मैत्री, प्रेम अन बरंच काही..... भाग 2

मैत्रीतलं प्रेम अन प्रेमातली मैत्री, आणि नात्यातला गोडवा

मैत्री, प्रेम अन् बरंच काही....( टीम : मिळून साऱ्याजणी ) भाग 2

मागील भागात आपण पाहिले :

   सागरच्या लग्नाची चर्चा सुरु आहे तेव्हाच सागर अनघाचा फोटो आजीसमोर धरून दोघांच्यातल्या प्रेमाची कबुली देतो.

आता पुढे:

"नातसून म्हणून आवडेल तुला?" सागरच्या प्रश्नावर क्षणभर आजीला काय बोलावं सुचेचना. "अरे पण कित्येक लोक आशा लावून बसलेत. आपल्यातल्याच एखाद्या मुलीशी करुया तुझं लग्न,"आजीने आपलं मत मांडलं.

     " जातपात,आपलंतुपलं काय गं? अखेर संसार दोघांनाच करायचाय," आजोबांनी बसल्याबसल्या सागरच्या पसंतीवर शिक्कामोर्तब केलं.

घरात लग्नाच्या विषयाला उधाण आलं.  खरेदीचे वारे प्रियाच्या डोक्यात एव्हाना घुमायला लागले. अनघाच्या घरुनही लग्नाला हिरवा सिग्नल मिळाला.

अनघाच्या घरी रीतसर बघण्याचा कार्यक्रम पार पडला. लालनिळ्या रंगाच्या जरीकाठाच्या साडीत अनघा फारच सुंदर दिसत होती.

"अनघा, पोरी तू नोकरी करणारी, शिकलीसवरलेली. आम्ही जुनी खोडं. आजपर्यंत सन्मानानं जगलोय. सून म्हणून नाही, लेक म्हणूनच जपू तुला पण कर्तव्य कुणाला सुटल्येत? आमच्यानंतर बहीण भावाला जोडणारा, दोघांच्या नात्याला जपणारा दुवा तुला व्हायचंय," लग्नाची बोलणी करायला आलेली आजी, अनघाला तिच्या भविष्यातल्या कर्तव्यांची जणू जाणीवच करुन देत होती. नातवंडांप्रति काळजी आजीच्या शब्दाशब्दांत पाझरत होती.

"आजी, तुम्ही निश्चिंत रहा, मी सांभाळेन सगळं",अनघा आजीचा हात हाती घेऊन प्रेमाने म्हणाली.

त्याचक्षणी नारळसुपारी देऊन सागरअनघाचं लग्न पक्क झालं. लग्नाचा मुहूर्त काढला. लग्नसमारंभ विधिवत पण साध्या पद्धतीने साजरा करण्याचं ठरलं.

"काय रे दुसरी नाही का भेटली !" गालफटात मारावी, तसे आत्याने शब्दांचे वार केले. "एकशेएक पोरी शोधल्या असत्या तुझ्यासाठी," आत्या फणकाऱ्यात बोलली.

--------------

"उगी रहा बाय. लग्नाला आलीस, चार दिवस आनंदात रहा. मज्जा कर अन् जा आपल्या घरी." आजीच्या बोलण्यावर किर्तीआत्याने तमाशा केला. आनंदावर विरजण घालण्याचं काम आत्याबाई छान प्रकारे निभावत होत्या.

"आत्या, तूच माझी वरमाय. आईबाबांच्यापाठी तुझाच आशीर्वाद," म्हणत सागरने आत्याचा हात हाती घेतला.
पाणावलेले डोळे पदराच्या शेवाने पुसत आत्याने सागरच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला

लग्नमंडपात समीर करवला बनून एकहाती सगळं सांभाळत होता. पाहुण्यांचं आदरातिथ्य, कोणाला काही हवं नको सगळी जबाबदारी समीर मोठया आनंदाने पार पाडत होता. कामाच्या धावपळीत समीरची नजर क्षणभर हॉलच्या शेवटच्या रांगेत खिळली.

त्याला वेडावून सोडलेलं, अप्सरेला लाजवेल असं सौदर्य. अबोली रंगाची सोनेरी बुट्ट्याबुट्ट्यांची काठापदराची साडी, चेह-यावर हलकासा मेकअप, गळयात मोत्यांची माळ अन् लांबसडक केसांत माळलेला मोगऱ्याचा गजरा. सजलीसवरलेली तरी चेह-यावरच्या आनंदाने जणू पाठ फिरवलेली!.

'शर्वरी!! हो शर्वरीच. तब्बल दीड वर्षांनी बघतोय.
स्वप्न तर नाही ना!'. स्वतःला हळूच चिमटा काढत समीर स्वतःशीच पुटपुटला. स्वत:च्या डोळ्यांवर क्षणभर त्याचा विश्वासच बसेना.

