मैत्री, प्रेम अन बरंच काही..... भाग 4

मैत्रीतलं प्रेम अन प्रेमातील मैत्री आणि नात्यातील गोडवा

मैत्री, प्रेम अन् बरंच काही.... ( टीम : मिळून साऱ्याजणी ) भाग 4

मागील भागात आपण पाहिले :

आईच्या आठवणीने अनघाच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. तिने आईला फोन केला. आईला आपल्या लेकीच्या बदललेल्या आवाजावरून परिस्थिती लक्षात यायला वेळ लागला नाही. अनघाने आईजवळ मन मोकळं केलं.

आता पुढे :

अनघाची आई म्हणाली,"अनघा राजा,सुरुवातीला अशा कुरबुरी होणारच. त्या मनाला लावून नाही घ्यायच्या. ती सगळी तुझीच माणसं आहेत. माझी खात्री आहे, तू हळूहळू आजीचं,आत्याचं मन नक्की जिंकशील. ऑफिसातलं टारगेट पुरं करंच पण घरच्यांनाही समजून घे आणि काळजी घे स्वत:ची बाळा."

आईसोबत बोलल्याने अनघाला अगदी मोकळं वाटलं. तिने आपल्या कामावर जास्त लक्ष केंद्रित करण्याचं तसंच  घरातल्यांना समजून घेण्याचं ठरवलं.  तिने ठरवलं, रोज सकाळी लवकर उठून; घरचं सगळं आवरून मगच ऑफिसला निघायचं.
दुसऱ्या दिवशीच्या स्वयंपाकाची तयारी तिने रात्रीच करून ठेवली.

-----------

सगळं आवरुन अनघा बेडरूममध्ये गेली.  सागर गप्पगप्पच होता. अनघाला सागरचा अबोला सहन होईना. तिने सागरचा हात धरत त्याला स्वतःकडे वळवलं.

"सागर.. माझं काही चुकतय का रे..?"अनघाने विचारलं.

"असं का विचारतेस?"सागर म्हणाला.

"सांग ना रे. तुझा हा अबोला,मला आत्ता सहन होत नाहीये,"अनघा सागरचा हात हातात घेत म्हणाली.

"हे बघ अनघा, रात्र फार झालीय. सकाळी लवकर उठायचंय. नाहीतरी आता तुझ्यासाठी तुझा प्रोजेक्ट महत्त्वाचाअसेल, हो ना!"अनघाच्या हातातून आपला हात सोडवून घेत सागर म्हणाला.

"तुझा काय? हा आपला प्रोजेक्ट आहे. आपण एकाच कंपनीत काम करतो आणि याचा फायदा आपल्या कंपनीला होत असेल तर ते कर्तव्य पार पाडणं, ही आपली जबाबदारी आहे." अनघा म्हणाली

"ऑफिसच्या कामाबरोबर, घराबद्दलही काही कर्तव्य व जबाबदाऱ्या आहेत तुझ्या. त्याही सांभाळ म्हणजे झालं. तुझ्या प्रोजेक्टचा त्रास आजीला होता कामा नये." सागर म्हणाला

"हो सागर. त्याची मी पुर्ण काळजी घेईन. फक्त तू माझी साथ सोडू नकोस. हे प्रोजेक्ट तुझ्याचमुळे मिळालंय मला."

"म्हणजे?"

"माझ्यासाठी माझं करियर किती महत्त्वाचं आहे, हे तुला चांगलंच माहित आहे सागर.  लग्नानंतर माझी पहिली प्रायोरिटी माझं करियर असेल,  हे मी तुला सांगितल्याचं आठवतंय तुला? त्यावर तू मला, तुझ्यासाठी माझं करियर ही अभिमानाची गोष्ट असेल, असं म्हणाला होतास.

सागर, तुझी साथ,तुझं प्रोत्साहन नसतं तर आज माझ्या करियरला जी गती मिळाली आहे ती  कदाचित नसती मिळाली." अनघा म्हणाली

सागरला काय बोलावं हे सुचत नव्हतं. तो मनाने भूतकाळात गेला. त्याला आठवलं, एकेकाळी अनघाची प्रगती पाहून त्याचा ऊर अभिमानाने भरून यायचा.. आणि आज मात्र अनघा,  त्याच्या प्रेयसीतून त्याच्या पत्नीच्या भूमिकेत येताच, तिच्या प्रगतीमुळे त्याचा अहं दुखावला होता. सागरला स्वत:चीच लाज वाटली.

