मैत्रीचा गाव

विश्वासावर फुललेल्या मैत्रीच्या गावाची गोष्ट

सकाळासूनच फोन सतत खणखणत होता.बातमीच तेवढी मोठी होती.साहित्य क्षेत्रातील सर्वात मानाचा बुकर पुरस्कार यशवंत देशमुख यांना जाहीर झाला होता.इतका मानाचा पुरस्कार मिळाल्याने सर्वजण आनंदित होते.मुलगा ,सून आणि बायको तिघे बेत ठरवत होते.इतक्यात यशवंरावांचा आठ वर्षांच्या नातू वरद आत आला,"आजोबा,आज तुला बक्षीस मिळाले आणि आज फ्रेंडशिप डे सुद्धा आहे.किती छान."

यशवंत मात्र शांतपणे सगळ्यांकडे पहात होता.इतकी सुशील बायको,मुलगा आणि सून शिवाय वरदसारखा गोंडस नातू.सगळे कसे सुंदर सुरेख.इतक्यात फोन वाजला. यशवंरावांनी फोन घेतला.फोन ठेवल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी होते.

वरद त्यांना म्हणाला,"आजोबा कोणाचा फोन होता?तुम्ही का रडताय?"

यशवंत हसत म्हणाले,"आज मैत्रीचा दिवस आहे ना.मग माझ्या अशाच एका मित्राचा फोन होता."

वरद हसला,"अरे वा,मला सांगा ना तुमच्या फ्रेंड्सबद्दल."वरद विचारत असताना यशवंत केव्हाच भूतकाळात पोहोचला होता.


अतिशय हुशार असणारा यशवंत शाळेत शिक्षकांचा खूप लाडका.कायम यश आणि कौतुक झेलून लहानगा यशवंत नाही म्हंटले तरी जरा ग ची बाधा झालीच होती.मुल आपल्याशी मैत्री करतात ती आपण हुशार असल्याने असे त्याला वाटत असे.प्राथमिक शाळेतून हायस्कूल मध्ये गेल्यावर मात्र चित्र बदलू लागले.शिक्षकांकडून होणारे कौतुक कमी झाले.यशवंत हळूहळू आत्मविश्वास गमावू लागला.त्याचवेळी त्याला तो भेटला.विनय गावडे.


अभ्यासात जेमतेम असला तरी खूप स्वाभिमानी,मित्रांमध्ये प्रचंड लोकप्रिय.सुरुवातीला सुर काही फार जुळले नव्हते.परंतु दहावीला असताना खऱ्या अर्थाने मैत्री बहरू लागली,फुलू लागली.अशातच दहावीचा निकाल लागला.आजवर कायम उत्तम गुण मिळवणाऱ्या यशवंतला सेकंड क्लास मिळाला.आजवर कौतुक करणारे क्षणात टोमणे मारू लागले,"एवढेच गुण?कसे काय?आता कसे होईल तुझे?"

सैरभैर झालेल्या यशवंतच्या पाठीवर तेव्हा एकमेव हात होता विनयचा.विनय हसून म्हणाला,"हे मार्क्स तुझी बुद्धी घेऊन गेले नाहीत.उठ आणि परत सर्वांना दाखवून दे."


यशवंत परत जोमाने अभ्यासाला लागला.पण...दुर्दैव असे की वैद्यकीय अडचणीमुळे त्याला अकरावीत घरी रहावे लागले.आजवर गुणी,यशस्वी असलेला यशवंत आता पुरता खचला होता.सगळीकडे अंधार होता.त्याही वेळी विनय त्याच्या बरोबर आला,"यशा रडतोय काय?अरे हे वर्ष सुद्धा जाईल.तू किती छान निबंध लिहायचास.आतासुद्धा लिही काहीही सुचेल ते."विनयने लेखनाचे बीज यशवंतच्या मनात पेरले.


पुन्हा अकरावीला प्रवेश घेतला तेव्हा विनय म्हणाला,"आता परत एकदा सगळ्यांना कळू दे,तू कोण आहेस ते.माझा शब्द राखशील ना."

यशवंत म्हणाला,"विनू,तू म्हणालास ना.मग बघच आता."

बारावीला यशवंत पहिल्या तीनमध्ये होता.याचा सर्वाधिक आनंद विनयला झालेला.त्यानंतर यशवंतने अध्यापक विद्यालयात प्रवेश घेतला.हस्तलिखित मासिकासाठी कविता दिली आणि दुपारी सिनियरच्या वर्गातून एक मुलगी त्याला शोधत आली,"किती छान लिहितोस तू.कायम लिहीत रहा."

त्यानंतर खूप गप्पा मारल्या.शेवटी जाताना ती म्हणाली,"मी सुमन,आजपासून आपण मित्र आहोत रे."


कॉलेजमधील त्या वर्गात यशवंत मधील लेखक चारही अंगाने बहरला.

