मैत्री बद्दल बोलू काही

It's all about friendship

मैत्री म्हणजे मनाचं मनाशी मनापासून असणार नातं.

मैत्री म्हणजे असं एक नातं ज्यात विश्वास, जिव्हाळा,आपुलकी, निस्वार्थ सर्व काही असतं.

काहीही नातं नसताना जे नातं निर्माण होते ती मैत्री असते.

कोणीही आपले नसताना अचानक आपले होते ती मैत्री असते

आपली छोटी छोटी गुपिते ज्यांना माहिती असते ती मैत्री असते

मैत्री हे अस नातं ज्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. मैत्रीची परिभाषा ही प्रत्येका नुसार वेगवेगळी असते. 

एखादी मैत्रीण असावी,थोडं समजाविणारी, थोडं समजून घेणारी, पण गोड शब्दात आपली चूक सांगणारी

आज फ्रेंडशिप डे म्हणजे मैत्री साजरा करण्याचा दिवस आहे. आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक मित्र मैत्रिणी भेटतात, काही त्या टप्प्यापुरते मर्यादित राहतात तर काही आयुष्यभर सोबत असतात. शाळा, क्लास,कॉलेज,ऑफीस सर्व ठिकाणी आपले मित्र मैत्रिणी बनतात. जेव्हा आपण आयुष्यातील एखाद्या टप्प्याची आठवण काढतो ती आठवण, तो टप्पा मित्र मैत्रिणींशिवाय अपूर्ण असतो. मित्र मैत्रिणी तर भरपूर असतात पण जिवलग, खास असे बोटावर मोजण्या इतपत असतात. मोबाईलची कॉन्टॅक्ट लिस्ट ओपन केली तर त्यात आजवर आपल्याला भेटलेल्या प्रत्येक टप्प्यावरच्या मित्र मैत्रिणींचे नंबर सेव्ह असतील पण रिसेन्ट्स मध्ये फक्त जिवलग मैत्रिणींचे नंबर असतात. 

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात उतार चढाव चालू असतात पण ह्यावेळी आपल्या मैत्रिणी आपल्या सोबत असतील तर त्यासारखे सुख दुसरे नाही. प्रत्यक्षात दुःखात किंवा आनंदात मैत्रिणी सोबत असतील अस नाही पण अप्रत्यक्षपणे का होईना त्या आपल्या सोबत आहेत हेच खूप मोठे असते. मैत्रीची तुलना जगातील कुठल्याच नात्यासोबत होऊ शकत नाही. आजच्या धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनात मैत्रिणीचा एक 'हाय' मॅसेज किंवा एक पाच मिनिटांचा कॉल खूप काही असतो. आता उदाहरणच द्यायचं झाल तर कोरोना होऊ नये म्हणून आपण vaccine घेत आहोत कारण vaccine घेतल्यावर आपल्या शरीरात antibodies तयार होतात व त्या कोरोना विषाणू विरोधात लढा देतात. मला वाटत मैत्रीचंही अगदी तसच आहे, मैत्रिणीचं बोलणं antibodies चं काम करतात. जेव्हा ती म्हणते की 'मी आहे ना' तेव्हा आपल्या मनात antibodies तयार होत असतील आणि आलेल्या संकटाचा सामना आपण हसत हसत करतो.

आपल्या आयुष्यात आलेल्या संकटाचा सामना हा आपल्यालाच करावा लागतो, आपली मैत्रीण प्रत्यक्षपणे येऊन काही मदत करत नाही पण फक्त ती फोनवर आपल्या सोबत दहा मिनिटे जरी बोलली तरी आपल्यात त्या संकटाचा सामना करण्यासाठी शक्ती प्राप्त होते. आपल्या आयुष्यात कितीही बदल झाले, गरिबी- श्रीमंती, सुख- दुःख आले तरी एक गोष्ट कायम तशी राहते ती म्हणजे खरी मैत्री.

चांगली मैत्री असणे म्हणजे गरजेचे नाही की तुम्ही रोज भेटणे, रोज फोनवर बोलणे. चांगली मैत्री म्हणजे समोरच्याच्या एका आवाजावरून त्याची मनस्थिती ओळखणे. संकटाच्या वेळी आपल्या मैत्रिणीची मदत करणे.

माझ्या आयुष्यात आत्ताच म्हणजे अगदीच काही दिवसांपूर्वी होऊन गेलेला किस्सा सांगते, माझी एक मैत्रीण आहे, आमच्या मैत्रीला जवळजवळ चौदा वर्ष पूर्ण झाले आहेत. आम्ही आपापल्या आयुष्यात बिजी असल्याने आमच्यात रोजच बोलणं, मॅसेज अस व्हायचं नाही. कधीतरी म्हणजे बर्थडे, फ्रेंडशिप डे अश्या विशेष दिवशी बोलणं व्हायचं. काही महिन्यांपूर्वी मला कोरोना झाला होता, त्या दिवसापासून एकही दिवस असा गेला नसेल की तिने मॅसेज केला नसेल, दररोज How are you? हा मॅसेज माझ्या इनबॉक्स मध्ये पडलेला असायचा. मी कोरोनातून बरी झाल्यावर माझे पप्पा एक्सपायर झाले, आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले या माझ्या कठीण काळात माझ्या मैत्रिणीच्या मॅसेजने, फोन करण्याने मला एक प्रकारची उभारी मिळायची. या काळात मी मनाने खचले की ती मला समजून सांगायची. मला आठवतंय की माझे पप्पा एक्सपायर झाल्यावर तिने माझी समजूत अश्या रीतीने घातली की तिचे बोलणे आजही मला आठवत आहे.असा कठीण काळ होता की या काळात जवळच्या नातेवाईकांनी सुद्धा साथ सोडली होती पण माझ्या मैत्रिणीने मैत्री निभावली होती. मी स्वतःला नशिबवान समजते की मला अशी मैत्रीण मिळाली आहे.