---------------

अनघाच्या प्रोजेक्टबद्दल आज कंपनीचे सीईओ आणि इतर महत्त्वाच्या लोकांसोबत तिची मीटिंग होती. तिला लवकर ऑफीसला पोहोचायचं होतं. शर्वरीने, तिला ऑफीसला जाण्यास सांगून घरातलं सगळं ती आवरेल असं आश्वासन दिलं.

अनघा ऑफिसला गेल्यानंतर किर्तीआत्या व आजी गप्पा मारू लागल्या.
"आई,जर मला सांगितलं असतंस ना तर मी तुला शर्वरीसारखीच सून आणून दिली असती." किर्तीआत्या म्हणाली.

आजोबा, मायलेकींचं बोलणं झोपाळ्यावर बसून ऐकत होते. 'कुठेतरी चुकतंय. आमचीच लेक आमच्या नातसुनेच्या संसारात काड्या घालतेय. हे सगळं वेळीच थांबवायला हवं,'आजोबांनी मनाशी विचार केला.

"अहो मी काय म्हणतेय, अनघाला आपण तिची नोकरी सोडायला सांगुया का..? मला पटत नाही, तीचं हे उशिरा येणं. तिची काळजी वाटून रहाते मनाला, ती वेगळी. शिवाय घरातलंही तिला तितकसं जमत नाही. घरात राहिली तर माझ्या हाताखाली चार रीतीभाती शिकेल. ते काही नाही. मी आजच सागरशी बोलते आणि तीचं हे ऑफिसला जाणं बंद करून टाकते," आजी काशाच्या वाटीने आजोबांच्या पायाचे तळवे घासत आजोबांना म्हणाली.

"तू असं काही करणार नाहीएस,"आजोबा म्हणाले.

"अहो पण का..?"आजीने विचारलं.

"हे बघ. अनघा आपली नातसून आहे म्हणजे आपल्याला हवं, तशीच ती वागली पाहिजे, असं म्हणून चालणार नाही. अनघा स्वतंत्र आहे. स्वतःच्या पायावर उभी आहे. अशा वेळी आपण तिला साथ देऊन अजून भक्कम केलं पाहिजे,"आजोबांनी आजीला सुनावलं.

" माझ्या पसंतीची नातसून आणली असती तर हे सगळं झालंच नसतं. घरात छान रुळली असती, ती दुधात साखर विरघळावी तशी आणि तिनं आपली काळजीही घेतली असती. ती समीरची शर्वरी बघा, कशी आपल्या घराची काळजी घेते. अगदी तशीच नातसून हवी होती मला."

आजोबा आजीची समजूत घालू लागले,"हे बघ,आपली अनघा कामाच्या जबाबदारीसोबत नाश्ता,स्वैंपाक,केरवारा,भांडीकुंडी अशी घरची कामंसुद्धा  करतेय. तू देखील पहातेस ना, तिची किती दमछाक होतेय ते. तरीही तक्रार न करता सगळं अगदी हसतमुखाने करते  पोर. मला तर तिचा फार अभिमान वाटतो. तुलाही वाटला पाहिजे."

"तुमचं म्हणणं बरोबर आहे पण.."

आजोबा आजीची समजूत काढत म्हणाले,"अनघाला तिच्या व्यस्त कामकाजामुळे  आपल्याकडे बघायला  पुरेसा वेळ मिळत नाहीए पण आपलीही तिच्या प्रति काही कर्तव्य आहेत की नाही? तिला खूश ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, त्यासाठी आपल्याला जमेल तशी आपण तिला मदत करू व तीचं काम हलकं करु.

मला दिसतंय,घरकाम वाढलंय. एखादी मदतनीस बघुया म्हणजे अनघावरचा ताणही थोडा हलका होईल बघ आणि तुझीही चिडचिड होणार नाही. वयाच्या मानाने तुलाही आत्ता पहिल्यासारखी कामं झेपत नाहीत.

आपल्या लेकीचा, किर्तीचा स्वभाव तुला ठाऊक का नाही! किर्ती म्हणजे कुत्र्याचं शेपूट,कितीही नळीत घातलं तरी वाकडं ते वाकडंच. तू मात्र तिच्या नादी लागू नकोस. अनघाला सांभाळून घे."

आजीला आजोबांचं म्हणणं पटलं नि स्वतःची चूकही उमगली. ती आजोबांना म्हणाली," त्या किर्तीने माझ्या डोक्यात एकेक उलटसुलट  विचार भरवले आणि मीही हलक्या कानांनी तिचं ऐकलं पण तुम्ही वेळीच माझ्या डोळ्यात अंजन घातलंत.'