शर्वरीला प्रत्यक्ष बघून, त्याचक्षणी तिला जावून घट्ट मिठी मारावी वाटली त्याला. "माझं प्रेम आहे तुझ्यावर", आजवर मनात दडवून ठेवलेलं प्रेम, ओरडून सर्व जगासमोर शर्वरीला सांगावं वाटलं. निदान तिने आपल्याकडे नजर भरुन पहावं म्हणून समीर अक्षरशः तळमळू लागला.

अखेर दोघांची नजरानजर झाली पण दुसऱ्याच क्षणी शर्वरीने आपली नजर फिरवली.

"का टाळतेय ही? कुठलंच नातं नव्हतं का आमच्यात? मैत्रीच्या नात्यानेही तिने मला भेटू नये? आजवर एका क्षणासाठीही तिने माझ्यावर प्रेम केलं नसेल का? एकतर्फी होतं का सगळं? मला  कित्येकदा तिच्या नजरेत दिसलेल्या प्रेमभावनांचं काय?" समीरच्या मनात प्रश्नांचं मोहोळ उठलं.

'का वागतेस अशी?' खडसावून विचारावं, असाही विचार त्याच्या मनात येऊन गेला. शर्वरीला भेटायला पुढे सरसावणार तोच त्याची नजर शर्वरीच्या बाजूच्या खुर्चीवर बसलेल्या तिच्या आईवर पडली.

जाब विचारण्यासाठी पुढे सरसावलेली समीरची पावलं पुन्हा मागे वळली. तिच्या आईची नजर चुकवून, संधी मिळताच तिच्याशी बोलुयात असा विचार मनात आणून समीर पुन्हा पाहुण्यांच्या सरबराईत मग्न झाला.

-------------

शर्वरीचं लग्नात येणंच मुळी अनघासागरकडून  समीरसाठी सरप्राईज होतं. 'दादी अम्मा, दादी अम्मा मान जाओ!' म्हणत आजीला लाडीगोडी लावली, मैत्रीच्या आणाभाका केल्या. हात जोडून आजीला शर्वरीच्या घरी फोन करून लग्नाचं निमंत्रण करायला भाग पाडलं म्हणून आईसोबत का होईना, शर्वरी लग्नाला येऊ शकली होती.

कॉलेज संपल्यानंतर, समीरची शर्वरीशी भेट झाली नव्हती. तिच्या घरातल्या वातावरणामुळे फोनवरही संपर्क साधता येत नव्हता. अनघा कधीकधी तिच्याकडे जातयेत असल्याने अनघाकडून केव्हातरी समीरला शर्वरीची ख्यालीखुशाली कळायची. त्यावरचं तो समाधान मानायचा.

शर्वरीला एकटीला गाठण्याची संधी समीर शोधत होता. पण नशिबाने त्याच्याशी जणू काही अबोलाच धरला होता . शर्वरी समोर होती पण समीर तिला डोळे भरून न पाहू शकत होता न तिच्याशी बोलू शकत होता.

मंगलाष्टके, सुलग्न, सप्तपदी सगळंसगळं आटोपलं, लग्नात प्रिया वेगळ्याच तोऱ्यात मिरवत होती. जेवणंखावणं  आटोपली. पाणावलेल्या डोळ्यांनी लग्नाचा मंगलसोहळा शर्वरी डोळ्यात साठवत होती.

पाठवणीच्या वेळी निरोप देताना, शर्वरी अनघाच्या गळ्यात पडून खूप रडली. तिचे अश्रू फक्त मैत्रिणीपासून दुरावण्यासाठी नव्हते हे समजायला अनघाला फारसा वेळ लागला नाही.

"अनघा, माझ्या मनाविरुद्ध बाबांनी माझं लग्न ठरवलंय. या सापळ्यातून बाहेर पडायचंय मला. मी समीरची वाट पहातेय,"  मोठ्या विश्वासाने शर्वरीने अनघाला कवटाळून आपलं मन मोकळं केलं.

---------------

शर्वरी आणि समीरमधला विरहच, जणू काही त्यांना  एकमेकांमध्ये अधिकाधिक गुंतवत होता. अनेक वर्षांपासून मनात दडवून ठेवलेलं प्रेम, स्वप्नरुपी चांदण्यांचं शिंपण बनून डोळ्यांतून अश्रुरुपात वहात होतं.

माप ओलांडून अनघा घरात आली. शर्वरीचे शब्द तिच्या कानात गुंजत होते. कुठल्याच सोपस्कारात अनघाचं मन लागत नव्हतं.

सासरच्या उंबरठ्यावर प्रियाने दारातच अडवलं.."ए वहिनी उखाणा घे नं " अनघा ओशाळली. पाठ केलेला एकही उखाणा  वेळेवर आठवेना.

