मैत्रीचा धागा भाग १

It's All About Friendship

मैत्रीचा धागा भाग १


"मिसेस साठे तुम्ही आरुषला घेऊन डॉक्टर वीणाकडे घेऊन जा. मी त्यांचा पत्ता तुम्हाला देते, त्या खूप चांगल्या डॉक्टर आहेत. आमच्या श्रेयाची ट्रीटमेंट मी त्यांच्याकडेचं केली होती." सुमतीने आरुषच्या आईला म्हणजेच नयनाला सांगितले.


यावर नयना म्हणाली,

"आरुष रात्रभर वेदनेने विव्हळत असतो. नीट जेवणही करत नाहीये. डॉक्टर कडे जायचं हे म्हटलं तरी घाबरतो आहे. आता कसं करावं? हेच कळत नाहीये. आरुषच्या बाबांना सोबत नेल्याशिवाय पर्याय नाहीये."


"श्रेया तर त्यांच्या केबिनमध्ये घुसायला तयार नव्हती, पण डॉ वीणा तिच्यासोबत इतक्या सॉफ्ट भाषेत बोलल्या की, तिची व त्यांची चांगलीचं गट्टी जमली. डॉ वीणा जेवढा वेळ पेशंटला देतात तेवढा वेळ कोणीच देत नाहीत. तुम्ही एकदा आरुषला त्यांच्याकडे घेऊन तर जा. तिकडे गेल्यावर श्रेयाचा रेफरन्स द्या." सुमतीने सांगितले.


"हो. मी आज संध्याकाळी त्यांच्याकडे आरुषला घेऊन जाते. मला त्यांचा पत्ता व्हाट्सएपवर पाठवून ठेवा." नयना म्हणाली.


दोघीजणी शाळेच्या आवारात बसून गप्पा मारत होत्या. आरुष व श्रेया एकाच वर्गात होते. शाळा सुटण्याच्या वेळी नयना व सुमतीची दररोज भेट व्हायची.


"अहो ऐका ना. श्रेयाच्या आईने डॉ वीणाचा पत्ता दिला आहे. आपण एकदा आपल्या आरुषला त्यांच्याकडे घेऊन जाऊयात ना?" नयना नवऱ्यासोबत बोलत होती.


"नयना आपण नक्कीच आरुषला त्यांच्याकडे घेऊन जाऊयात, पण डॉक्टरकडे जाऊन आरुषची ट्रीटमेंट करायची म्हटल्यावर पैसे भरपूर लागतील. ह्या महिन्याचं बजेट जमणार नाही. श्रेयाच्या घरची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे. त्यांच्या ओळखीतील डॉक्टर म्हटल्यावर फी जास्तचं असेल." आरुषचे बाबा म्हणाले.


नयना थोडी वैतागून म्हणाली,

"आपण एकदा त्यांच्याकडे जाऊन तर येऊ, मग पैश्यांची व्यवस्था कुठून करायची ते बघू. नेहमी फक्त पैसा पैसा करत असतात. मी नोकरी करायची म्हणते, तर तेही तुम्ही करु देत नाही. आरुष एका आठवड्यापासून नीट जेवण करत नाहीये."


यावर आरुषचे बाबा म्हणाले,

"बरं बाई. आपण आजचं संध्याकाळी डॉक्टरकडे आरुषला घेऊन जाऊयात."


आरुषच्या आई- बाबांच्या चर्चेवरुन त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती, हे आढळून आले. 


संध्याकाळी आरुषला त्याचे आई-बाबा डॉ वीणाकडे घेऊन गेले. डॉ वीणाकडे बरेच पेशंट नंबर लावून बसलेले होते. डॉ वीणाचे क्लिनिक पॉश होते. रिसेप्शन एरियात लहान मुलांना बसण्यासाठी स्पेशल खुर्च्या होत्या. खुर्च्यांजवळ भिंतीला चिंटूच्या विनोदाची कात्रणे लावलेली होती. 


डॉक्टरकडे नाही जायचं म्हणून रडणारा आरुष चिंटूचे विनोद वाचत मस्त रमला होता. आरुषच्या पुढे पाच ते सहा नंबर असल्याने आरुषला व त्याच्या आई बाबांना वाट बघावी लागणार होती. रिसेप्शन एरियात बाकीच्या भिंतींना वेगवेगळे मोटिव्हेशनल सुविचार चिटकवलेले होते, ते वाचून मन प्रसन्न होत होते. एका कोपऱ्यात नऊ ते दहा मराठी पुस्तके होती. वेटींग एरियात बसून वेळ कसा घालवावा हे समजत नसते, त्यावर पुस्तकं हा पर्याय चांगला होता, त्या निमित्ताने वाचन व्हावं हाच डॉ वीणाचा हेतू होता.


काही वेळाने आरुषचा नंबर आल्यावर रिसेप्शनिस्टने आरुष व त्याच्या आई बाबांना केबिनमध्ये पाठवले. डॉ वीणाच्या चेहऱ्यावर मास्क होते, तसेच डोळ्याला चष्मा होता. 


"पेशंट कोण आहे?" डॉ वीणाने मृदू आवाजात विचारले.


आरुष भेदरलेला होता. "आरुषचा दात किडलेला आहे. एक आठवड्यापासून तो नीट जेवण करत नाही. रात्रभर दात दुखतो म्हणून रडत असतो. श्रेया गोखले तुमची पेशंट होती ना. श्रेया व आरुष एकाच वर्गात आहेत. श्रेयाच्या आईनेच तुमचा रेफरन्स दिला होता." नयनाने एका दमात सांगितले.


"अच्छा, आता तुला माझ्याकडे यायला कोणाचा तरी रेफरन्स लागतो आहे तर…." डॉ वीणा म्हणाल्या.


"म्हणजे?" नयनाने आश्चर्याने विचारले.


डॉ वीणाच्या बोलण्याचा अर्थ काय असेल? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all