माझ्या आयुष्यातील ती भाग ४

Her Name Is Prerna

माझ्या आयुष्यातील ती भाग ४


मागील भागाचा सारांश: २५ ऑगस्टला प्रज्ञाच्या आयुष्यातील स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस असतो आणि तो साजरा करण्यासाठी तिने ऑफिस मधून हाफ डे घेतला होता. तसेच तिच्या वाढदिवसासाठी तिने जर्मनीला जाण्याची ऑफर नाकारली होती.


आता बघूया पुढे….


प्रज्ञा बोलत होती,

"निलम माझे आजोबा गावातील नावाजलेली हस्थी होती. गावातील सगळेजण आजोबांना खूप घाबरायचे. गावातील कोणाचंही भांडण झालं की, ते आजोबांकडे यायचे. आजोबा दोघांची बाजू ऐकून घ्यायचे आणि त्यांना जे योग्य वाटेल तो निर्णय ते द्यायचे.


माझ्या आजोबांपुढे बोलण्याची कोणातच हिंमत नव्हती. आजोबा एकटेच होते, त्यांना भाऊ बहीण नव्हते. आजोबांकडे तेव्हा जवळपास शंभर एकर जमीन होती. त्यातील पन्नास एकर जमीन शाळा, कॉलेज, दवाखाना, मंदिर यासाठी त्यांनी दान केली होती. आजोबा दानशूर होते. आमच्या गावाची जी काही प्रगती झाली ती आजोबांमुळेचं. 


माझ्या बाबांचा जन्म झाला आणि माझी आजी देवाघरी गेली. दुसरं लग्न करा म्हणून आजोबांना खूप लोकांनी सुचवलं, पण आजोबांनी दुसरं लग्न केलं नाही. आमच्या घरात आजोबांमुळे लोकांचं सतत येणं जाणं सुरु असायचं. 


माझ्या बाबांनी वकील व्हावं अशी आजोबांची इच्छा होती. गावातील लोकांचे न्यायालयीन कामं सहजासहजी पार पडतील, हा त्यामागील हेतू होता. माझ्या बाबांमध्ये आजोबांचे गुण असल्याने त्यांनाही

समाजसेवेची आवड होती.


बाबा वकील झाल्यावर गावातील लोकांचे खटले तेच लढवत होते. बाबा हुशार वकील होते. बोलण्यात बाबांचा हात कोणीच धरु शकत नव्हते. काही दिवसांतच बाबांचे नाव गाजल्यामुळे मोठं मोठे लोकं बाबांकडे केस घेऊन येत होते. बाबा मोठ्या लोकांकडून भरपूर फी घ्यायचे, पण गावातील गरीब लोकांकडून काहीच पैसे घेत नव्हते. आजोबांची तशी शिकवणचं होती.


माझी आई एकदम गरीब घरातील मुलगी होती. दिसायला सुंदर असल्याने आजोबांनीचं तिला सून म्हणून पसंत केलं होतं. बाबा आजोबांच्या शब्दाबाहेर नसल्याने तेही लग्नाला लगेच तयार झाले. 


माझी आई मनमिळाऊ असल्याने घरातील सर्व कारभार ती सांभाळू लागली होती. शेतावरील कामगारांच्या कुरबुरी, घरातील कामाला असणाऱ्या माणसांच्या कुरबुरी आई व्यवस्थित रित्या हाताळायची. माझी आई ग्रॅज्युएट झालेली होती. गावात फिरुन गरीब घरात जाऊन मुलींना शिकवण्याचे महत्त्व तिने पटवून दिले.


आजोबा, बाबा व त्यानंतर आई समाजसेवा करायला लागली. लग्नानंतर दोन वर्षांनी माझा जन्म झाला. पहिली मुलगी झाल्याचा आनंद आजोबा व बाबांनी मोठ्या जोशात साजरा केला होता, पण तो आनंद फार काळ टिकला नाही.


मी एक वर्षांची असताना माझ्या आईला कॅन्सर डिटेक्ट झाला. आईला रक्ताचा कॅन्सर झाला होता. पुणे, मुंबई सगळे हॉस्पिटल पालथे घातले. चांगल्या डॉक्टरांकडे आईला बाबा घेऊन गेलेत, पण कोणीच आई पूर्णपणे बरी होऊ शकेल असं सांगितलं नाही. शेवटी आहे ती परिस्थिती स्विकारावी लागली.


