मैत्रीचा धागा भाग २

It's All About Friendship

मैत्रीचा धागा भाग २


"काही नाही. तुम्ही आरुषला त्या चेअरवर बसवा." डॉ वीणाने सांगितले.


नयनाला डॉ वीणाचे बोलणे थोडे वेगळे वाटले होते, पण आता त्यांना पुन्हा कसं हे विचारायचं? हे नयनाला कळत नव्हते.


आरुष नयनाचा हात धरुन घाबरतचं डेंटल चेअरवर बसला. डॉ वीणा आरुष जवळ जाऊन म्हणाली,

"आरुष तुझी फ्रेंड श्रेया एकटीच चेअरवर बसली होती. तिला जर कळलं की, तू एवढा घाबरला होता म्हणून, तर ती तुमच्या वर्गात सर्वांना हसून हसून सांगेल की, आरुष हा एक भित्रा मुलगा आहे. तुला सगळेजण भित्रा म्हणून चिडवतील." 


लगेच आरुषने नयनाचा हात सोडला आणि एकदम शूर मुलासारखा बसला. डॉ वीणाने आरुष सोबत गप्पा मारता मारता त्याच्या दातांची तपासणी केली आणि एक्सरेही काढला. आरुष एकदम शांत बसला होता. आरुषकडे बघून त्याच्या आई-बाबांना आश्चर्य वाटले होते.


"आरुष तू ब्रश करतोस का?" डॉ वीणाने विचारले.


"हो पण कधीतरी." आरुषने उत्तर दिले.


डॉ वीणा म्हणाली,

"बरं. आरुष हे दात आपल्याला कोणी दिले?"


"देवबाप्पाने." आरुषने पटकन उत्तर दिले.


"तू दररोज अंघोळ करतो का?" डॉ वीणा.


"हो. दररोज अंघोळ केली नाही,तर अंगाचा घामाचा वास येतो. मी मित्रांसोबत मातीत खेळतो, तर माझं पूर्ण अंग धुळीने खराब होतं. अधून मधून मी संध्याकाळी खेळून आल्यावर सुद्धा अंघोळ करतो." आरुष.


"आरुष बाळा तू दररोज जेवण करतोस, चॉकलेट, बिस्कीट खातोस. देवबाप्पा वाटलं की, आरुष दिवसातून दोनदा अंघोळ करुन शरीर स्वच्छ करतो, पण तो ब्रश करत नाही म्हणजे आरुषला दातांची गरजचं नाहीये. ब्रश न केल्याने आरुषचे दात किडले आहेत, त्यामुळे ते दुखायला लागले आणि आरुषला जेवण करता येत नाही. आता आपल्याला किडलेले दात बरे करुन देवबाप्पाला दाखवून द्यायचे आहे की, आरुषला दातांची गरज आहे. 


आरुष आजपासून दोन वेळेस ब्रश करेल म्हणजे त्याचे दात किडणार नाही. आता किडलेले दात बरे करण्यासाठी आरुषला माझ्याकडे चार ते पाच वेळेस यावं लागेल. आरुष न रडता ट्रीटमेंट करणार ना." डॉ वीणा असं बोलल्यावर आरुषने हसून मान हलवून होकार दिला.


डॉ वीणा ज्या पद्धतीने आरुषला सगळं काही समजावून सांगत होती, ते नयना व तिचा नवरा मन लावून ऐकत होते. डॉ वीणा एवढी फेमस का आहे? हे नयनाला समजलं होतं. आरुष सोबत बोलून झाल्यावर डॉ वीणाने त्याला चेअरवरुन उतरुन आई शेजारी जाऊन बसायला सांगितले.


डॉ वीणा आरुषच्या आई बाबांसमोर येऊन बसली. डॉ वीणाने एक्सरे दाखवून आरुषला रुट कॅनाल करण्याची आवश्यकता आहे हे सांगितले. 


"चहा घेणार की कॉफी?" डॉ वीणाने नयनाकडे बघून विचारले.


"नाही नको. आरुषच्या ट्रीटमेंटला पूर्ण खर्च किती लागेल?" आरुषचे बाब म्हणाले.


"असं कसं. मैत्रिणी सोबत चहा घेऊन बरीच वर्षे झाली आहेत, शिवाय तुम्ही माझ्या क्लिनिकला पहिल्यांदा आला आहात." डॉ वीणा आपल्या चेहऱ्यावरील मास्क काढत म्हणाली.


"वीणा तू!" नयना आपल्या जागेवरुन उठत म्हणाली.


"हो मीच. तू जरी मला विसरली असशील तरी मी तुला विसरले नाही." डॉ वीणाने सांगितले.


डॉ वीणा व नयनाच्या संभाषणावरुन त्या दोघी मैत्रिणी होत्या, हे तर कळलं, पण नयना डॉ वीणाला का विसरली असेल? बघूया पुढील भागात…


©®Dr Supriya Dighe









🎭 Series Post

View all