महिलादिन

आगळा वेगळा महिलादिन


पोळ्या आज अशा काय?
जरा काळसर वाटल्या ग,
अग हे काय? आमटीत मीठच नाही
भाजीत तर मसाल्याचा डब्बाच ओतला वाटतं
असं काय हे जेवण?
अरे हो, आज काय तो तुमचा "महिला दिन" होता ना? बरोबर मैत्रिणींशी गप्पा टप्पा मध्ये हा सर्व गोंधळ तुझा.
तूच खा हे, मी चाललो बाहेर जेवायला, अस म्हणतच रोहित ताट बाजूला सरकवत निघून गेला.

सायली मात्र त्या जेवणाकडे बघतच राहिलेली. डोळ्यांच्या कडा मात्र पूर्णपणे डबडबलेल्या.
अस कस बनवलं आज मी जेवण? अंगात कणकण होती तरी मरमर करून स्वयंपाक केला, आणि हा मात्र माझी चौकशी न करताच सरळ बाहेर निघूनही गेला. हेच काय ह्याचं प्रेम?

अंगात त्राण नसताना ती आवरत होती, जेवायची तर इच्छाच नव्हती. काय तर म्हणे? " महिलादिन". अरे माझी काय हालत होती ते मला माहित.अस पुटपुटतच ती आवरायला लागते.

तेव्हड्यात तीचा हात घट्ट पकडून रोहित तीला बाजूला बसवतो. तीच्या हातात गोळी आणि पाण्याचा ग्लास देतो. हे घे आधी, काही बोलू नकोस बाकी. थांब मी येतो. आत जाऊन प्लेट मध्ये सफरचंद कापून आणतो. तीच्या पुढ्यात ठेवून म्हणतो, हे सर्व संपव. मग बोलू.

टेबलवरच सारं आवरतो. ग्लासात ज्यूस घेऊन येतो, दोघे मिळून ज्यूस पितात. ती हे सारं निपचितपणे करत असते. अंगात जरा बळ आल्यासारखं वाटतं.
लटक्याच रागाने ती त्याला पाहते.
स्वतःचे दोन्ही हात कानाकडे नेत, तो हलकेच तिची माफी मागतो. तीला जवळ घेऊन बोलतो.
" अगं वेडाबाई, मला घरी आलो तेव्हाच जाणवलेल, की तुझी तब्बेत ठीक नाही ते. माहीत आहे मला तू मोठ्या कष्टाने सारा स्वयंपाक बनवलास ते. पण तूझ्या शिवाय घास तरी उतरेल का ग माझ्या घशाखालून." म्हणून तुझ्या कधीही न फसलेल्या स्वयंपाकाला मी नाव ठेवून निघून गेलो. म्हटलं मेडिकल मधून औषधं आणि ज्यूस वल्याकडून ज्यूस अणूया.
मग कसा वाटला आजचा "महिलादिन"? सायलीच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. खूप छान होता, अस म्हणतच ती त्याच्या कुशीत शिरते.
#कृष्णवेडी
सौ.प्राजक्ता हेदे(बोवलेकर)