शर्वरीच्या विचारात गढलेली अनघा पटकन बोलून गेली "सागरने केला मला सौभाग्याचा आहेर
जीवलग सखीला काढायला हवंय संकटातून बाहेर... "
  
"हा कसला उखाणा?" रागाच्या भरात आत्या बडबडली.

गृहप्रवेश होताच अनघाने शर्वरीबद्दल सर्वांना सांगून टाकलं.

शर्वरीचा निरोप कळल्यापासून समीर वेडापिसा झाला. "माझ्या मनात जे चाललंय तेच शर्वरीच्याही मनात आहे. माझी शर्वरी,माझी शरू माझी वाट बघतेय. मला गेलंच पाहिजे, त्याचं मन म्हणू लागलं.

पण इतकं सोप्पं का होतं सगळं? शर्वरी, माजी आमदार कारखानीसांची मुलगी. त्यांनी तिचं लग्न तिच्या मनाविरुद्ध शहरातील एका श्रीमंत घराण्यात पक्क केलं होतं.

---------------

" आई हे लग्न मला मान्य नाही. मला समीर आवडतो," धीर एकवटून शर्वरी आईला म्हणाली. डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. आपल्या नशिबी आलेले भोग लेकीच्या नशिबी नको म्हणून त्या  माऊलीचा जीव  लेकीसाठी तीळतीळ तुटत होता. तिच्यासाठी आजपर्यंत काहीच न करु शकल्याचं शल्य, तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. आतापर्यंत सोशिकपणे सगळं सहन करणारी ती, लेकीच्या हक्कासाठी चवताळली. मी माझ्या लेकीचं लग्न तिच्या मनाविरुद्ध होऊ देणार नाही, तिने आपल्या नवऱ्याला स्पष्टच बजावलं.

"गरीब,दरिद्री,शेतकरी कुटुंबाची सोयरीक, आमच्या सारख्या नावाजलेल्या कारखानीसांच्या घराण्याशी! वेड लागलंय का?"म्हणत कारखानीसांनी पत्नीला गप्प बसवलं. शर्वरी चोवीस तास नजरकैदेत बंदिस्त झाली. 

आजीआजोबांना शर्वरीचं  तिच्या मनाविरुद्ध ठरवलेलं लग्न खटकत होतं पण विनाकारणच्या भानगडीही नको होत्या. शांत डोक्याने विचार करुन पाऊल उचलणं गरजेचं होतं.

"पोरांनो, लेक आपली काय नि लोकांची काय, काचेचं भांडच. तडा गेला तरी खळकन फुटायचं. जपलं तर आयुष्यभर पुरायचं तेव्हा काय करायचं ते विचारपूर्वक करा."आजीने ताकीद दिली.

"मी प्रेम करतो शर्वरीवर. आजवर तुझ्या केसांत माळलेल्या अबोलीला जसं तू जपलयस तसंच मी जपेन शर्वरीला" समीरने आजीच्या मांडीवर डोकं टेकवलं.

-------------

इन्स्पेक्टर पवार, आजोबांच्या बालमित्राचा मुलगा. आजोबांनी त्यांना बोलावून समीरशर्वरीबद्दल सांगितलं. 'शर्वरी सज्ञान आहे. तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न लावणं हा कायद्याने गुन्हा ठरतो. कायद्याचा आधार घेवून शर्वरीचं लग्न थांबवता येईल,' असं इन्स्पेक्टरच्या तोंडून ऐकलं तसा समीरच्या जीवात जीव आला.

राजकीय कारकीर्द, पोलिसी ससेमिरा आणि बदनामीचा धाक या गोष्टींचा सारासार विचार करुन कारखानीसांनी अखेर माघार घेतली.

     " पोलीस घरापर्यंत आणलेस. घराण्याच्या नावाला काळं फासलस. आजपासून तू मेलीस आमच्यासाठी. जा तोंड काळं कर. यापुढे तोंडही दाखवू नकोस. आम्हाला दुखवून तू कधीच सुखी होणार नाहीस" असं म्हणत कारखानीस तावातावात निघून गेले.
      
आशीर्वादच काय, शर्वरीला त्यांनी नजरभर बघितलं देखील नाही. अंगावरच्या कपड्यानिशी आईचा निरोप घेऊन शर्वरी समीरसोबत बाहेर पडली. एक मुक्त,आनंदी आयुष्य जगायला.

देवाब्राम्हणांच्या साक्षीने, आजीआजोबांच्या आशीर्वादाने, मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत, मंदिरात समीर-शर्वरीच्या डोक्यावर अक्षता पडल्या.

आयुष्याच्या एवढ्या सुरेख वळणावर समीर जोडीदार म्हणून सोबत होता पण मनाच्या हळव्या कोपऱ्यात माहेर नावाचं अंगण दुरावल्याच्या वेदनांनी, राहूनराहून शर्वरीचा कंठ दाटून येत होता.

