माझी अमेरिका डायरी - ८ - नव्याची नवलाई!

नवीन मशिन्स, नवीन वस्तू आणि नवीन पद्धती सांभाळताना होणाऱ्या गमती जमती, तिकडच्या नवख्या तऱ्हा ह

आमच्या नवीन घरात / अपार्टमेंटमध्ये सगळ्यात खटकणारी गोष्ट म्हणजे स्वयंपाकघर. ठाणा -मुंबईला सुद्धा कधी प्रशस्त स्वयंपाकघर नसतात, पण हे अगदीच काडेपेटीसारखं होत. ओटा म्हणून जो प्लॅटफॉर्म होता तो लाकडाचा, वरती सन्मयका लावलेला. म्हणजे पाणी टाकून धुवायही प्रश्नच नाही. तस तर म्हणा इकडे सगळंच ड्राय क्लीनिंग असतं. ????. ओट्याला मध्यभागी मोठा छेद दिलेला आणि त्यात कूकिंग रेंज बसवलेला. अनायसे ओव्हन पण मिळाला, त्यामुळे विविध ब्रेड, केक कुकीज करायला मिळणार म्हणून मी खुश झाले. त्याचा नंतर बराच उपयोगही केला, कधी ओघाओघाने तेही देईन. पण त्या कुकिंग रेंजची सर्वात वैतागवाडी म्हणे कॉइल्स. आपल्यासारख्या गॅस च्या शेगड्या इकडे जरा अभावानेच आढळल्या. अपार्टमेंट्स मध्ये तर प्रामुख्याने कॉइल्स , काही ठिकाणी त्यावर  ग्लास टॉपींग दिलेले. 

ह्या कॉईलीचे बरेच तोटे आहेत. एक तर सकाळी ती तापायला बराच वेळ लागतो, त्यामुळे प्रामुख्याने चहा करायला बराच वेळ लागतो. एकदा गरम झाली कि लालम लाल, मग नीट लक्ष देऊन लगेच उतरवावे लागते. त्याची सवय व्हायला थोडा वेळ लागतो. त्यावरती तळण पण खूपच जिकरीचे असतं, कारण जर तेलाचा एखादा थेम्ब जरी पडला तरी ती  खटकन पेट घेते. भाकऱ्या, वांगी भाजणे हे देखील आम्ही जाळी वगैरे ठेवून करून बघितले पण ते एव्हढ सहज आणि सोपे नव्हत मग आम्ही नंतर त्याचा नाद सोडला. 

पण त्या स्वयंपाक घरातील माझ्यासाठी सगळ्यात नवलाईची गोष्ट म्हणजे “डिश वॉशर”. तसं तर आधी भारतात भांडी घासायला मावशी असल्यामुळे कधी डिश वॉशरच्या चौकशीसाठीही मी गेले नव्हते. पण इकडे मात्र हा बराच उपयोगी पडतो हा लौकिक ऐकून होते. लगेच दुसऱ्या दिवशी वापरलेली सगळी भांडी व्यवस्थित विसळून मांडून ठेवली डिशवॉशर मध्ये. सोप डिस्पेन्सर मध्ये सोपं टाकला. झाकण लावलं. मशीन सुरु केलं. इतकं सोप्प. 

पण पाचच मिनिटात मशीन मधून पांढरा पांढरा फेस बाहेर पडायला लागला. हळू हळू पांढरा  फेस , पाणी स्वयंपाकघरात तळच साठलं. आम्ही तातडीने अपार्टमेंट मॅनेजरला फोन केला. ती साधारण साठ-एक वर्षांची असावी, उंच, धिप्पाड तिचा नवराही तसाच. दोघे तिथेच एका घरात राहायचे. इकडे बऱ्याच अपार्टमेंट बिल्डींग्स मध्ये असेच त्या बिलिंग मध्येच मॅनेजर फॅमिली सकट राहतात. आमचा अनुभव, त्यांना काही सांगितले कि ते लगेच यायचे आणि लगेच जमणार नसेल तर सांगतील त्या वेळी नक्की यायचे. सामान्यतः लोकं जे बोलतात त्याप्रमाणेच वागतात असा आमचा अनुभव. उगाच आता येतो सांगून दोन दिवस पत्ता नाही असे आमचे आधीचे प्लंबर, रद्दीवाले, इस्त्रीवाले ह्यांचे अनुभव असल्यामुळे सुरुवातीला आम्ही यांच्या “बोले तैसा चाले” रीतीने खूपच इंप्रेस झालो. 

हा, तर फोन केल्या केल्या पाचव्या मिनिटाला बंदा हजर. ते सगळं तळ बघून त्याने मला विचारलं, 

“बघू कुठला साबण टाकला ?”

मी लगेच त्याला “ऑरेंज” फ्लेवर च्या साबणाची नवीन आणलेली बाटली दाखवली. 

“हा डिश वॉश सोप फक्त हातानी भांडी धुवायला वापरायचा. मशीन साठी कॅसकेड  चा एक डबा  मिळतो, त्यात छोटे पॉड्स  असतात. जरा महाग असतो. पण तोच चालतो ह्यात.” 

मग त्याने मला तो टारगेट मध्ये ह्या ह्या ठिकाणी मिळेल इथपर्यंत सगळं नीट समजावून सांगितलं. तो सगळा पसारा मी निस्तरला. 

