Jan 19, 2022
नारीवादी

माझी सुनबाई कोहिनूर हिरा

Read Later
माझी सुनबाई कोहिनूर हिरा

मानपान शिकावा तर प्रितीकडून ,किती आदर करते हो तुझी सून पाहुण्यांची उठबस,सुगरण आहे तिचा हात कोणी पकडेल तर शप्पथ. दिसायलाही देखणी आहे.खरंच बाई लाखात एक सून शोधून काढलीस लक्ष्मी तू .बाजूच्या मृदुला काकी नवीनच आलेल्या सुनेचे भरभरून कौतुक करत होत्या.

लक्ष्मी चेहऱ्यावर उसनं हास्य घेऊन मृदुलाच्या हो ला हो करत होत्या. प्रीती आणि महेशच्या लग्नाला सहा महिने झाले होते.प्रिती खरं तर सर्वगुणसंपन्न होती..चेहरा नेहमी हसरा ठेवायची. सासू सासरा नवरा ह्यांची मर्जी सांभाळायची पण तरीही लक्ष्मीला धाकधूक होती पुढे जाऊन हिने स्वतःचे रंग दाखवले तर.म्हणून लक्ष्मी तिच्याशी तुटकपणे वागायची.

प्रितीला वाईट वाटायचे, कारण प्रितीची आई देवाघरी गेली होती आणि तिच्या सासुकडून अपेक्षा वाढल्या होत्या.लक्ष्मी मात्र स्वतःची सासू होण्याची भूमिका चोख बजावत  होती.हळुहळू प्रितीच्या स्वप्नांवर पाणी फिरले, ती सुद्धा आता शांत राहू लागली .किती जरी मुलगी बनायचा प्रयत्न केला तरी सून ती सून ही भावना आता पक्की झाली होती .आधी प्रिती घरातली कामं झाली की,सासूसोबत गप्पा मारण्यासाठी हॉलमध्ये  बसायची पण आता ती स्वतःच्या रूमवर जाऊन बसत असे,तिला वाटायचे की सासू तिच्या जुन्या आठवणी काही किस्से सांगेल ,गप्पा मारेल पण तसं काहीच होत न्हवते,सासू टीव्ही लावून तिच्याच विश्वात असायची. आणि प्रिती जरी बोलायला गेली तरी ती जास्त बोलत नसे.प्रिती चे मन खिन्न व्हायचे.एकरूप होण्याचा सतत प्रयत्न करूनसुद्धा तिला यश न्हवते.

स्वतःला प्रश्न विचारायची कुठे कमी पडते मी?माझ्याशी का अशी वागणूक?. तिला त्रास होऊ लागला.कसं तरी ह्यातून बाहेर पडायचा तिने निर्णय घेतला.काही केलं तरी सासूबाईचे मन जिंकता येत न्हवते.सासरा मात्र प्रितीचे नेहमीच कौतुक करायचा.प्रितीला बासुंदी आवडायची म्हणुन तिला रोज बासुंदी आणायचा.अगदी घर कामात मदतसुद्धा करायचा. कधी कधी भाजीसुद्धा निवडून द्यायचा.प्रितीसुध्दा सासर्याला मुलीप्रमाणे जीव लावत होती.त्यांचे जेवण ,नाष्टा वेळेवर.त्यांना डायबीटीस होता तर प्रिती  औषध घेतली की नाही हे स्वतः तपासून पहात असे.सासूला असे वाटायचे की मुद्दामून चांगुलपणाचा  आव आणते आहे.तीला नावजावे म्हणून सर्व हा चांगला बनण्याचा अट्टाहास.का कोणास ठाऊक?प्रितीविषयी लक्ष्मीच्या मनात नकारात्मकता होती.प्रिती खूप प्रयत्न करूनही लक्ष्मीला समजवू शकत न्हवती.

