सन. १९७७ ला वयाच्या १९ व्या वर्षी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले व १९७८ ला लग्न झाले. आई-वडिलांची आर्थिक स्थिती जेमतेमच. अशावेळी फारशा अपेक्षा न ठेवता आई-वडिलांनी माझे लग्न जमवले. कारण तेव्हा मुला मुलींची मते फारशी विचारात घेतली जात नव्हती. आई वडील म्हणतील तीच पूर्व दिशा. लग्न होऊन सासरी आले. सासर एका खेडेगावात. घरी सासू-सासरे ,ननंदा,दीर. वय कमी असल्यामुळे खूप भेदरलेल्या मनस्थितीमध्ये होते. संसार सुरू झाला. कामं करण्याची फारशी सवय नव्हती. वाटायचं अजून मला खूप शिकायला मिळालं असतं तर... कारण माझी शिकायची खूप इच्छा होती .
नोकरी करून आई-वडिलांना आर्थिक मदत करायची ही माझी मनापासून ची इच्छा होती. पण सर्व इच्छा मनातल्या मनातच राहिल्या . पाहता पाहता दोन मुलांची आई झाले. मुलांना लहानाचे मोठे करताना वेळ निघून जायचा. आता मुलं शाळेत जाऊ लागली. मग मात्र मला काहीतरी करण्याची तीव्र इच्छा व्हायची. कारण तेव्हा ग्रॅज्युएशनला खूप महत्त्व होतं.
माझे शिक्षण गावातील सर्वांनाच माहीत होतं. कुणीही विचारायचं नोकरीसाठी प्रयत्न कां करत नाहीस.? पण घरून अर्थातच या गोष्टीला फारशी संमती नव्हती. कारण खेडेगाव म्हटल्यानंतर थोड्या मर्यादा पडतातच. पण मन स्वस्थ बसू देईना. प्रसंगी विरोध पत्करून नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. मनोभावे परमेश्वराला स्मरत होते. "देवा, परमेश्वरा काहीतरी चमत्कार कर."मला माझ्या संसारासाठी चार पैसे कमवायचे आहेत. मुलांना शिकवायचे आहे.
सासरची ही परिस्थिती साधारणचं होती मिस्टरांना नोकरी नव्हती. वडिलोपार्जित शेती व्यवसाय. शेतीमध्येही फारसे उत्पन्न नसायचे.१/२ ठिकाणी नोकरीची ऑफर आली. पण दुसऱ्या गावी. दुसऱ्या गावी जाणे शक्य होत नव्हते. कारण S.T. बसचे टाइमिंग नव्हते. मुलं लहान होती. छकडा बैल ,सायकल शिवाय कोणतेच वाहन नव्हते.
पण मी हिम्मत हरली नाही. म्हणतात नां "प्रयत्नांती परमेश्वर "मदतीची याचना करणाऱ्यांसाठी परमेश्वर धावून येतो. हेच खरे ठरले. आणि एक दिवस सोनियाचा उगवला. त्यावेळी आमच्या गावात ७ व्या वर्गापर्यंतच शाळा होती.८, ९,१० या वर्गासाठी विद्यार्थ्यांना ६कि. मी. अंतर पार करून दुसऱ्या गावी जावे लागे. मात्र गावातील सहृदय व्यक्तींच्या सहकार्याने गावात हायस्कूल सुरू होणार ही बातमी मला समजली. माझ्या आशा पल्लवीत झाल्या. आणि त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे त्या संस्थेचे अध्यक्ष माझ्यासाठी देवदूत म्हणून आले. त्यांनी स्वतःहून मला शाळेत शिक्षिकेची नोकरी करण्याची ऑफर दिली. माझ्या दृष्टीने तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग होता. माझ्या आनंदाला सीमाच उरली नाही.
पहिल्या वर्षी आठवा वर्ग, दुसऱ्या वर्षी नववा वर्ग, व तिसऱ्या वर्षी दहावा वर्ग असे वर्ग सुरू झाले. अनुदान मिळेपर्यंत मी त्या शाळेत निशुल्क सेवा दिली. पुढे शाळेकडूनच माझे बी. एड .झाले. त्या शाळेने मला एक आर्थिक व सामाजिक दर्जा दिला.माझ्या जीवनाला मिळालेली ही कलाटणी होती. त्यामुळे माझी मुलं आज उच्चशिक्षित आहेत. चांगल्या जॉब वर आहेत.
खरंच मला वाटतं मला ही संधी मिळाली नसती तर माझ्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा मनातल्या मनातच राहिल्या असत्या. प्रबळ इच्छाशक्ती आणि परमेश्वराची कृपा म्हणून या गोष्टी शक्य झाल्या. ज्या शाळेमुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली त्या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष महोदय व पदाधिकाऱ्यांची नेहमीच ऋणी राहील. अलीकडेच सन.२०१५ मध्ये मी सेवानिवृत्त झाले. व आज एक समाधानी जीवन जगत आहे.
धन्यवाद.
सौ.रेखा देशमुख