यशवंरावांनी डोळे पुसले.आजही त्याच्या लिखाणावर विनय आणि सुमन काय म्हणतील याची उत्सुकता जास्त असे त्याला.पण गेली तीन वर्ष त्यांच्या मैत्रीला दृष्ट लागली.सुमन अचानक गायब झाली.तिला कितीही शोधले तरी ती सापडेना.विनयसुद्धा हल्ली फोन करत नसे.तो मोठा उद्योजक आहे नसेल त्याला वेळ असे म्हणून यशवंत सोडून देई.गेले तीन वर्ष तो स्वतः घरात बंदिस्त होऊन ही कादंबरी लिहीत होता.आज त्या कष्टाचे सार्थक झाले होते.हे उत्तुंग यश आपल्यात लेखनाचे बीज पेरणाऱ्या मित्रांनी पहावे असे त्याला मनापासून वाटत होते.


त्याने अरुणाला फोन लावला,"अरुणा,सुमन कुठे असते रे हल्ली."

अरुणा म्हणाली,"माहित नाही रे यशवंत.तिच्या मुलीचा नंबर पण बंद आहे."

यशवंत निराश झाला.दुसरा फोन त्याने विनयच्या घरी लावला.फोन नोकराने उचलला,"साहेब कामात आहेत."


फोन आपटला गेला.यशवंत खूप निराश होता.इतक्यात बायकोने हाक मारली,"अहो,ऐकलत का!"

यशवंतने स्वतः ला सावरले.तो बाहेर आला.मूलगा म्हणाला,"बाबा,संध्याकाळी एक छोटीशी मेजवानी ठेवतोय आपण."

सून उत्साहाने म्हणाली,"तुमच्या काही सहकारी मित्रांना बोलवायचे का?"

यशवंत पटकन म्हणाला,"मित्र?सहकारी?नकोच."

वरद परत म्हणाला,"आजो,बोलावं की,तुमचा फ्रेंडशिप डे पण करू आपण."

बायको जवळ आली,"अहो,निदान शाळेतले.सहकारी,कॉलेजातील काही मित्र.नाही बोलावले तर बरे दिसत नाही."

यशवंत म्हणाला,"ठीक आहे.तुला सगळेजण माहित आहेत.बोलावं तुला वाटेल त्यांना."


सगळ्यांनी तयारी सुरू केली.दिवसभर प्रकाशक,सहकारी,नातेवाईक सगळ्यांचे फोन येत होते.काहीजण भेटायला आले.पण यशवंत वरून आनंदी असला तरी आतून दुःखी होता.आपण जेव्हा कोणीच नव्हतो तेव्हा आपल्या लेखनाला बळ देणारे,कौतुक करणारे नाहीत.त्याला खूप वाईट वाटत होते.

इतक्यात बायको आत आली,"अहो, सकाळासून पाहतेय,तुम्ही उदास आहात.काही होतय का?बरे वाटते ना?"

यशवंत तिचा हात हातात घेऊन म्हणाला,"दामिनी,माझ्या लेखनाचा व्यावहारिक व्याप तू सांभाळला.पण..."

दामिनी हसली,"तुम्हाला सुमन आणि विनयची आठवण येतेय ना.दोघांनाही खूप शोधले मी."


यशवंत म्हणाला,"आज ते दोघे पाहिजे होते.मी लेखनात बुडालो की माझ्याशी न बोलता तुझ्याकडुन ऐकायचे सगळे.आज त्यांची खूप आठवण येतेय."

दामिनी हसली,"आपण उद्या विनयच्या घरी जाऊ,सुमनला शोधून काढू.पण आता चेहरा हसरा ठेवा.मुलांना वाईट वाटेल हो."

यशवंत तयार झाला.तलम पांढरा कुर्ता,सरळ नकार शोभणारा चष्मा,तेजस्वी काळे डोळे आणि या सगळ्यांना शोभणारे रुपेरी छटा असलेले केस.दामिनी पहातच राहिली.सुरुवातीला तिला सुमन आणि यशवंत इतके क्लोज असलेले खटकत असे.पण नंतर तिला उमगत गेले की त्यांच्यात मैत्रीचे अतिशय सुंदर नाते आहे.दमिनिने ते नाते कौतुकाने जपले.

विनय तर तिलाही यशवंत इतकाच हक्काचा होता.तेवढ्यात तिने यशवंत कडे पेन दिला.यशवंत हसला,"तुला आठवत,हा पेन विनयने दिला होता.पाहिले पुस्तक आले तेव्हा."


दामिनी हसत म्हणाली,"तुम्ही या पेनने सही केली म्हणून रुसले होते मी."

तेवढ्यात समोर रायटिंग टेबल दिसला.दामिनी आणि सुमन दोघींनी मिळून आणलेला.पैसे मात्र सुमनने दिले होते हट्टाने.