आजीच्या मनातला गैरसमज आजोबांनी चुटकीसरशी दूर केला. आजोबांना आवाज देण्यासाठी आलेल्या सागरने आजीआजोबांचं सारं बोलणं ऐकलं होतं. त्याच्याही मनात असलेलं अनघाबद्दलचं  उरलंसुरलं मळभ दूर झाल्याने  त्याला फार प्रसन्न वाटलं.

--------------

संध्याकाळी घरी परतायला उशीर झाल्याने अनघा पटापट पावलं उचलत होती. आज दिवसभराच्या धकाधकीत तिला, सागरला भेटता आलं नव्हतं.

सागर नाराज असेल, आत्या व आजीलादेखील आज परत उशीर झालेला आवडणार नाही, घरी जाऊन स्वैंपाकाची तयारी.. ह्या सगळ्या विचारांनी तिला फारच थकल्यासारखं झालं.

विचारांच्या तंद्रीतच ती दाराजवळ पोहोचली. तिने बेल वाजवली पण काहीच प्रतिसाद आला नाही म्हणून तिने आपल्याजवळ असलेल्या एक्स्ट्रा किल्लीने दार उघडलं तसा तिला आश्चर्याचा धक्काच बसला.

अनघाचे आईबाबा,शर्वरी,समीर,आत्या,प्रिया,
आजीआजोबा,..सारे तिच्या स्वागतासाठी उभे होते. साऱ्यांनी एकसाथ 'अभिनंदन' म्हणत टाळ्यांच्या गजरात अनघाचं दमदार स्वागत केलं.
कंपनीचं इतकं महत्त्वाचं प्रोजेक्ट अनघाला मिळालं होतं त्यानिमित्त सागरने छोटंसं गेट टुगेदर ठेवलं होतं,ज्यात अर्थातच समीर व शर्वरीने त्याला खूप मदत केली होती. प्रियाला हा प्लान कळवताच तीही कॉलेजला दांडी मारुन अनघावहिनीचं अभिनंदन करण्यासाठी आली होती.

अनघाला, सागरने दिलेलं हे गोड सरप्राइज फार आवडलं. ती पटकन आत जाऊन फ्रेश झाली. सागरने तिच्यासाठी भेट म्हणून आणलेला मजेंडा रंगाचा सेटीनचा लाँग गाऊन तिने घातला. प्रियाने अनघाला तिच्या गाऊनला साजेसा हलकासा मेकअप करुन दिला.

गळ्यात नाजुकसा हिऱ्यांचा नेकलस, कानात हिऱ्यांचे स्टड्स,हातात तसंच नाजुकसं हिऱ्यांचं ब्रेसलेट घातलेली अनघा इतकी गोड दिसत होती की शर्वरीने काजळाचं बोट अनघाच्या कानामागे लावलं. "शरू तू पण ना," अनघा लाजत म्हणाली.

शर्वरी व आजीने मिळून बनवलेला केक अनघाने कापताच साऱ्यांनी टाळ्या वाजवल्या.

आजीआजोबांनी अनघाबद्दल त्यांना वाटणारा अभिमान सर्वांसमोर व्यक्त केला. तिथे असलेल्या किर्तीआत्याला, हे रूचलं नाही. "अनघापेक्षा सरस मुलीदेखील आहेत जगात..! सागरसाठी किती मिळाल्या असत्या." असं म्हणत आत्यानं नाक मुरडलं.

"हो पण त्यांना माझ्या अनघाची सर नसती आली," असं म्हणत आजीने अनघाच्या गालावर कडाकडा बोटं मोडत अनघाची दृष्ट काढली. आपल्या लेकीचं सासरी होणारं हे कोडकौतुक पाहून अनघाच्या आईवडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.

आजीचं बोलणं ऐकून आत्याला फार अपमानित झाल्यासारखं वाटलं. काही वेळातच ती सगळ्यांचा निरोप घेऊन निघून गेली.

"थँक्स फॉर द सरप्राइज, सागर,"रात्री बेडरुममध्ये सागरच्या गळ्याभोवती हात गुंफत अनघा बोलत होती.

"अनघा, किती सुंदर दिसतेयस तू आज!,"सागर तिच्या गालावर रुळणारी बट कानामागे घेत म्हणाला. त्या रात्री सागरला त्याची पुर्वीची अनघा आणि अनघाला तिचा प्रियकर सागर नव्याने भेटला.

आजीच्या आग्रहानुसार अनघाचे आईवडील एकरात्र त्यांच्याकडे थांबले. दुसऱ्या दिवशी आजीने त्यांना खापरावरचे मांडे खाऊ घातले. अनघाच्या वडिलांनी सांगितलं,"अगदी माझी आई करायची तसे झाल्येत मांडे. खूप दिवसांनी खाल्ले. खरंच तुमचे आभार."

