Jan 26, 2022
नारीवादी

माहेरपण

Read Later
माहेरपण


"अगं श्वेता, कशी आहेस? खूप दिवसांनी आलीस ना? बरेच दिवस झाले तुझी वाट पाहत होते, अलिकडे तू काही आलीच नाहीस. तू का येत नाहीस? आमचं काही चुकलं का?" वहिनी

"नाही ग वहिनी, कामाच्या गराड्यात वेळ कुठे आहे? मुलांच्या शाळा, सगळ्यांना डब्बा द्यावा लागतो, त्यामुळे वेळच मिळत नाही ग. चार दिवस निवांत सुट्टी काढून यावे म्हटले तरी जमत नाही. काही नसले तरी कोणी ना कोणी येतंच राहतं, मग त्यांना चहा वगैरे करून द्यायचे असते. आता जमत नाही ग." श्वेता

"आई गेल्यानंतर आज पहिल्यांदाच तू इतक्या दिवसांनी आली आहेस. आम्हाला वाटलं माहेर विसरलीस काय? आम्ही तुझी खूप आतुरतेने वाट पाहत होतो, आधी किमान चार दिवस सुट्टी काढून तरी यायचीस, आता ते सुध्दा करत नाहीस. पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना तू एकदाची आलीस." वहिनी

"अगं, कुठले काय? उद्या निरजची परिक्षा आहे, म्हणून मी येणारच नव्हते, पण दादाने खूपच आग्रह केला म्हणून यावे लागले. जर मी आले नसते तर तुम्हाला वाईट वाटले असते ना." श्वेता

" हो मग, तू आलीस ते बरे झाले. तेवढाच तुला बदल होईल ना. आता आठ दिवस सासरची अजिबात आठवण काढायची नाही. निवांत रहायचे." वहिनी

"अगं वहिनी, आठ दिवस कुठे राहते ग? मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, पण दोन दिवस राहीन हं." श्वेता

"हे काय? एकतर खूप दिवसांनी आलीस, त्यात फक्त दोनच दिवस? हे योग्य नाही हं." वहिनी

"आता नको ग वहिणी, मुलांना सुट्टी पडल्यावर नक्की येईन." हे सांगताना श्वेताचा कंठ दाटून आला

श्वेता खूप दिवसांनी आपल्या माहेरी आली होती. आई गेल्यावर पहिल्यांदाच. खरंतर आई गेल्यानंतर तिला यावेसेच वाटत नव्हते, तरीही आज मन घट्ट करुन भाच्याच्या मुंजी कार्यक्रमानिमित्त आली होती. ती जेव्हा घरी आली तेव्हा तिला आई कुठेच दिसली नाही. घरात आल्यावर तिचे डोळे आईला शोधत होते, तिची वेडी आशा होती की, आई येईल आणि हसत तिला बोलावेल. पण आता आई कायमची निघून गेली होती. कधीही परत न येण्यासाठी.

श्वेता नेहमी सुट्टीला आली की, तिची आई तिची वाट पाहत दारातच उभी असायची. लेकीला पाहून तिचा चेहरा नेहमी खुललेला असायचा. लेक आल्यावर तिच्यासाठी काय करु आणि काय नको असे तिला होई. लेकीसाठी चमचमीत गोडाधोडाचे पदार्थ बनवून ती घालत असे. लेकीसाठी सारे काही ती करत होती, पण आज लेक आली होती तरी हे सगळे काही करण्यासाठी आई नव्हती. ते पाहून श्वेताला खूप वाईट वाटत होते. तिचे डोळे भरून आले होते. पण भावाच्या या आनंदाच्या क्षणी भरलेले डोळे योग्य वाटणार नाही म्हणून तिने नकळत डोळे पुसून घेतले आणि चेहऱ्यावर उसणं हसू आणले.