प्रियाने मात्र लग्नाला जायचंच टाळलं. सागर दादाचा गरीब, मितभाषी, सोज्वळ मित्र समीर नकळत तिला आवडू लागला होता. तिच्याही नकळत समीरसोबत आयुष्य कंठण्याची स्वप्नं मनोमन ती रंगवू लागली.  'समीरवरचं प्रेम कधीतरी दादाला सांगू, दादाही साथ देईल' या एकमेव आशेवर आजपर्यंत ती जगत होती पण सगळंच एकतर्फी असल्याचं तिला कळून चुकलं. आता तिचं प्रेम अव्यक्तच राहाणार होतं.

--------
हातात चांगली नोकरी पण वडिलांच्या डोक्यावरचं सावकाराचं कर्ज, मोडकळीस आलेलं गावचं घर, भावंडांच्या शिक्षणाचा खर्च, वाढती महागाई सर्वच जबाबदाऱ्या पेलाव्या लागत असल्याने समीर आयुष्यात अजूनही स्थिरस्थावर झाला नव्हता. सध्यातरी त्याला शहरात घर घेणं शक्य नव्हतं.

नातेवाईकांनीही पाठ फिरवली. नव्या नवरीला न्यायचं कुठे? तेव्हा सागरची आजीच समीरच्या मदतीला पुढे सरसावली.

आजीने शर्वरीचा आपल्या वाड्यातच गृहप्रवेश केला. आणि माडीवर एका खोलीत दोघांची राहाण्याची व्यवस्थाही केली.

"आजी तुझे पांग मी जन्मोजन्मी फेडू शकणार नाही गं. लवकरच सगळं स्थिरस्थावर झालं की शर्वरी नि माझ्यासाठी मी घराची सोय करेन," म्हणत समीरने आजीला वाकून नमस्कार केला. सुखी राहा म्हणत आजीने सुरकुतलेले थरथरते हात दोघांच्या डोक्यावर ठेवत आशीर्वाद दिला.

सागर, समीर दोघांच्या लग्नानंतर यथोचित  सत्यनारायणाची पूजा पार पडली. घाईगडबडीत उरकलेल्या लग्नाला येवू न शकलेले, समीरचे आईबाबाही पूजेसाठी गावाहून आले.

आपल्या लेकराच्या पाठीशी, एवढी चांगली माणसं आहेत या जाणिवेने दोघांचेही डोळे पाणावले. काळची घ्या, सुखी रहा बाळांना म्हणत, दोन दिवसाच्या मुक्कामानंतर सगळ्यांचा निरोप घेऊन ते पूर्ण समाधानाने आपल्या गावी परतले.

------------------

दोन दिवसांनी महाबळेश्वरला जायची चार तिकिटं सागरच्या हातात ठेवत, 'तयारीला लागा'असं सांगून आजोबांनी चौघांनाही सुखद धक्का दिला.

ही गुलाबी हवा वेड लावी जीवा, हाय श्वासातही ऐकू ये मारवा गुणगुणत सागरने अनघाचा हात हाती घेतला. एकीकडे सागरअनघा प्रणयाच्या धुंदीत पुरते हरवून गेले तर दुसरीकडे शर्वरीच्या चेहऱ्यावर नव्या नवलाईचं तेज असलं तरी चेहऱ्यावरच्या आनंदाने जणू रुसवा धरला होता.  विचारांच्या पल्ल्याड ती हरवलेली भासायची.

समीरने तिच्या मनाची घालमेल ओळखली.  " शर्वरी तू खूश आहॆस ना गं? इथे आल्यापासून पाहतोय, सतत कुठेतरी हरवलेली असतेस. नेमकं काय चाललंय तुझ्या मनात? तू आणि मी, वेगळे आहोत का गं राणी!"

समीरचे प्रेमळ शब्द,आपुलकी, जिव्हाळा आणि काळजी बघून शर्वरीचे डोळे पाणावले. तिने समीरच्या खांद्यावर अलगद डोकं टेकलं व म्हणाली, " आईनंतर आजवर माझ्यावर कुणीच इतकं प्रेम केलं नाही.
आईला गमावलंय. आत्ता मला कुणालाच गमवायचं नाही रे. माझ्यापासून हे सुख कोणी हिरावून तर घेणार नाही ना! अनामिक भीती, सतत मला आतल्या आता पोखरत आहे" असं म्हणत शर्वरी समीरच्या कुशीत विसावली.

शर्वरीच्या मनातील भिती.. कल्पना की वास्तव? काय होणार आहे पुढे? जाणून घेऊयात पुढच्या भागात.

***
शितल ठोंबरे

क्रमशः

🎭 Series Post

View all