आजी म्हणाली,"आभार कसले मानता,व्याही तुम्ही आमचे. तुमचं आदरातिथ्य करायचं भाग्य मिळालं आम्हाला यातच आनंद. असेच अधनंमधनं येत जा म्हणजे अनघाही खूष राहील."

जाताना अनघाची आई अनघाला म्हणाली,"बघ,अनी, मी तुला सांगितलं होतं नं जरा धीर धर. सगळं व्यवस्थित होईल म्हणून. आज तू तुझ्यातल्या संयमाने,प्रांजळपणाने सासरच्या माणसांना जिंकलस. अशीच मिळूनमिसळून रहा."

----------

आत्या गेल्यापासून अनघाच्या मनावरचा ताण कमी झाला होता. आजीही अनघाच्या कलाने घेऊ लागली होती. मदतनीस शकू दोन्ही वेळची लादीभ़ांडी करुन जात होती. शर्वरी आपणासाठी भाजीपाला आणताना अनघासाठीही आणू लागली. तिला सोयीचं पडावं म्हणून तिच्यासाठी आणलेल्या भाज्या निवडून,मोडून ठेवू लागली.

दिवस कसे छान चालले होते. आत्याचाही अधनंमधनं  फोन यायचा. आजी तिचं तिरसट बोलणं फारसं मनावर घेत नव्हती.

समीर व शर्वरी आठवडाभर गावच्या घरी जाऊन आले. समीरने नवीन घर बांधण्यासाठी, वडिलांकडे पैसे दिले. काही गरज लागली तर नक्की कळवा असं सांगून, चार दिवस आईच्या हातचं पोटभर जेवून ती दोघं परत आपल्या कर्मभूमीकडे वळली.

गावावरुन आल्यापासनं शर्वरीला अस्वस्थ वाटत होतं. बरेचदा तिला गरगरल्यासारखं होई. तिची पाळीही पंधरा दिवस पुढे गेली होती. शर्वरीच्या मनात गोड शंका आली पण तिने आधी स्वत: खात्री करुन घ्यायचं ठरवलं.

मेडीकलमथ्ये जाऊन ती प्रेग्नन्सी चेक करायचं किट घेऊन आली.

आजी ओसरीवर बसली होती. आजीने शर्वरीला म्हंटलं, "काय झालं ग पोरी? एवढ्या घाईत कुठे गेली होतीस?"

शर्वरी म्हणाली,"काही नाही आजी. ते जरा मला बरं वाटत नव्हतं म्हणून मेडिकलमधून औषध आणलं."

आजी म्हणाली," इकडे  ये आधी शरु, इथे बस माझ्या बाजूला."

शर्वरी आजीच्या बाजूला येऊन बसली. आजीने शर्वरीचा चेहरा नीट निरखून पाहिला व म्हणाली,"शरु,मला सांग तुला मळमळतय का? अस्वस्थ वाटतय का तुला?"

"आजी,तुला गं कसं कळलं?"शर्वरीने कुतूहलाने विचारलं.

आजी म्हणाली,"हे केस उगीच नाही पिकलेत."
आजीने हसत तिच्या पाठीवरुन हात फिरवला व म्हणाली,"मला वाटतय,म्हणजे माझा आपला अदमास गं की तू आई होणारेस."

आजीच्या या बोलण्यावर शर्वरी लाजली. तिने आजीला मेडीकलमधून आणलेलं प्रेग्नन्सी चेक करायचं किट दाखवलं. ते पाहून आजीने तोंडात बोटं घातली. म्हणाली,"बघतरी, त्यांनी लिहिलंय तसं करुन."

शर्वरीने आत जाऊन चेक केलं आणि आजीच्या गळ्यात पडत म्हणाली,"आजी गं,तुझा अंदाज अगदी बरोबर निघाला. आजी मी आई होणार,समीर बाबा नि तू पणजी होणार." शर्वरीने आनंदात आजीचा मुका घेतला.
आजीने शर्वरीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला.

शर्वरीसमीरच्या आयुष्यात आनंदाने चाहूल दिली. इकडे अनघा व आजीच्या नात्यातील  कटुताही संपली. आता सगळं छान होईल का? की अजूनही आहे अदृश्य असं एखादं संकट. जाणून घेऊयात लवकरच
पुढच्या भागात.

***

सोनाली शेजाळे

क्रमश:

🎭 Series Post

View all