माहेरपण भावजयचे भाग 2(माहेरवाशीण)

कथा नणंद भावजयच्या नात्याची
विवेकला थोडावेळ विश्वासच बसला नाही स्वतःवर की तो डायरेक्ट तिला लग्नासाठी विचारून आलाय. मित्र पण त्याच्या हिमतीची दाद देत होते. इकडे गर्लफ्रेंड होशील का विचारायची हिम्मत होत नाही कोणाची आणि हा पठ्ठ्या डायरेक्ट लग्नासाठी मागणीच घालून आला अस म्हणून सारखं चिडवत होते त्याला.

दुसरीकडे पेपर संपत आले होते तरी शितलने काहीच उत्तर दिलं नव्हत म्हणून त्याची बेचैनी वाढली होती. पेपर संपले आणि दोन दिवसांनी शीतल विवेकच्या घरी गेली. चाळीतल्या घरासमोर छोटीशी तुळस होती त्या तुळशीला सुमन ताई पाणी घालत होत्या आणि विवेक उंबरठयासमोर.. वेलबुट्यांची बारीक नक्षी असलेली रांगोळी काढत होता.

"येऊ का मी?" शीतलने मोठ्या अदबीने विचारले.
तुळशी समोर हात जोडून उभ्या असलेल्या सुमन ताई डोळे उघडुन समोर बघू लागल्या आणि विवेक ही आवाज ओळखीचा वाटला म्हणून पाठी वळला.


"शीतल.. तू?" विवेकने आश्चर्य वजा आनंदाने तिच्याकडे बघत तिला विचारले.

"हो, म्हंटल तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला आपल्या घरी जाऊनच द्यावे.. म्हणून आले!" शीतल स्मित करत बोलली आणि शांत उभी राहिली.

" शीतल.. अग देते आहेस ना उत्तर? मी वाट बघतोय. प्लीज नाही म्हणू नकोस." विवेक नाटकी स्वरात बोलला.


"अरे गधड्या.. ती केंव्हाच हो म्हणाली आहे." सुमन ताई विवेकचा कान पडकत बोलल्या पण काही न समजलेला आणि शीतलच्या तोंडातून हो किंवा काहीच न ऐकलेल्या अविर्भावात तो दोघींकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता.

"अरे अस काय बघतोस? ती काय बोलली ते ऐकलं नाहीस का तू नीट?" सुमन ताई

"नाही! " त्याने नकारार्थी मान हलवत छोटस तोंड करत बोलला.

"अरे ती म्हणाली तुझ्या प्रश्नाचं उत्तर आपल्या घरी जाऊन द्यावं.. म्हणून ती इकडे आली आहे." सुमन ताई प्रत्येक वाक्यावर थोडा जोर देत बोलल्या


"ओहह! खरंच.. शीतल.. तुझी हा आहे. ओ माय गॉड.. म्हणत त्याने शितलचे दोन्ही खांदे पकडले आणि तिला घेऊन गोल गोल फिरवू लागला. सुमन ताईंना घट्ट मिठी मारली. त्याला तर आकाश ठेंगणं झालं होत.

सुमन ताईंना विवेकला एवढं आनंदात पाहून खूप आनंद झाला होता. त्यांनी विवेकच्या खांद्याला पकडुन शीतलच्या बाजूला उभ केलं आणि दोघांवरून हात फिरवून स्वतःच्या डोक्यावर कडाकडा बोटं मोडून दोघांची दृष्ट काढली. शीतलने पण खाली वाकून त्यांना नमस्कार केला. सुमन ताईंनी तिला भरभरून आशिर्वाद दिला. तिघेही मग घरात आले. परीक्षेच्या निकालानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात शीतलने तिला पुढे पण जॉब करायची इच्छा आहे अस सांगितल आणि तिच्या या निर्णयाच दोघांनीही आनंदाने स्वागत केलं.

संसार दोघांचा आहे मग मेहनत पण दोघांनी घ्यावी अस तीच मत होत आणि ते योग्यच आहे अस सुमन ताई बोलल्या.
संध्याकाळीच ही बातमी सुमन ताईंनी सत्याला फोन करून सांगितली. फोनवर जास्त काही न बोलता उद्या घरी येत असल्याचं सांगून सत्याने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी आठलाच सत्या घरी हजर..

"काय ग एवढ्या सकाळी? सगळ ठीक आहे ना?" सुमन ताई काळजीने विचारू लागल्या.

"मी ठीक आहे, पण तुमची डोकी ठिकाणावर नाहीत वाटते. विवेक तुला अनाथ मुलगीच भेटली का? अग आणि आई.. मी माझ्या नंदेच्या मुलीला विचारलं होत ना विवेकसाठी! मग का घाई केलीत तुम्ही? आता माझ्या नंदेला काय सांगू? त्या मुलीमुळे तू तुझ्या मुलीचा संसार उघडा पाडते आहेस अस नाही का वाटत?"सत्या

"अग ताई.. शीतल खूप चांगली मुलगी आहे आणि मी खूप चांगल ओळखतो तिला." विवेक

"अच्छा..हो का? म्हणजे मी किमयाला..माझ्या नंदेच्या मुलीला ओळखत नाही.. अस म्हणायचं आहे का तुला? सत्या चिडून बोलत होती.

"अग पण त्याला नाही आवडत ती आणि त्याला दुसरी मुलगी आवडत असताना आपण आपल्या आवडत्या मुलीशी लग्न कर.. म्हणून जबरदस्ती कशी करायची?" सुमन ताई

"आई.. माझं लग्न झालं तेंव्हा मलाही ते आवडत नव्हते आता आवडतात की आणि प्रेमही आहे. जाऊदे ना तुम्ही ठरवलं आहे ना मग करा तुमच्या मनासारखं." सत्या आल्या पाऊली दारातूनच बडबड करून चिडून निघून गेली.

ताई रागावली म्हणून विवेक थोडा नाराज होता.
निकालाच्या नंतर दोन महिन्यांनी विवेक आणि शीतलचा विवाह ती राहत असलेल्या आश्रमातच अगदी साध्या पद्धतीने निर्विघनपणे पार पडला. सत्या नाराजच होती आणि तिच्या सासरची मंडळी पण जरा रुसलीच होती कारण विवेक सारखा गुणी मुलगा त्यांना शोधूनही सापडला नसता.

विवेक आणि शितलचा गृहप्रवेश झाला. किती रुसली असली तरी एकुलत्या एक भावाच्या लग्नाच्या सगळ्या विधी सत्या आणि तिच्या यजमानांनी अगदी मनापासून केल्या होत्या. सत्याचे यजमान विवेकची अगदी सख्या भावाप्रमाणे काळजी घ्यायचे त्यामुळे सत्या थोडी दुखावली आहे मी समजावेन तिला अस वचन त्यांनी विवेकला दिलं आणि त्याला मिठी मारून नवीन सुरू होणाऱ्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दोन वर्ष होऊन गेली तरी सत्या च्या मनातली शीतल विषयी अढी काही कमी झाली नव्हती. शीतल विषयी अजूनही राग होताच तिच्या मनात.

क्रमशः
@श्रावणी लोखंडे.

🎭 Series Post

View all