आईची तब्येत हळूहळू खालावत होती. आईची काळजी घ्यायला घरात दोन ते तीन बाया होत्या. मलाही त्याच सांभाळायच्या. आईला सलाईन लावलेलं बघून मला तिची भीती वाटायची, म्हणून मी तिच्याजवळ जातचं नव्हते. आईचं आयुष्य गोळ्या औषधांवर अवलंबून होतं. 


बाबा कामाच्या निमित्ताने घराबाहेरचं रहायचे. महिन्यातून दोन ते तीन दिवस बाबा घरी यायचे. माझा आणि बाबांचा संपर्क कधी आलाच नाही. बाबांचं खरं प्रेम काय असतं? हे मला कधी मिळालं नाही.


मी तीन वर्षांची असताना माझ्या आजोबांना हार्ट अटॅक आला व ते देवाघरी गेले. आमच्या घरात दिसणार एक माणूस कमी झालं होतं. आजोबा असताना दररोज घरात माणसांची वर्दळ सुरु असायची, पण ते गेल्यावर तीही कमी झाले. बाबा जेव्हा कधी घरी असायचे, तेव्हा त्यांना भेटायला गावातील काही लोकं यायची.


मी सात वर्षांची असताना आईही गेली. त्यानंतर घरात मी, बाबा आणि घरात काम करणारी दोन ते तीन माणसं एवढेच उरले होते.


शाळेत जायला लागल्यावर मला मैत्रिणी मिळाल्या होत्या, पण माझ्या बाबांना त्या घाबरत असल्याने घरी कोणीच येत नव्हते. लहान असताना शाळेतून आले की, मी टी व्ही बघत बसायचे, तेवढाच वेळ निघून जायचा. हळूहळू माझी व पुस्तकांची मैत्री होऊ लागली होती. 


टीव्ही च्या जागी पुस्तकं आले होते. मी मोठी होत होते. मी ऑर्डर देईल ते माझ्यासमोर हजर व्हायचं. मला शाळेत सोडायला आणायला ड्रायव्हर आणि गाडी होती. गावातील सगळेजण मला मान द्यायचे. बाबा घरी खूप कमी असायचे, त्यामुळे आमच्यात कधी संवाद वाढलाचं नाही. मला बाबांना काही निरोप द्यायकग असेल, तर मी त्यांच्या असिस्टंटला फोन करुन सांगायचे.


माझी दहावीची परीक्षा संपली होती. आता एवढ्या मोठ्या सुट्टीत काय करायचे? हा प्रश्न माझ्यासमोर पडला होता, तेव्हा माझ्या बाबांनी मुंबई फिरण्याची ऑफर माझ्यापुढे ठेवली होती. मी ती ऑफर लगेच स्विकारली.


मुंबईत आमचा स्वतःचा एक बंगला होता, त्यात नोकर चाकर होते. इतक्या दिवस ते फक्त ऐकून होते, त्यावेळी ते प्रत्यक्ष बघायला मिळालं होतं. मुंबईच्या घरात माझी व माझ्या आयुष्यातील स्पेशल व्यक्तीची पहिली भेट झाली.


"प्रज्ञा हिचं नाव प्रेरणा आहे. प्रेरणा इथे मुंबईतचं राहते. तू जेव्हा गावाकडे जाशील तेव्हा प्रेरणाला सोबत घेऊन जायचं. इथून पुढे तुम्ही दोघींनी सोबतचं रहायचे." बाबांनी तिची ओळख करुन देताना मला सांगितले.


"बाबा ही कोण आहे? आणि ही आपल्या घरी का राहते आहे? मी हिला घरी का घेऊन जाऊ?" मी बाबांना विचारले.


"प्रज्ञा जास्त प्रश्न विचारु नकोस. जेवढं सांगितलं आहे, तेवढं कर." बाबा सांगून निघून गेले.


प्रज्ञाच्या आयुष्यातील स्पेशल व्यक्तीचे नाव तर कळाले. तिच्याबद्दल अजून जाणून घेऊया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all