Login

मैत्री नात्यापलीकडची.. भाग २

जीवाला जीव लावणाऱ्या मैत्रिणींची कथा
मैत्री नात्यापलीकडची.. भाग २



" स्पृहा आईला बोलव लवकर.." शमा ओरडत होती. स्पृहाने बोलावले खरे. पण शमाला होणारा त्रास बघून तिलासुद्धा कळा सुरू झाल्या. दोघींना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची बातमी कळताच समीर आणि प्रतीक धावत दवाखान्यात आले. शमाची तब्येत नाजूक झाली होती. गुंतागुंत झाल्याने बाळ बाहेर यायच्या आधीच गेले होते. नशीबाने शमाचा जीव वाचला होता. ती बेशुद्ध होती. प्रतीकने समीरला धीर दिला. एकीकडे स्पृहाने एका छानशा मुलाला जन्म दिला होता. प्रतीक बाळ बघायला गेला. त्याचीही द्विधा मनस्थिती झाली होती. मित्राचे बाळ गेल्याचे दुःख इतके होते की स्वतःला बाळ झाल्याचा आनंद साजरा करता येत नव्हता. डोळे उघडताच स्पृहाने विचारले ,
" आपले बाळ?" प्रतीकने बाळाला दाखवले. स्पृहाने बाळाला जवळ घेतले. त्याचे जावळ हुंगले.
" शमाला काय झाले? ती कशी आहे?"
प्रतीक काहीच बोलेना हे बघून स्पृहाला अशुभाची चाहूल लागली.
" सांग ना.. काय झाले?"
" स्पृहा तू बाळाकडे लक्ष दे." प्रतीक कसेतरी बोलला.
" ते मी देईनच. पण शमाचे काय झाले ते सांग आधी." स्पृहाने उठायचा प्रयत्न केला. पण ती उठूच शकली नाही. प्रतीक पुढे धावला. त्याने तिला परत झोपवले.
" मन घट्ट करून ऐक. शमाचे बाळ गेले आहे."
" आणि शमा?"
" ती बरी आहे. अजून बेशुद्ध आहे. समीर थोडा हबकला आहे. त्याला कळतच नाहीये हे सगळे कसे सांभाळायचे ते." स्पृहाला धक्काच बसला. काय ठरवले होते आणि काय झाले. तिला आठवले डॉक्टरांनी तिच्या तब्येतीला बाळंतपण झेपणार नाही म्हणून सांगितले होते तरी हट्टाने स्वतःचे बाळ हवे म्हणून शमाने घेतलेली रिस्क. आता जर हे तिला समजले तर तिचे काय होईल हा विचारच स्पृहाला करवत नव्हता..
" प्रतीक , मी मागेन ते देशील?"
" आज माझे बाळ या जगात आले आहे, तुला जे हवे ते देईन."
"समीरची जर तयारी असेल तर मी हे बाळ शमाच्या पदरात घालू?"
" स्पृहा..." प्रतीक केवढ्याने तरी ओरडला. " आई आहेस की कैदाशीण? अग नुकतेच जन्मलेले बाळ द्यायचा विचार करतेस?\"
" प्रतीक पान्हा फुटला आहे मला आणि हा प्रश्न विचारतोस? शमा परत आई होऊ शकेन की नाही हे माहित नाही. अशावेळेस जर तिला बाळ गेल्याचे समजले तर ती दुःखाने वेडी होईल. आपले बाळ आपल्या डोळ्यासमोरच राहील आणि दुसरी गोष्ट आपण परत आईबाबा होऊ शकतोच ना?" स्पृहा रडत बोलत होती. प्रतीकने काहीच न बोलता समीरला बोलावून आणले. शमाची ढासळती तब्येत बघून त्यानेही होकार दिला. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या शमा आणि स्पृहाच्या आईबाबांनी मूक संमती दिली. बाकी कोणाला काही कळण्याचा प्रश्नच नव्हता.
शमाने शुद्धीवर आल्यावर बाळाबद्दल विचारले. स्पृहाचे बाळ शमाकडे देताना समीर रडत होता.
" आपल्या बाळाला हातात देताना कोणी रडते का?" शमा बोलत होती.
" स्पृहाला काय झाले रे?"
" तिचे बाळ गेले." कसबस समीर बोलला.
"आई ग..मला तिला भेटायचे आहे. चल ना.."
" आता नको. एक दोन दिवसांनी जाऊ भेटायला."
अशा रीतीने स्पृहाचे बाळ शमाकडे वाढू लागले. त्याचे नाव शमाच्या आग्रहाने स्पृहाने श्रीरंग ठेवले.

🎭 Series Post

View all