प्रत्येकाला एकतरी जिवलग मैत्रीण असेल तिच्या सोबत आपण सर्व काही शेअर करत असतो. माझ्याही आयुष्यात अशी एक जिवलग मैत्रीण आहे तिच्या सोबत मी माझ्या आयुष्यातील सर्व सुख दुःख शेअर करते, तिच्यासाठी खाली थोडं लिहिणार आहे.

प्रिय सखी, 

                मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेव्हापासून ठरवलं होतं की आपल्या मैत्रीबद्दल लिहावं पण काही नाती अशी असतात की त्या नात्याचं आपल्या आयुष्यातील महत्त्व शब्दांत मांडता येत नाही. आपलंही नातं अगदी तसंच आहे. पण आज फ्रेंडशिप डे असल्याने मला आपल्या बद्दल काहीतरी बोलायचं आहे, कमीत कमी मी तसा प्रयत्न करणार आहे. मी तुला जेव्हा पहिल्यांदा पाहिले तेव्हा वाटले होते की ही किती खडूस आहे, हिच्यात attitude खूप आहे, आपलं आणि हीच कधी जमणार नाही. पण कालांतराने आपली ओळख झाली व मला असं जाणवलं की आपले व हिचे विचार मिळतेजुळते आहे, आपण हिच्या बद्दल जो विचार केला होता तो चुकीचा आहे, ही तर खूपच चांगली आहे, आपली हिच्या सोबत चांगली मैत्री होऊ शकते. मला आयुष्याच्या त्या टप्प्यावर तुझ्या सारखी मैत्रीण भेटली तेव्हा मला खूप आनंद झाला होता पण तो आनंद काही फार काळ टिकला नाही, आपल्याला कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी काम करावे लागणार होते. आता रोज भेटणारी मैत्रीण पुन्हा कधी भेटेल का? की भेटणारच नाही असं वाटलं होतं, आपल्याला चांगली मैत्रीण गमवावी लागेल का? अशी भीती होती. पण म्हणतात ना की देवाच्या मनात काय चालू असतं हे कोणीच सांगू शकत नाही. आपल्या नशिबात आपली मैत्री अजून दृढ होणे लिहिले असल्याने आपली रोज भेट होत नसली तरी आठवड्यातून एकदा तरी भेट व्हायची. अगदी नेहमीच नाही पण कधीतरी आपण वेळात वेळ काढून भेटायचो. तुझ्याशी भेटून मनातील बोलल्या शिवाय मला चैन पडायची नाही.

               आज रोजीही विचार केला तर तु आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यात आहेस आणि मी वेगळ्या तरीही आपण एकमेकींचे प्रॉब्लेम्स एकमेकीं सोबत बिनधास्तपणे शेअर करू शकतो. मला तुझ्या सोबत बोलताना हा विचार करावा लागत नाही की ही आपल्या बद्दल काय विचार करेल? काही दिवसांपूर्वी माझ्या आयुष्यात जो कठीण काळ होऊन गेला त्यात तु दिलेली साथ मी कधीही विसरु शकणार नाही. तु माझ्या आयुष्यातील अशी एक व्यक्ती आहेस की जिच्याकडे मी माझ्या मनातील सर्व काही सांगू शकते, तेवढं आपल्यातील बॉंडींग स्ट्रॉंग आहे. आपण खूप कमी काळ सोबत होतो पण तितक्या कमी काळात सुद्धा आपल्यात खूप छान मैत्री झाली. शेवटी एवढंच सांगेन की आपल्या पुढील आयुष्यात आपण कुठे असू, आपण नेहमी भेटू शकू की नाही हे मला आत्ता माहीत नाही पण आपल्यातील मैत्री ही अशीच राहील याची खात्री मी देते. ' मी तुला विसरेन हे शक्य नाही आणि तु मला विसरशील हे मी होऊ देणार नाही' माझ्याशी मैत्री केल्याबद्दल आणि ती टिकवल्याबद्दल मी तुझी कायम ऋणी असेल. हॅपी फ्रेंडशिप डे.

मैत्रीत भांडण असावीत पण तिरस्कार नको

मैत्रीत प्रेम असावे पण स्वाभिमान नको

मैत्रीत आनंद असावा पण राग नको

मैत्रीत आपलेपणा असावा पण मीपणा नको

मैत्रीत वचनं असावीत पण अटी नकोत.

©®Dr Supriya Dighe