Feb 28, 2024
जलद लेखन

माहेरपणाच सुख ( भाग 2 )

Read Later
माहेरपणाच सुख ( भाग 2 )


माहेरपणाच सुख ( भाग 2 )

\"माहेर म्हणजे
सुखाचं आगार
माहेर म्हणजे
मायेचं भांडार \"

अशाचं माहेरपणाच्या सुखाचा आनंद वंदना घेत होती.
लग्नाअगोदर काम करायला सांगणाऱ्या आई,काकू आता काम नको करू,आराम कर ..असे सांगत होत्या.
काम न ऐकल्यास आपल्याला रागावणारी आजी आता आपल्याशी मायेने बोलत होती.
लग्न करून सासरी जाऊन काही दिवस तर झाले होते,तरीही किती बदल झाला होता. आपल्यावर अगोदरपासूनच सर्वांचे खूप प्रेम होते पण सासरी गेल्यापासून ते अधिकच जाणवायला लागले होते.वंदनाला हे सर्व आवडतही होते आणि वाईटही वाटत होते कारण थोड्याच दिवसांत सासरी गेल्यानंतर हे सर्व तिला अनुभवयाला मिळणार नव्हते.


माहेर म्हटले की,स्त्रियांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय!
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक हळवा,नाजूक व भावनिक कोपरा!
माहेर या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक स्त्रीचे ऋणानुबंध ज्या जागेत गुंतलेले असतात, ती जागा म्हणजे माहेर !

नुकतेच लग्न झालेल्या नवविवाहितेपासून उतारवयातील आजीपर्यंत प्रत्येकीला माहेराची ओढ असते.सासरी कितीही सुखाची उधळण होत असली तरी , प्रत्येकीला माहेराची आठवण येतचं असते.

आईची माया,वडिलांचा आधार
जिथे मिळते ते माहेर
भावाबहिणींसोबत मौजमजा
करण्यास मिळते ते माहेर
लहाणपणाची प्रत्येक आठवण
जिथे जपली जाते ते माहेर!

माहेराविषयी कितीही बोलले तरी ते कमीच!
नुसतं आपल्या माहेरचं नावही ऐकलं तरी प्रत्येक स्त्रीला आनंद होतो.
माहेरच्या गावाचा कोणी व्यक्ती, कुठे भेटला तर आपल्या जवळचं कोणी भेटल्याचा आनंद होतो.
माहेरचे कौतुक करण्यात ,कौतुक ऐकण्यात प्रत्येक स्त्रीला आनंद होत असतो. लग्न करून सासरच्या सुखात कितीही मन प्रसन्न असले तरी, माहेरच्या आठवणीत मन रमत असतं.

या सर्व गोष्टी वंदनाने आईकडून, काकूकडून व आजीकडून ऐकलेल्या होत्या. पण आता ती स्वतः या सर्व गोष्टींचा अनुभव घेत होती, व आयुष्यभर घेणार होती.

माहेरपणाच्या सुखाचा आनंद घेऊन, माहेरच्या प्रेमाची व खूप साऱ्या आठवणींची शिदोरी बरोबर घेऊन वंदना सासरी गेली.व संसारात रमायला लागली.


दिवसामागून दिवस जात होते. वर्ष संपले. वंदनाच्या लग्नानंतर घरात सून आणण्याची तयारी सुरू झाली.एक दोन वर्षाच्या अंतराने तिन्ही मुलांचे लग्न झाले. घरात सुना आल्या.घरात आनंदाचे,उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मनिषाला तर जणू मैत्रीणीचं मिळाल्या इतके छान तिचे वहिनींशी पटू लागले.

घरात आता सर्वांना मनिषाच्या लग्नाची उत्सुकता होती. मनिषा म्हणायची, "मी तुम्हांला सोडून कुठेही जाणार नाही, मला लग्नचं नाही करायचे."

तिच्या या वाक्यांवर घरातील सर्व हसायचे आणि तिची गंमतही करायचे.

थोड्याच दिवसात नात्यातील एका व्यक्तिने मुंबईत नोकरी करत असलेल्या मुलाचे मनिषासाठी स्थळ आणले.मुलगा दिसायला चांगला होता.चांगला शिकलेला व मुंबईत नोकरीला . त्यामुळे हे सर्व पाहता घरात कोणाचाच नकार नव्हता. मनिषाला ही वाईट असे काही जाणवले नाही त्यामुळे तिनेही होकार दिला.
मुलाचे आईवडील,भाऊ हे गावाकडेच राहत होते. भाऊ शेती व इतर व्यवसाय करत होते.
मुलाच्या घरातील सर्वांना मनिषा आवडली होती व मुलालाही मनिषा आवडली होती.

दोन्ही घरात लग्नाची तयारी सुरू झाली.
वंदनाही मनिषाच्या लग्नासाठी माहेरी आली.
वंदना, तिच्या वहिनी या सर्व मनिषाची गंमत करू लागल्या. मुंबईला गेल्यावर आम्हांला विसरू नको ,असे मुद्दामहून तिची मजा घेऊ लागल्या.
लग्नातही सर्वांची गंमत सुरू होती. मनिषालाही हे सर्व आवडत होते.
अपेक्षेपेक्षा लग्न छान झाले त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान होते.
\"मला लग्न नाही करायचे, मला तुम्हांला सोडून नाही जायचे.\"असे म्हणणारी मनिषा आपल्या माहेराला सोडून सासरी गेली .


क्रमशः

नलिनी बहाळकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//