Login

माझी अमेरिका डायरी - ३ (अमेरिकेतल्या शाळेची ऍडमिशन )

भारतातून अमेरिकेत शिफ्ट झाल्यावर इकडच्या शाळेत मुलांच्या ऍडमिशन कशा होतात त्याविषयी थोडंसं.

इकडे घर सेट करत असतानाच दुसरी महत्वाची गोष्ट करायची होती ती म्हणजे शाळेची ऍडमिशन. तेव्हा छोटा किंडरगार्डन आणि मोठा तिसरीला होता. म्हणजे आम्ही भारतात त्यांची शाळा संपवून इकडे आलो होतो. पण तेव्हा इकडचे शैक्षणिक वर्ष चालूच होते. इकडे शाळेचे शैक्षणिक वर्ष साधारण ऑगस्ट किंवा सप्टेंबर ते जून किंवा जुलै असतं. तर इकडची शाळा चालू असल्यामुळे त्यांना शाळेत प्रवेश घेणे आवश्यक होते. 

खर सांगायचं तर शाळेचं ऍडमिशन म्हंटल कि पोटात गोळाच येतो. कारण तीन वर्षांच्या फरकाने मी दोनदा हा अनुभव घेऊन बसलेले. ठराविक तारखांच्या आत फॉर्म्स भरायचे, मग आपल्या मुलाचं नाव लिस्ट मध्ये लागावं म्हणून साकडं , इंटरव्यू वगैरे ठेवला असेल तर ते पोरगं नीट बोलेल ना, व्यवस्थित उत्तर देईल ना म्हणून एक टेन्शन, लिस्ट मध्ये नाव लागलं तर मोठी डोनेशन किंवा डिपॉझिट, फी , युनिफॉर्मस, रिक्शा/ स्कूलबस/व्हॅन, पुस्तकं, वह्या , डबे, बाटल्या … ही लांबलचक न संपणारी यादी आणि गळती लागलेला खिसा. 

आधी आता थोडं इकडच्या शाळांविषयी सांगते. अमेरिकेत साधारण ९० % मुलं पब्लिक शाळांमध्ये जातात. पब्लिक शाळा K -१२ म्हणजे किंडरगार्डन ते बारावी पर्यंत असतात. तर ह्या शाळा, एलिमेंटरी स्कूल  K -५, मिडल स्कूल ६-८, आणि  हाय स्कुल ९-१२ वी अशा असतात. त्यांचा खर्च मुख्यत्वे  फेडरल गव्हर्नमेंट  म्हणजे केंद्र सरकार, स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकार आणि स्थानिक टॅक्सेस  असे तिघे मिळून उचलतात. एका स्कुल डिस्ट्रिक्ट च्या  एरियात  साधारण ८-१० एलिमेंटरी शाळा आणि ३-४ मिडल स्कूल असतात. हाय स्कुलचे स्कूल डिस्ट्रक्ट वेगळे   असते. एका डिस्ट्रक्ट मध्ये ४-५ हाय स्कुल्स येतात. प्र्त्येक शाळेची एक बॉउंडरी असते आणि त्या एरियात राहणाऱ्या मुलांनाच त्या शाळेत ऍडमिशन मिळते. 

ह्या सगळ्या शाळांना १-१० मध्ये ग्रेट स्कुल रेटिंग असते. १० म्हणजे अत्यंत उत्तम शाळा. तर हे रेटिंग दर काही वर्षांनी बदलू शकते. मुलांची आभ्यासातील तयारी, प्रगती, ऑफर केलेले विषय अशा बऱ्याच निकषांवर हे रेटिंग्स दिले जातात. 

म्हणजे तुमच्या लक्षात आलेच असेल, की इकडे चांगल्या शाळेत जायचं असेल तर त्या शाळेच्या बाऊंड्री एरियामध्ये तुमचं घर असावं लागत. साहजिकच चांगल्या शाळेच्या एरिया मध्ये घराच्या किमती आणि भाडी खूप जास्त  असतात. 

