माहेरपणाच सुख ( भाग 3 )

About Married Life Of Woman


माहेरपणाच सुख ( भाग 3 )

"आई, मला तुमच्या सर्वांची खूप आठवण येत होती गं , सासरी सगळं वेगळचं वाटत होतं. इथे तू हाक मारल्याशिवाय मी सकाळी उठायची नाही. मला झोप किती आवडते , हे माहित होते तुला. पण सासरी जबाबदारीने लवकर उठायला खूप त्रास होत होता. तुझ्या हातच्या चहाची सवय, चहा पिता पिता वहिनींशी मारलेल्या गप्पा, रोज सकाळी अंगणातील टवटवीत फुलांनी बहरलेली फुलझाडे पाहून मन प्रसन्न होऊन जायचे.
हे सर्व सासरी मला आठवत होते. किती कठीण असते गं इतके वर्ष एका घरात राहिल्यानंतर ,व्यक्तींबरोबर अनेक गोष्टींचाही लळा लागलेला असतो. आणि एका दिवसात हे सर्व सोडून नव्या घरी, नव्या लोकांमध्ये स्वतः ला समजून घेणं, आणि एका नवीन आयुष्याला समजून घेणं,ते स्विकारणं आणि जगणं.माहेर काय असते, हे सासरी गेल्यावरचं जास्त कळत असते. "


लग्न करून सासरी गेल्यानंतर पहिल्यांदा माहेरी आलेली मनिषा आईला सांगत होती.

तिचे हे बोलणे ऐकून आई,काकू , वहिनी सर्वांनाच रडू येत होते. प्रत्येकीला आपल्या भावना तिच्या शब्दांतून व्यक्त होत आहेत , असेचं वाटत होते.

नवरा मुंबईला राहत असल्याने, मनिषा माहेरचे गाव आणि सासरचे गाव सोडून मुंबईला जाणार होती. आता इतक्या दुरून लवकर येणे शक्य नव्हते. त्यामुळे थोडे दिवस अजून माहेरपणाच सुख अनुभवून मुंबईला जाणार होती.
गावाकडे राहिली असती तर, काहीतरी निमित्ताने भेटीगाठी झाल्या असत्या,येणेजाणे झाले असते. पण दूर असल्याने लवकर भेटताही येणार नव्हते. त्यामुळे मनिषाला माहेर सोडून जाताना अजून जास्तच रडू येत होते. वाईटही वाटत होते.


मुंबईला आल्यानंतर, सुरूवातीचे एक दोन महिने सुखाचे,आनंदाचे गेल्यानंतर, मनिषाला नवऱ्याच्या व्यसनाचे समजले. त्याला दारूचे व्यसन जडलेले होते. घरातल्यांच्या सांगण्यानुसार, विनंतीनुसार त्याने दारू सोडण्याचा प्रयत्न केला होता. पण तो दारूच्या खूप अधीन झाल्यामुळे , पुन्हा दारू प्यायला लागला होता. त्याचे व्यसन, त्याचे वागणे मनिषाला आवडत नसल्याने ती संताप करायची आणि दोघांमध्ये भांडण व्हायचे.तिच्या माहेरी हे सर्व कळल्यानंतर , आपली खूप मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आले . आपल्या मनिषाच्या नशिबात असे काय होते ? याचा ते विचार करत होते. मनिषा नवऱ्याला प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करायची. पण त्याचे मनिषापेक्षा दारूवरच जास्त
प्रेम असल्याचे दिसत होते.

कधी सुख तर कधी दुःख
कधी चांगला तर कधी वाईट, असेचं मनिषा दिवस काढत होती. आज ना उद्या तो सुधारेल , अशी आशा तिला सासरचे व माहेरचे दोघेही दाखवत होते.

सासरच्या लोकांनी तर हळूहळू करत संबंधही तोडून टाकले . एक तर व्यसनी मुलाचे लग्न लावून दिले आणि वर अजून हा बेजबाबदारपणा. मनिषाला व तिच्या माहेरच्यांना सासरच्या लोकांचा खूप राग आला होता.

बाळंतपणासाठी मनिषा माहेरी आलेली होती. सर्व जण तिची काळजी घेत होते. तिच्या सर्व इच्छा पुरविल्या जात होत्या. होणारे बाळ निश्चितच त्याच्या वडिलांना दारूपासून दूर करेल. वडील झाल्यावर, बाळाचे कौतुक, लाड करण्यात दारूला विसरून जाईल. . असे सर्वांना वाटत होते.

क्रमशः


नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all