माझी सावत्र आई

.
तेव्हा मी पहिलीत होतो. फार कळत नव्हते. आजीचा आणि बाबांचा लाडका होतो. पण आई काय असते ठाऊक नव्हते. आजी खूप माया करायची. तिच्या गोष्टी ऐकल्याशिवाय झोप येत नसायची. माझी आई लहानपणीच वारली. तिला फक्त फोटोतच पाहिले. दिसायला फार सुंदर होती. आजही कधी गावात गेलो तर लोक म्हणतात तुझी आई खूप सुंदर होती. बाबांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मी खूप आनंदी होतो. वर्गातही सर्वाना सांगितले की मला नवीन आई भेटणारे. पण माझ्या आनंदावर लगेचच विरजण पडले. काही मित्रांनी सावत्र आईच्या गोष्टी सांगितल्या. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यातच नियतीचा कहर कोसळावा असे झाले. माझी आजी देवाला प्रिय झाली. खूप रडलो मी त्या दिवशी. आजी पुन्हा उठावी म्हणून खूप हलवले होते मी तिला. पण व्यर्थ. देव इतका निष्ठुर का झाला की त्याने माझा भावनिक आधार हिरावून घेतला. मग घरात फक्त मी आणि बाबाच उरलो. घर भकास वाटू लागले. स्त्रीमुळेच घराला घरपण येते. स्त्री रडली की घरातली लक्ष्मी बाहेर पडते. काही दिवसांनी बाबांनी लग्न केले. तीन दिवस तर मी नव्या आईला बोललोही नाही. हे लग्न होऊ नये म्हणून मी बाबांना खूप रोखले होते. पण मला एका आईच्या प्रेमाची गरज आहे असे सांगून बाबांनी लग्न केलेच. आता सावत्र आई सतत कामे सांगणार , शिळे अन्न देणार , मारणार , बाबांचे कान फुंकणार अश्या अनेक विचारांनी माझ्या मनात घर केले. मी त्या नव्या आईला टाळत गेलो. ती मात्र मायेने बोलायची. मी त्या जाळ्यात अडकत नसायचो. बाबांविषयी तर माझ्या मनात नकारात्मक प्रतिमा तयार झाली. स्वतःच्या सुखासाठी त्यांनी दुसरी बायको घरात आणली होती. माझा जरासाही विचार केला नाही. त्यातच अनिल कपूरचा " बेटा " चित्रपट प्रदर्शित झाला. मलाही शेतात काम करू लागू नये म्हणून मी खूप अभ्यास करू लागलो. चित्रपटाचे चांगले परिणाम होतात ते असे. असो. हळूहळू माझे आणि बाबांचे संबंध बिघडत गेले. माझी त्या घरात घुसमट होऊ लागली. त्यात नवीन आई गर्भवती झाली. माझा घरात कुणीतरी वाटेकरी येणार होता. मी बाबांना उलट उत्तरे देऊ लागलो. एकेदिवशी मी स्पष्ट बोलून टाकले की बाबा तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी दुसरे लग्न केले. तेव्हा बाबांनी माझ्या कानाखाली वाजवली. मी माझ्या खोलीत गेलो आणि माझ्या आईची फोटो घेऊन रडू लागलो.

" आई , तू जर मला सोडून गेली नसती तर आज मी रडत नसतो. " मी रडू लागलो.

कानात अजूनही किर्रर्र आवाज येत होता. गाल अजूनही गरम होते. फोटोवर आसवे गळून तो फोटो धूसर दिसत होता. तेवढ्यात माझी सावत्र आई माझ्या खोलीत शिरली. तिने मला कवटाळले.

" बाळा , तुझ्या मनात माझ्याविषयी इतका द्वेष का ? फक्त मी तुझी सख्खी आई नाही म्हणून ? कृष्णाची गोष्ट माहिती नाही का ? यशोदा कृष्णाची खरी आई नव्हती. तरीही आजही आपण यशोदा का नंदलाला म्हणूनच कृष्णाला ओळखतो ना ? मी तुझ्यासाठी कपडे , खेळण्या आणल्या. आवडीचे पदार्थ बनवले. तरीही तू मला आई म्हणून स्विकारत नाहीस. तू माझा कान्हा आहेस. तुला तुझ्या हक्कात कुणी वाटेकरी नको असेल तर मी आई होणार नाही. मी हे बाळ पाडून टाकेल. " सावत्र आई म्हणाली.

मला काहीच सुचले नाही. तिने माझी आसवे पुसली. मला जेवण दिले. सकाळी मी तिच्याजवळ गेलो.

" आई , मलाही भाऊ किंवा बहीण हवा आहे. तू प्लिज या बाळाला जन्म दे. " मी म्हणालो.

माझ्या तोंडून " आई " हाक ऐकताच माझ्या सावत्र आईला गहिवरून आले. तिने मला उराशी कवटाळले. स्त्रीच्या हृदयात इतकी माया असते की पूर्ण जग त्यात सामावते. त्या दिवशी मला माझी आई भेटली. सावत्र आईच्या वचनापायी वनवासाला जाण्याची संस्कृती आहे आपली. त्यानंतर कधीच आमच्या कुटुंबात " सावत्रपण " आडवे आले नाही. माझ्या भावाला तर ठाऊकही नाही मी त्याचा सावत्र भाऊ आहे ते. त्याला तर तोच दत्तक आहे असे वाटते. कारण आई माझा जास्त लाड करते. कैकेयीलाही आधी रामच प्रिय होता असे म्हणतात. माझी आई यशोदा आणि मी तिचा कान्हा बनलो.

©® पार्थ धवन