आम्ही आधीच इकडे राहणाऱ्या मित्र मैत्रिणीना  विचारून ही  माहिती मिळवली होती. त्यानुसार गुगलवर search करून चांगली शाळा, त्या एरियातील चांगली आणि परवडणारी घरे शॉर्टलिस्ट करून मग हे आताचे अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. फक्त कधी कधी मिड इयर ऍडमिशन असली आणि शाळा खूपच डीमांडमध्ये असेल तर मग ते तुम्हाला दुसऱ्या शाळेत जिथे सीटस अव्हेलेबल असतील तिकडे पाठवू शकतात. त्यामुळे थोड टेन्शन होतच. 

तर  आम्ही सकाळी साधारण नऊच्या दरम्यान स्कुल डिस्ट्रिक्टच्या ऑफिस मध्ये पोहोचलो. त्यांना जरुरी असलेली  कागदपत्रे दाखवली, जस की, पास्पोर्ट्स, अड्रेसप्रूफ . 

“येल्लो कार्ड ?” त्या क्लार्क ने विचारले 

“आता ते काय असतं ?” एव्हढा सगळा होमवर्क करून आलो आणि हे  येलो कार्ड कस माहित नाही आपल्याला? वगैरे वगैरे विचार येण्याआधीच तिने आम्हाला थोडक्यात सांगितलं . 

इथे बाळ जन्माला  आलं कि त्याच येल्लो कार्ड बनवतात, त्यात जन्मापासून सगळ्या लसी, इंजेकशन  ह्यांची नोंद असते. शाळेत जायच्याआधी  सगळ्या आवश्यक लसी घेतल्यात ना हे तपासायचे आहे. शिवाय टीबी टेस्ट करून घ्यायला लागेल. हे सर्व झाल्याशिवाय शाळेत नाही जाता येणार. 

पण इतर कागदपत्रे असल्यामुळे तिने आम्हाला , म्हणजे आमच्या मुलांना ऍडमिशन दिली असल्याचे सांगितले. 

“वा!” खरं तर  ऍडमिशनचे फॉर्म्स, वेटिंग लिस्ट, interviews, झालच तर डोनेशन, डिपॉझिट, भरमसाठ फी काहीही कटकटी न होता अर्ध्या तासात  हव्या त्या शाळेत ऍडमिशन मिळाली ह्यावर विश्वासच बसत नव्हता.

“झालं … अर्धा गड तरी सर झाला” ह्या आनंदात आम्ही घरी आलो. 

पण आता खरी गोम होती ते येल्लो कार्ड कसं बनवायचं ? टेस्ट कुठून आणि कशी करायची ? इंजेकशन कुठे घ्यायची?

परत  गूगलला  कामाला  लावल्यावर, १५-२० फोन केल्यावर आणि त्यामागे  अर्धा दिवस घातल्यावर आम्हाला शेवटीचं एक क्लिनिक मिळालं, जे घरापासून ३-४० मिनिटांच्या (ड्रायविंग) डिस्टन्स  वर होतं, त्यांची दुसऱ्या दिवशीची चार वाजताची अँपॉन्टमेन्ट मिळाली ती घेतली. 

दुसऱ्या दिवशी दुपारी बरोबर चार वाजता ते ऑफिस ( डॉक्टरांच्या क्लिनिकला इकडे ऑफिस म्हणतात’) गाठलं. मग आमच्या कडच्या जुन्या फाइल्स बघून त्यांनी ते येल्लो कार्ड बनवले. त्यात त्यांना  एक-दोन लशी मिसिंग असल्याचे वाटले. त्या लशी ताबडतोब मुलांना  दिल्या.  त्यांची टीबी टेस्ट केली. आणि  आमचे तत्कालीन इन्शुरन्स हे  कव्हर करत नसल्याने ३००-४००डॉलर्स ( २१-२८००० रुपये ) नी आमचा खिसा हलका केला. 

तरी आता आम्ही  आमच्या पसंतीच्या (म्हणजे १० रेटिंग असलेल्या ) शाळेत जायला मिळणार म्हणून खुशहोतो. तर मुले सुद्धा उद्या नवीन शाळेत जायचं, ती शाळा कशी असेल, टीचर्स कसे असतील, नवीन मित्र मिळतील ना ह्या उत्साहात रममाण होती. 

पुढच्या भागात शाळा, शिक्षक, वर्ग , विषय  यांविषयी जाणून घेऊ या. 

क्रमश:

<<< prev भाग २: माझी अमेरिका डायरी- २ (घर सजविणे)

0

🎭 Series Post

View all