माहेरपणाच सुख ( भाग 1 )

About Married Life Of Woman


माहेरपणाच सुख
( भाग 1 )

" मनू,आत्याला पाणी आणं..जा पटकन."

" अगं वंदू , आत्यासाठी चहा ठेवं."

आत्या घरात येते ना येते,तेवढ्यात आई व काकू मुलींना आवाज देत होत्या व स्वतः ही आपल्या नणंदबाईंसाठी काय करू आणि काय नको ? असे त्यांना वाटत होते.

आत्या माहेरी आली की, आजी- आजोबा, बाबा,काका,आई,काकू,
बच्चेकंपनी या सर्वांना किती आनंद होतो! आत्यालाही सर्वांना भेटून खूप बरे वाटते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो.
आई व काकू तिला काहीचं काम करू देत नाही.
आत्या काही काम करायला लागली की,
आजी म्हणायची,
" सासरीही कामचं करते ना ..माहेरी आली आहे तर आराम कर, भावजया करतील ना काम, करू दे त्यांना थोडी सेवा."

आजीच्या बोलण्यातून मुलीबद्दलचे प्रेम,काळजी व्यक्त व्हायची. आजी आत्याच्या केसांना तेल लावून देते. आजोबा आत्यासाठी तिच्या आवडीचा खाऊ आणतात.
आत्या माहेरी आली म्हणजे घरात आनंदाचं,उत्सवाचं वातावरण असतं.तिच्या पाहूणचारासाठी तिच्या आवडीचे पदार्थ बनविले जातात,आणि ती सासरी जाण्यास निघाली की तिच्यासोबत भरपूर खाऊ ही दिला जातो.आत्याला साडी व तिच्या मुलांना कपडे घेतात.
चार दिवस माहेरी राहिल्यानंतर आत्या जेव्हा घरी जाण्यास निघते,तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येते. तिला निरोप देतांना घरातील सर्वांचा कंठ दाटून येतो.
हे सर्व वंदना व मनिषा यांना कळत होते.
जसे आत्याचे इकडे लाड होतात तसेच आपल्या आईचेही तिच्या माहेरी लाड होतात आणि आपलीही आजोळी मजा होते. आजी- आजोबा, मामा- मामी हे सर्व आपल्यावर खूप प्रेम करतात, हे त्यांना जाणवायचे.

वंदना व मनिषा या दोघी चुलत बहिणी. वंदनाला दोन भाऊ व मनिषाला एक भाऊ.
वंदना ही सर्वांमध्ये मोठी तर मनिषा सर्वांत लहान.

वंदना मोठी होती त्यामुळे तिला काही गोष्टी समजत होत्या.पण छोट्या मनिषाला सासर,माहेर,
सासुरवाशीन,
माहेरवाशीण हे काही कळत नव्हते. तिला ज्या गोष्टीत आनंद मिळायचा ती ते करत होती.आत्या आपल्या घरी आली की घरात उत्सवाचे वातावरण होऊन जाते व आई माहेरी गेली की तिकडेही आनंदच आनंद! एवढेचं तिला कळत होते.

"ताई, माहेरपण ,माहेरवाशीण म्हणजे काय गं ? आत्या लग्न करून सासरी गेली ..मगं हे घर तिचे नाही का ? आजी तिला पाहुणी का म्हणते ? "

मनिषा तिच्या मनातील प्रश्न वंदनाला विचारायची.

घरात कोणा मोठ्यांना न विचारता ती आपल्या आवडत्या ताईलाचं विचारायची.

"अगं, आत्याचे लग्न झाले ,आता तिचे घर दुसरे . ती जिथे राहते ते तिचे सासर आणि हे तिचे माहेर.
आणि आत्या थोड्या दिवसांसाठी माहेरी येते ,तिला माहेराच्या घराचा,माहेरच्या माणसांचा सहवास मिळतो.म्हणून तिला माहेरवाशीण म्हणतात. आणि थोड्याचं दिवसांसाठी येते आणि हे घर ,ही माणसे तिची असली तरी ती या घरासाठी परकी होऊन जाते,पाहूणी होऊन जाते."

वंदना ही मनिषाला आपल्याला जितके समजले आहे तितके समजावून सांगत असते.

हळूहळू दिवस पुढे जात होते.आणि
थोड्या वर्षांतचं वंदनाचे लग्न होते.. लग्नानंतर ती जेव्हा पहिल्यांदा माहेरी येते,तेव्हा तिला एक वेगळाचं आनंद होत होता.आत्या माहेरी आल्यावर जसे सर्व तिच्याशी वागत होते,तसेच आता सर्वजण आपल्याशी वागत आहे.तेचं घर,तीचं माणसे ,तेचं नाते सर्व काही जसेच्या तसे..तरीही लग्नापूर्वी चे आपले घर आणि लग्नानंतरचे आपले हे घर .. सर्व वेगळं का वाटू लागतं..जास्त आवडू लागतं.
असे माहेरी आलेल्या वंदनाला वाटत होते.

क्रमशः


नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all