Feb 29, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

मज भेटला कान्हा

Read Later
मज भेटला कान्हा
"कान्हाला एवढा खाऊ!" गार्गी देवा पुढे ठेवलेले लाडू बघून ओरडली.

"पिल्लू हात लावू नको, कान्हाला दाखवल्याशिवाय खायचं नसतं." वसुधा म्हणाली.

" प्रसाद तर थोडाच असतो मग हे लाडू, पेढे सगळंच कसं? " गार्गी म्हणाली.

"आज  कान्हाचा बर्थडे आहे ना म्हणून त्याला छप्पन्न भोग दाखवायचा असतो." वसुधाआजी म्हणाली.

"आजी एवढं खाल्ल्यावर कान्हाचं पोट दुखेल ना म्हणून थोडंसं मी खाते."
गार्गी त्यातला लाडू उचलत म्हणाली.

" लबाड कुठली,  चल बाजूला हो. आत्ताच खायचं नाही, रात्री आरती झाली की मग सगळ्यांना प्रसाद वाटायचा, त्याआधी नाही." जुई म्हणजे तिची आई तिच्यावर ओरडली.

"आजी मला झोप येते ना, मी कुठं बारा वाजेपर्यन्त जागी राहणार? " गार्गीच सगळं लक्ष लाडूकडे होत.

"मग सकाळी उठल्यावर खायचं.अजिबात हात लावायचा नाही." वसुधा म्हणाली.

" बरं!" असं म्हणून गार्गी तिथेच कोपऱ्यात बसली. "

वसुधाने बाळकृष्णाला चौरंगावर ठेवलं. छान ड्रेस घातला. त्याच्याभोवती रांगोळी काढली.त्यानी छान पाळणा सजवला होता.

" कान्हाचा आज बर्थडे आहे मग पाळणा का ग सजवला. आपण आपल्या बर्थडेला केक कापतो, कॅण्डल लावतो मग कान्हाच्या बर्थडेला पाळणा का असतो?" गार्गीच्या बालमनाला प्रश्न पडत होता.

"काय आहे गार्गी किती बोलतेस? मला माहित नाही असं का करतात ते?" वैतागून जुई म्हणाली.

" आजी, तुला कधी कृष्ण भेटला का?" गार्गीने वसुधाला प्रश्न विचारला.

जुई म्हणाली, "ये वेडाबाई देव कुठे भेटत  असतो का? "

"असं का म्हणते जुई. देव नक्की भेटत  असतो.  फक्त तो कोणत्या रूपात आला हे आपल्या ओळखता आलं पाहिजे."

" ए आई काय पण तिला सांगू नकोस. " जुई वैतागून म्हणाली.

" आजी, तो तुला भेटला होता का ?" गार्गीने विचारले.

"हो मला भेटला होता. त्याने मला मदत केली होती. पण त्याला थँक्स म्हणायचं राहून गेलं." वसुधा उदासपणे म्हणाल्या.

"आजी  देवाला कुणी थँक्स म्हणतं का? थँक्स तर माणसाला म्हणतात." गार्गी हसत म्हणाली.

वसूधा हसली पण भूतकाळातला प्रसंग तिला जसाचा तसा आठवत होता.

गोष्ट  96 - 97 ची होती.  दिवाळीच्या सणाला वसुधा माहेरी गेली होती. पाच-सहा  दिवस ती तिथं राहिली होती. आता परत जायचं तर सोबत कुणी नव्हतं. वडिलांना अचानक ताप आला होता. भाऊ गावाला गेला होता.

"या वेळेस मी एकटीच जाते, काही होत नाही. डायरेक्ट बस तर आहे. मी आणि  जूई जातो." असं म्हणून ती एकटीच निघाली होती.

"सोबत काही तरी ने, आज तुला उपवास पण आहे ना."  तिची  आई  म्हणाली होती.

"अगं चार तासाचा प्रवास आहे. कशाला लागेल काही. नाहीतरी बसमध्ये फराळ करायला मला आवडत  नाही. "

असं म्हणून तिने सोबत काही घेतलं नव्हतं.  जूई त्या वेळेस असेल जेमतेम दीड वर्षाची. अर्ध्या रस्त्यात गेली असेल नसेल की बस मध्येच थांबली. सगळेजण खाली उतरले.
"काय झालं?" बघायला म्हणून ती खाली उतरली होती. शेजारच्या माणसांना तिने विचारले.

" काय झालं, किती वेळ लागणार? "

" किती वेळ लागणार माहित नाही. कापसाला भाव द्या म्हणून शेतकऱ्यांच आंदोलन चालू आहे. रास्तारोको आहे. आंदोलक  कुणाची  गाडी, बस रस्त्याने जाऊ देत नाही. बहुतेक बस पुढे जाणार नाही. आल्या मार्गी गाडी वापस जाणार आहे. " एका सदगृहस्थाने माहिती दिली.