भाच्याच्या मुंजीचा कार्यक्रम असल्यामुळे श्वेताला दोन दिवस आधीच भावाने बोलावले होते, पण श्वेताला माहेरी जायला अवघडल्यासारखे वाटत होते. आई होती तोपर्यंत हक्काचे माहेर होते. आता आईच्या माघारी वहिनी माझे माहेर जपेल का? माझी योग्य ती काळजी घेईल का? माझे सगळे करेल का? की ती काही म्हणेल? असे विचार तिच्या मनात येत होते. अगदी जड अंतःकरणाने ती कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी माहेरी जाऊन पोहोचली. श्वेता जाऊन दारात पाहते तर तिचा भाऊ तिच्या स्वागतासाठी उभा होता. ते पाहून श्वेताच्या मनाला बरे वाटले. ती हसतमुखाने आत गेली. आत जाऊन तिने पाहिले तर वहिनी देखील गोडाधोडाचे पदार्थ बनवत होती. नणंद आली म्हटल्यावर वहिनीने तिला हात पाय धुण्यास पाणी दिले आणि गोडाधोडाचे पदार्थ पहिल्यांदा नणंदेला दिले. ते पाहून श्वेताला आईची आठवण झाली. आई देखील असेच गोडाधोडाचे पदार्थ बनवत होती. वहिनीने आईकडून सारे काही शिकून घेतले होते, याचे तिला समाधान वाटले.

दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता. कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे मंडळी त्यांच्या सोबत गप्पा गोष्टी करण्यात श्वेताचा संपूर्ण दिवस गेला. श्वेताची वहिनी देखील प्रत्येक गोष्ट श्वेताला विचारून करायची. अगदी मैत्रिणी प्रमाणे हसत-खेळत दोघीजणींनी मिळून कार्यक्रम पार पाडला.

अखेर संध्याकाळी कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व पाहुणे मंडळी आपापल्या घरी जाऊ लागली, जाताना सगळेजण श्वेताचे आणि तिच्या वहिनीचे कौतुक करत होते. दोघी नणंद-भावजय अगदी मैत्रिणीप्रमाणे आहेत असे म्हणत होते. तेव्हा श्वेताला खूप बरे वाटले. निदान पाहुण्यांच्या समोर तरी आम्ही व्यवस्थित होतो याचे तिला समाधान वाटले.

आता श्वेताच्या जाण्याची वेळ आली. दोन-तीन दिवस कार्यक्रमाच्या गडबडीत वेळ कसा गेला? हे तिचे तिलाच समजले नाही. आई गेल्यानंतर प्रथमच घरी आलेली श्वेता थोडीशी कावरीबावरी झाली होती, आता स्वतःच्या घरी जाणार म्हणून तिने तिचे सगळे सामान आवरून घेतले होते. श्वेता सगळ्या बॅगा भरून घेऊन तयार झाली होती. इतक्यात तिच्या वहिनीने तिला बोलावले.

"आई गेल्यापासून मी एकटीच सारं काही करत आहे, मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही सगळे काही त्यांच्यासारखे करता, तेव्हा मला काही करायचे म्हटले की, तुम्ही हक्काने सांगत जा. काही चुकलं मातलं असेल तर माफ करत जा. यानंतर तुमचे माहेरपण मी जपणार आहे. त्यांच्याप्रमाणे तुमचं सारं काही मी करणार आहे. आई गेल्या म्हणून माहेर परकं झालं असे समजू नका. या घरची लेक आहात. तेव्हा तुमच्या मनात जेव्हा जेव्हा येईल तेव्हा या घराचे दार तुम्हाला नेहमीच उघडे असेल." इतके बोलून वहिनीने श्वेताची खणानारळाची ओटी भरली आणि तिला सुंदर साडी देऊन गोडाधोडाचे बरेचसे पदार्थ डब्यात घालून दिले. हे पाहून श्वेता सुखावली. एका मुलीला आई नंतर वहिनी आणि भाऊच तिचे माहेर असतात. वहिनीने माझे माहेर अगदी हक्काने जपले, असे वाटून तिचे डोळे पाणावले.

©®प्रियांका अभिनंदन पाटील.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..