दिवस सरत होते..वर्ष सरले प्रिती कामाला जाऊ लागली.घरदार सांभाळून ती सर्व व्यवस्थित पाहत होती.तिला त्या काळात आई होण्याची चाहूल लागली.चिमुकल्या पावलांचे स्वागत करण्यासाठी ती सज्ज झाली होती.. आता येणाऱ्या पाहुण्यासाठी तयारी चालू होती.प्रिती आणि महेश  मनोमन येणाऱ्या बाळासाठी अनेक स्वप्न सजवत होती.दिवस जवळ येत होते तसतसे ती बैचेन होत होती.एक दिवस काळाने घात केला ,दुधात माशी पडावी तसेच झाले..अकल्पित असे घडले.

प्रितीच्या नवऱ्याला महेशला लकवा मारला.तो बिछान्याला खिळला.मुलाची ही अवस्था पाहून लक्ष्मी कोसळून गेली.प्रितीलासुद्धा कळत न्हवते काय करावे.पोटात बाळ आणि नवऱ्याची एकाएकी झालेली अशी अवस्था..पण न जाणे का प्रितीमध्ये तेव्हाच एक सुप्त शक्ती जागृत झाली.ती त्या संकटकाळी  खंबीर झाली,सज्ज झाली आलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी, तिने त्या अवस्थेत स्वतःला सासूला सासऱ्याला सावरण्याचा प्रयत्न केला..

सासू ला सतत सांगत होती, मला पूर्ण विश्वास आहे माझा नवरा लवकर बरा होईल.काळजी करू नका.लक्ष्मीसुद्धा चाट पडली तिचे कणखर रूप पाहून.खरंच नशीबवान म्हणून अशी सून मिळाली.प्रितीच्या ह्या खंबीरपणाने सिद्ध केले होते की ती हिरा आहे.आज आलेल्या संकटात प्रिती खरं तर ढासळू शकत होती पण नाही ती तग धरून राहिली सामना करण्यासाठी.

प्रितीने गोंडस मुलीला जन्म दिला.महिना नाही होत तोपर्यंत तिने ऑफिसला जायचा निर्णय घेतला तिला माहीत होतं ,नवऱ्याच्या औषध पाण्यासाठी खर्च लागणार.सासू सासरे म्हातारे .प्रिती सून राहिली न्हवती ,आता ती आधारस्तंभ झाली होती.सासू सासर्यांना तिचा आधार वाटत होता..

जड अंतःकरणाने प्रिती मुलीला सासुकडे सोपवत आणि स्वतःच्या पंखामध्ये बळ आणून चार पैसे कमवण्यासाठी भरारी घेत..सहा महिने झाले .महेशमध्ये सुधारणा होऊ लागली..त्या काळात प्रीती आणि तिच्या सासूचे नाते बहरत गेले.प्रितीशिवाय  सासुचे आणि सासुशिवाय प्रितीचे पान हलेनासे झाले..

एक  सोनेरी दिवस आला महेश पूर्णपणे बरा झाला..तिचा संसार सुखाचा झाला..
कठोर मेहनत, संयम, एकीचे बळ ,विश्वास, कणखरपणा ह्या गुणांमुळे प्रितीने स्वतःचे आयुष्य पुन्हा रुळावर आणले..आज लक्ष्मी प्रितीची तारीफ करताना थकत नाही..माझी सून म्हणजे  कोहिनूर हिरा आहे .

माणूस हिरा आहे का कोळसा हे कळायला नक्कीच वेळ जातो,वाईट वेळ यावी लागते. .एक मात्र आहे हिरा कोठेही असला तरी तो चमकतो आणि ज्याची नजर तीक्ष्ण आहे तोच हिऱ्याची पारख करतो.हो फक्त डोळयाला मी पणा ,अहंकाराची पट्टी नको नाही तर हिऱ्याला कोळसा समजण्याची चूक होऊ शकते...

कशी वाटली कथा?आवडल्यास नक्की मला फॉलो करा..
कथा आवडल्यास लाईक,शेअर जरूर करा
©®अश्विनी पाखरे ओगले..

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

अश्विनी ओगले

Blogger

Love life Enjoying every second of life Now enjoying as a blogger ✍️ Love to share my experience through writing and touch the soul through writing from❤️ Finding me in new way..