वसुधाला प्रश्न पडला. आता  काय करावं? सोबत तर कुणी नाही. दुपारचा एक वाजून गेला होता. जूईला भूक लागली म्हणून ती रडत होती. वसुधाला काळजी आणि भीती  दोन्ही वाटतं होत.

त्या वेळी आतासारखे सगळ्याकडे मोबाईल नसायचा  फार कमी जणाकडे असायचा. नाही तर मग कॉईनबॉक्स वरूनच फोन केला जाई. आजूबाजूला कुठेही फोन नव्हता, कसं असणार? विरान शेतात कुठं आला फोन? अनोळखी  माणसांना फोन कसा विचारावा ती विचारात पडली होती.

तेवढ्यात ड्रायव्हर आला.
" गाडी बीडपर्यंत जाणार पण डेपोला लागणार आहे. पुढे जाणार नाही."

बीडला ती बसच्या खाली उतरली हातात दोन बॅग, कडेवर छोटी जूई. खाली तरी कसं उतरावं? माणुसकीच्या नात्याने कंडक्टरने तिच्या हातातल्या दोन बॅग घेतल्या.
" उतरा ताई तुम्ही आता सावकाश. "

बीडच्या बसस्टँडवर गर्दीच गर्दी.
\"लोक दगडफेक करतील म्हणून गाड्या पुढे  सोडू नका.\" असा आदेश  होता.

" तुम्ही इथं बसा, मी चौकशी करून येतो तुमच्या गावाला कोणती बस जाणार आहे की नाही." असं म्हणून तो कंडक्टर इन्क्वायरी ऑफिसकडे गेला.

" ताई तुमचं ह्या गावात कुणी नातेवाईक आहे का? कारण इथून पुढे बस शक्यतो जाणार नाही."

" नाही या गावात मी कुणाला ओळखत नाही." वसुधा रडवेली होऊन म्हणाली.

"बघू काय करता येईल आधी तुम्ही काहीतरी खाऊन घ्या." असं तो वसुधाला म्हणाला.
"मी घेवून येतो." म्हणत तो गेला.
जूईला खूप भूक लागली होती. वसुधालाही भूक लागली होती . गोकुळाष्टमी असल्याने तिला उपवास होता.

"ताई उपवासाचं काहीतरी खाऊन घ्या, तुमच्या गावी जायला तुम्हाला उशीर होईल. "

पण काळजीने तिला घास  उतरत नव्हता.

जूईला कडेवर घेऊन तो प्रत्येक गाडीत चौकशी करत होता. ती बॅग घेऊन  तिथेच बसली होती.

"चला ताई, एक बस तुमच्या गावाला जाणारी आहे. फक्त त्यात कुणी प्रवासी नाही. भीती  वाटणार नाही ना?" तो म्हणाला.

भित्री असलेली वसुधा  म्हणाली,
"चालेल, इथे बसण्यापेक्षा बरं."

सहजासहजी तो ड्रायव्हर तयार होत नव्हता.
"समजा रस्त्याने दगडफेक झाली चुकून  दगड लागला तर याची जिम्मेदारी कोण घेणार? प्रवासी घेऊ नका असा आदेश आहे आपल्याला," असं तो समोरचा  ड्रायव्हर म्हणत होता.

त्या कंडक्टरने बरंच काही समजून सांगितल्यावर तो तयार झाला.

मदत केल्याबद्दल धन्यवाद हे शब्द तिच्या तोंडात असतानाच गाडी हलली होती. ते शब्द त्या देव माणसापर्यत पोहचले नव्हते.

अर्ध्याच तासाने ती तिच्या गावाला पोहचली. तिला न्यायला तिचा नवरा आला होता. सकाळी सातला बसलेली संध्याकाळच्या सातला पोहोचली होती. आज तिची गोकुळाष्टमी कडकडीत झाली होती.

त्यानंतर गावाला जाताना बस बीड स्टॅन्डमध्ये आली की तो कंडक्टर शोधत असे.  त्याला धन्यवाद म्हणायचे राहून गेले. ही खंत तिच्या मनात कायम राहिली.

ओळख ना पाळख पण तो कृष्णरुपाने  मदत करायला आला होता.


"आजी सांग ना?  देवाला कुणी थँक्स म्हणतं का, थँक्स तर माणसाला म्हणतात."
गार्गीच्या वाक्याने वसुधा भानावर आली.

"खरंच की, देव मदत करतो त्याला कशाची  अपेक्षा नसते. अपेक्षा फक्त माणसाला असते." म्हणत वसुधाने मनापासून कृष्णाला हात जोडले.

सौ. वर्षा लाड
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Varsha Lad

//