल. मी कधी मूव्ही बघायला गेले नाहीये ना. मला मॉलमध्येही जायचं आहे. मी गीता ताईला सांगून येते. उद्या जाताना डबा घेऊन जावा लागेल."


"प्रेरणा थिएटर मध्ये बाहेरचं फूड अलाऊड नसतं. हवंतर तू घरातून पोटभर जेवण करुन निघ." मी वैतागून म्हणाले.


दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघी मूव्ही बघायला गेलो. प्रेरणा थिएटर मध्ये पहिल्यांदा मूव्ही बघायला आली होती, ती थिएटर कडे खूपच कुतूहलाने बघत होती. प्रेरणाच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मला आश्चर्य वाटलं होतं. 


इंटरव्हल मध्ये मी कोक व पॉपकॉर्न घेऊन आले. मी प्रेरणाला आग्रह केला, म्हणून तिने पॉपकॉर्न खाल्ले. पॉपकॉर्न खाल्ल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आले होते. मूव्ही सुरु झाल्यावर मी तिला त्याचे कारण विचारले नाही. प्रेरणाने जास्त पॉपकॉर्न खाल्ले नाही. मला हा प्रश्न पडला होता की, हिला पॉपकॉर्न आवडले असून सुद्धा हिने फक्त टेस्ट केले, असे का?


मूव्ही संपल्यावर आम्ही दोघी मॉलमध्ये फिरत होतो. मी दोन तीन टॉप विकत घेतले. प्रेरणा फक्त टॉपला हात लावून आनंद घेत होती. मीच शेवटी तिला न सांगता तिच्यासाठी दोन टॉप घेतले. मला खरंतर मॉलमध्ये फिरण्याचा कंटाळा आला होता,पण प्रेरणाच्या चेहऱ्यावरील आनंद व तिची इच्छा बघून आम्ही पुढील बराच वेळ मॉलमध्ये फिरलो.


मॉलच्या बाहेर पडून रिक्षाची आम्ही वाट बघत असताना प्रेरणाचे लक्ष एका रसाच्या गुऱ्हाळाकडे गेले, ती मला म्हणाली,

"प्रज्ञा आपण ऊसाचा रस पिऊयात का? पण तू कोणालाही हे सांगणार नाहीस." 


मग आम्ही दोघी ऊसाचा रस प्यायला तिकडे गेलो. ऊसाचा रस पिताना प्रेरणाच्या चेहऱ्यावरील हावभाव असे होते की, जसे वाळवंटात फिरणाऱ्या माणसाला पाणी मिळाल्यावर होणारा आनंद असेल.


रिक्षा मिळाल्यावर आम्ही घरी आलो. घरात प्रवेश करण्याआधीच प्रेरणाला शिंका यायला लागल्या होत्या. शिंका ऐकून गीता ताईंनी मला विचारले,

"प्रज्ञा ही काही थंड प्यायली होती का?"


मी मानेनेच नकार दर्शवला. प्रेरणाच्या शिंका थांबत नसल्याने गीता ताईंनी डॉक्टरांना फोन केला, तर डॉक्टरांनी प्रेरणाला ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन यायला सांगितलं. गीता ताई तिला तश्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. मला तर काहीच कळत नव्हतं.


माझ्या मनातील प्रश्न अजून वाढतचं होते. 


क्रमशः


©®Dr Supriya Dighe






🎭 Series Post

View all