आठवणी अशा बरसत होत्या.आषाढातील पावसासारख्या.तितक्यात वरद आत आला,"आज्जो चल लवकर.निघायचे आहे आपल्याला."

दोघांचे हात धरून त्यांना बाहेर घेऊन आला.गाडी एका लयीत धावू लागली.शहरातील एका प्रतिष्ठित हॉटेलच्या आवारात गाडी थांबली.यशवंत आत आला.सगळीकडे कौतुक चालू असलेले पाहून त्याला पहिलीच्या वर्गात त्याचे कौतुक करणारे गुरुजी आठवले.समारंभ सुरू झाला.अनेकजण शुभेच्छा देत होते.कौतुक करत होते.आता यशवंत बोलायला उभा राहिला.


त्याने चष्मा चढवला.श्रोतेहो,आज माझ्या लेखनाचा बहरलेला प्रवास सर्वांना दिसतो.ह्या प्रवासाचे बीज रोवणारे,....अचानक यशवंत थांबला.दारातून एक कृश,हाडकुळी,डोक्यावर केस नसलेली बाई चालत येत होती.त्यामागून काठी टेकत विनय आत येत होता.यशवंत झटकन खाली उतरला.धावत निघाला.


प्रवेशद्वारावर दोघांना गाठले,"सुमे, विन्या?"

सुमन हसली,"रागावू नको रे.गेले तीन वर्ष कॅन्सर बरोबर लढत होते."

यशवंत म्हणाला,"विनय,तुला काय झालं?"विनय हसला,"अरे छोटे मोठे अपघात होत असतात."

यशवंत म्हणाला,"म्हणजे,मी लिहित असताना इकडे तुम्ही..."

यशवंत झटकन रागाने मागे फिरला.दोघेही एकदम म्हणाले,"यशवंत,तुला हे सगळे समजले असते तर तू लिहू शकला नसतास.दामिनी वाचून दाखवत असतानाच ही कलाकृती भन्नाट असेल हे कळत होते.तुझ्या लेखनाच्या प्रेमात आहोत रे आम्ही.म्हणून दामिनीला गळ घातली.आमच्या मित्राला काहीही कळू देऊ नकोस."


सुमन पुढे म्हणाली,"हो,पण मृत्युला सांगितलं होत बजावून एकदा यशवंतचे कौतुक करू दे.खर सांगू,तू कादंबरीत पुढे काय लिहिणार?ही उत्सुकता जगायला बळ देत गेली."

विनय म्हणाला,"अगदी खरे,तू नेहमी म्हणतोस ना,माझ्यातला लेखक तुम्ही जन्माला घातला.तर आज हे दोन मित्र मृत्युला हरवून परत आलेत ते तुझ्या लेखनाचा हात धरून.तुझ्या नायकाची जगायची दुर्दम्य इच्छा,त्याचा संघर्ष आम्हाला हरू देत नव्हता."


यशवंत आता मागे फिरला.विनयला कडकडुन मिठी मारली.सुमन आणि विनयला घेऊन यशवंत व्यासीठावर चालत जाऊ लागला.


संपूर्ण सभागृह मैत्रीचा तो अनुपम सोहळा अनुभवत होते.यशवंत आता मनापासून आनंदी होता.त्याचे कुटुंब त्याच्या बरोबर होतेच पण त्याला अंधाऱ्या वळणावर सावरणारे जिवलग त्याच्या बरोबर होते.इतक्यात बाहेरून खणखणीत आवाजात अरुणा म्हणाली,"सूमे, यशा कॉलेजात टाळ्या वाजवायला आम्ही पण होतो बर."

यशवंत हसत म्हणाला,"आरू,तू सगळ्यांना घेऊन येणार ठाऊक होत.मन कातर होते ते या दोघांसाठी.आजचा मैत्रिदिवस खऱ्या अर्थाने साजरा झाला आता."


त्यानंतर संपूर्ण सभागृहात कल्ला आणि गप्पांना उत आला.दामिनी हळूच यशवंतकडे आली,"आता आनंदी आहेस ना तू."

यशवंत हसला,"तू असताना कोणतेही नाते तुटेल का? मैत्रीचे पावित्र्य तू समजावून घेतले नसतेस तर सुमी आज इथे नसती."

दामिनी हसत म्हणाली,"यशा मित्र हे फक्त मित्र असतात त्यात पुरुष स्त्री असे काहीच नसते."


आज पुन्हा एकदा मैत्री जिंकली होती.मैत्रीने तिचे नाव सार्थ केले होते आणि यशवंत त्याच्याच कवितेच्या काही ओळी म्हणत होता.
क्षितिजापलीकडे आहे
एक विश्वासाचे गाव
दोस्तांनो त्यालाच तर
मैत्री असे नाव.....