इकडे  प्रत्येक गोष्टीला वेगळा साबण, एक रिन चा हात सगळीकडे फिरवला असं नाही. 

साबणाच्या २-३ आईल्स तरी असतात. अंगाचा, केसांचा हे तर नॉर्मल झालेच पण त्याव्यतिरिक्त डिशवॉश, हा डिश वॉशरचा, कपड्यांचा, वूलन कपड्यांचा, ड्रायिंग शीट्स, टॉयलेट  क्लीनर्स , ग्लास क्लीनर्स, किचन क्लीनर, कार्पेट क्लीनर, वूड फ्लॉअर क्लीनर, ग्रॅनाईट क्लीनर, बाथरूम क्लीनर , टब क्लीनर, टाइल क्लीनर … हुश्श  मी लिहितानाच दमले. ह्या प्रत्येक साबणात मग परत वेगवेगळे फ्लेव्हर्स, ब्रॅण्ड्स. ह्या कॅसकेडला मला काही मला अजुन स्पर्धक सापडला नाही. दुसरा पर्याय म्हणजे फक्त ट्रेडर जोचा डिश वाशेर सोप. बर ह्या व्यतिरिक्त वेगवेगळे wipes, खालपासून वर पर्यँत सगळ पुसायला, मॅजिक इरेजर ज्याने खरच जवळ जवळ सगळे डाग पुसले जातात. 

बर त्यावर कडी म्हणून जर डिश सोपं ची बाटली जर २ डॉलरला मिळाली तर ज्यांनी भांडी घासायची ती फुलं (स्क्रब ) ४-५ डॉलरला. सुरुवातीला असा वात आलेला म्हणून सांगता. पाहिल्या भारताच्या फेरीत वर्षभर पुरतील एव्हढे  स्क्रब घेऊन आले आठवणीने. मग नंतर हळूहळू डायझो जपान, चायनीज डॉलर शॉप्स कळली तिकडे तुलनेने ह्या गोष्टी स्वस्त मिळतात. 

हे सगळे साबण अतिशय स्ट्रॉंग असतात, त्यांच्या वासाने, स्प्रे ने कधी गुदमरल्यासारखेही होते. मग त्यावर उपाय म्हणजे परत अजून महागडे  ऑरगॅनिक प्रोडक्टस. कुठल्याही अपार्टमेंटच्या प्रवेशालाच एक वॉर्निंग दिसते “आम्ही जे क्लीनिंग प्रोडक्टस वापरतो त्याने कॅन्सर होऊ शकतो “ टाईपची. 

इकडे काही गोष्टींचं मला राहूनराहून आश्चर्य वाटायचं. उठता बसता पेपर वापरला जातो. अगदी सकाळी उठल्यापासून, बाथ टिशू (टॉयलेट पेपर), फेस टिशू (चेहरा पुसायला ), पेपर टॉवेल (किचनमध्ये ), बटर पेपर (फॉईल मध्ये रॅप करायला ), ब्राउन बॅग (लन्च ठेवायला), शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या झिपलॉक बॅग्स ज्या फ्रिझर पासून , मुलांचे स्नॅक्स पॅक करायला रोजच्या उपयोगात मुबलक प्रमाणात असतात. त्याव्यतिरिक्त डिसइन्फेक्टइंग wipes, वेट wipes, फॅशिअल wipes, बेबी wipes पेपरचा वापर काही संपताच नाही. 

खार सांगू आता आठ वर्ष होतील तरीही मला हे सगळे पेपर्स अतिशय महाग वाटतात. त्यातही COSTCO सारख्या होलसेल दुकानांमुळे बाथ टिशू वगैरे थोडे परवडणारे वाटतात. 

Covid मध्ये काही महिने टॉयलेट पेपर्स चा इतका तुटवडा पडलेला, लोकांनी भरमसाठ स्टोर करून ठेवलेले , दुप्पट तिप्पट किमतींना  विकले जात होते. कधी कशाने तोंडचं  पाणी पाळेल सांगता येत नाही. 

रोज सकाळी वर्तमानपत्र मात्र येत नाही. क्वचित कुठे स्टॅन्ड वरती कॉईन्स टाकले कि त्यातून काढता येतात.  

पण आपण न मागताही महिन्याच्या महिन्याला जवळच्या दुकानाच्या पत्रिका येत राहतात , त्यात त्यांचे सेल, ऑफर्स ह्यांच्या जाहिराती , व्हाल पॅक म्हणून एक लिफाफा येतो त्यात खूप सारे डिस्काउंट देणारी पत्रक असतात. त्यातील एखादेच खरंच आपल्या कामाचे असते. मग शाळेकडून येणारी फ्लायरस (आता हे बंद झाली कारण इमेल पाठवतात ) , वेगवेगळ्या क्लासेसच्या जाहिराती. जर रद्दीवाला असता तर एकही रुपया(सेन्ट) (पेपरच बिल ) न देता दोनेक किलोची रद्दी नक्कीच झाली असती. तेव्हढाच आपला मध्यम वर्गीय हिशेब!

पुढच्या भागात बघूया इकडे बसलेले सांस्कृतिक व इतर धक्के!

क्रमश:

🎭 Series Post

View all