टपाल - अपॉईंटमेट लेटर

“तुम्ही आत्ता कसे आले? प्रोजेक्ट लांबलं आहे आणि सर्वांचीच तारीख तीन महीने पुढे ढकलली आहे. वापस ?

टपाल – अपॉईंटमेंट लेटर.

१९७४ साली मी इंजीनियर झालो आणि लगेचच एक दाहक सत्य समोर आलं. मंदी चालू झाली होती आणि नोकऱ्या मिळत नव्हत्या. असेच कोणी तरी बाबांना भेटायला आले होते, ते म्हणाली, “अरे, मी सांगतो तू टिस्को किंवा टेल्को मधे जा. नाहीतर असं कर, भाभा अटॉमिक मधे नोकरी कर. आहे काय अन नाही काय?” नोकरी नाही म्हंटल्यावर “कोणीही यावे आणि टिकली मारुनी जावे” अशी अवस्था झाली होती. बऱ्याच ठिकाणी अर्ज करून झाले होते, आणि रोज पोस्टमनची वाट बघणं चालू होतं. एक दिवस मात्र खरंच माझ्या नावाचं पत्र आलं. इंटरव्ह्यु कॉल आला होता. घरी  आनंद.

मुंबईला इंटरव्ह्यु पार पडला. नागपूरला आलो. सगळेच प्रश्न, इंटरव्ह्यु कसा गेला? काय विचारलं? तु सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलीस न? नोकरी मिळेल का? आता या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. पुन्हा पोस्टमनची वाट बघणं एवढंच काम होतं. पण परमेश्वराची लीला म्हणतात ना तशी अगाध आहे याची प्रचिती आली. पुन्हा एकदा पोस्टमनचा माझ्या नावाचा पुकारा ऐकू आला. माझी निवड झाली होती आणि म्हणून अपॉईंटमेंट लेटर आलं होतं. आता काय आनंदाला उधाण. आईला तर इतकं कौतुक की काही विचारू नका. नोकरी तारापूर MIDC मधे, पालघरच्या जवळ होती. आणि राहण्याची व्यवस्था कंपनीच करणार होती.

यथावकाश रुजू होण्याची जी तारीख होती त्यांच्या दोन दिवस अगोदर मी मुंबईला आणि दुसऱ्या दिवशी सामाना सकट बोईसर ला गेलो. रिक्शा करून फॅक्टरीत पोचलो. रिक्शा सिक्युरिटी  ऑफिस समोर थांबला. आणि ऑफिस मधून एक काळा भयंकर राक्षस बाहेर आला, साडे सहा फुट ऊंची, आडदांड शरीर, मोठ्या मिश्या, रांकट चेहरा आणि देवी मुळे चेहऱ्यावर डाग. कमरेला पिस्तूल आणि अत्यंत रागीट भाव चेहऱ्यावर. पाहाता क्षणीच घाबरून जावं आस व्यक्तिमत्व मी ५४ किलोचा मुलगा, मी पण सॉलिड घाबरलो.

“काय आहे?” तो जोरात वाचमन वर खेकसला.

“सर, हे जॉइन व्हायला आले आहेत.” – वाचमन.

“तुम्ही आत्ता कसे आले? प्रोजेक्ट लांबलं आहे आणि सर्वांचीच तारीख तीन महीने पुढे ढकलली आहे. वापस जा तुम्ही.” माझ लेटर बघून ते म्हणाले. नशीब माझं की त्यांनी हे दरडावून सांगितलं नाही.

“अहो मी नागपूर वरुन आलो आहे, आणि आता वापस कसं जाणार? मला आधी माहीत असतं तर मी तिथेच थांबलो असतो.” – मी विनंतीच्या सुरात त्यांना म्हंटलं. त्यांनाही बहुधा ते पटलं असावं. त्यांनी फोन केला आणि पाच मिनिटांनी चीफ इंजीनियर गेट वर आले. माझा इंटरव्ह्यु त्यांनीच घेतला होता, मला लगेच ओळखलं त्यांनी आणि सिक्युरिटी ऑफिसरला म्हणाले, येऊ द्या यांना, यांच्या नावाचं पत्र पाठवायला विसरले आपले लोकं. माझा जीव भांड्यात पडला आणि आमची पहिली नोकरी सुरू झाली.

दिलीप भिडे

स्पर्धा – गोष्ट छोटी डोंगरा एवढी

विषय – टपाल.