माहेरवाशीण अशीही.. अंतिम भाग

व्यथा एका नणंदेची


माहेरवाशीण.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की अवनी दिप्तीला वाटेल तसे बोलते. बघू आता पुढे काय होते ते.


" आत्तू.. तू काय केले आहेस माझ्यासाठी?" आल्या आल्या मीतने विचारले.

" मी काही नाही केले रे.. काय हवे ते सांग, मग तसं करते.." दिप्ती मीतला जवळ घेत बोलली.

" मला गुलाबजाम नंतर साबुदाणावडा मग कोथिंबीरवडी आणि आणि.."

" तू एकाच दिवसात हे सगळे खाणार का? आतासाठी उपमा केला आहे. तो चालेल का?" दिप्तीने हसत विचारले.

" हो.. आणि बाकीची लिस्ट मी आठवून सांगतो. मला रोज एकेक हवं."

" हो रे माझ्या राजा.." मीत खाऊन खेळायला गेला. दिप्ती तिची बॅग आवरू लागली. ते बघून सुदीप त्याच्या खोलीत गेला. अवनी तिथे तोंड फुगवून बसली होती.

" अवनी, ही पद्धत आहे का ताईशी बोलायची?"

" आता तू ही माझ्याशी भांडणार आहेस का? अशी काय जादू केली रे तुझ्या ताईने? गरजेला तर कधी आलेल्या बघितले नाही मी त्यांना.. आणि आता अचानक कसा पुळका आला तुला? एवढी प्रेमाची ताई तुझी मग कधी गेला नाहीस ते तिथे?"

" पुळका? तुला समजते तरी का तू काय बोलते आहेस ते? खरंतर इतके दिवस मला ताईने सांगितले होते म्हणून तुला सांगत नव्हतो. पण आता वाटते वेळ आली आहे. आपलं लग्न झाले आणि घरी जाताना ताईच्या गाडीचा अपघात झाला. त्यात तिच्या सासऱ्यांना खूप मार लागला. आपल्या आनंदावर विरजण नको म्हणून त्यांनी इथे कळवले नाही. गेली अनेक वर्ष ते अंथरूणावर आहेत. त्यांची ती अवस्था बघून तिच्या सासूबाईही गळून गेल्या आहेत. त्यांचे, मुलांचे सगळे एकहाती ताई करते. त्याचबरोबर स्वतःचे क्लासेसही चालवते. भाऊजींची फिरतीची नोकरी म्हणून ती कितीतरी वर्ष घराबाहेर पडली नाही. वेळोवेळी ती आईच्या अकाउंटला पैसे भरत असते. आईचा सगळा खर्च ती करते. आईच्या ऑपरेशनचा अर्धा खर्च तिने पाठवला.. मग का नाही येणार तिचा पुळका? आताही ती आली आहे पण त्यासाठी तिने काय काय केले असेल तिलाच माहीत. तिच्या सासऱ्यांना त्यांना कोणी अशा अवस्थेत बघितलेले आवडत नाही म्हणून तिने कधीच आपल्याला तिच्या घरी बोलावले नाही. " सुदीप चिडून बोलत होता. ते ऐकून दिप्तीची मान खाली गेली. ती तशीच सुधाताईंच्या खोलीत गेली.

" मला माफ करा ताई. मी वाटेल तसे बोलले तुम्हाला. आज ऑफिसमध्ये माझ्या मैत्रिणीला तुम्ही आलात म्हणून मी सांगितले तर तिने तिची गोष्ट सांगितली. तिची नणंद अशीच आली आणि आजारी आईच्या सह्या घेऊन घर स्वतःच्या नावावर करून गेली. आता कोर्टात केस सुरू आहे. मी घाबरले होते. आमच्या बाबतीत पण असेच झाले तर.." अवनी रडत होती.

" वेडी आहेस का तू? अग एकाने केले म्हणून सगळेच दुष्ट असतील का? खरं सांगू बर्‍याच माहेरवाशीणींना माहेर हवं असते , जिथे हक्काने जाऊन एक दिवस तरी राहता येईल, हवं तसं वागता येईल. तेवढ्या एका दिवसाच्या प्रेमापुढे बाकीच्या गोष्टी गौण असतात ग. आणि माझेही चुकलेच ना.. हे घर माझे होते, आता तुझे आहे.. हा फरक मला समजून घ्यायलाच हवा होता." दिप्ती अवनीचा हात हातात घेत बोलली.

" नाही.. हे घर तुमचे होते, तुमचेच आहे.. बरोबर ना आई?" अवनीने सुधाताईंना विचारले. त्यांच्या डोळ्यातून परत अश्रु वहात होते.. पण यावेळेस ते आनंदाचे होते.

बर्‍याचवेळा नणंद या शब्दाचा धसकाच एवढा असतो की त्यामुळे अनेकदा समोरच्या व्यक्तीने केलेल्या चांगल्या गोष्टींचाही विपर्यास केला जातो. त्यावर आधारित ही कथा. कशी वाटली ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all