Feb 25, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

माहेरी पत्र

Read Later
माहेरी पत्र

माहेरी पत्र 


माहेर म्हटले की प्रत्येक स्त्रिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची वेगळीच चमक दिसते. माहेरची ओढ प्रत्येक स्त्रिच्या मनात असते. मग ती स्त्री वयस्कर असो किंवा तरुण. तिच्या मनातील एका कप्प्यात जपून ठेवलेला तिच्या मनावर राज्य करणारे असते ते फक्त आणि फक्त म्हणजे माहेर.‌सासुरवाशिण मुलीला माहेरची आठवण ही नेहमीच येत असते. जेव्हा मुलगी लग्न करून सासरी जाते तेव्हा तिची खुशाली समजायचे एकच माध्यम होते ते म्हणजे पत्र. इकडे आईबाबा आपल्या लेकीची खुशाली वाचण्यासाठी अगदी चातकासारखी वाट पाहत असायचे. तसेच हिचे देखील.ती सुद्धा आपल्या आईबाबांची खुशाली वाचण्यासाठी आतुरतेने पत्राची वाट पाहत असायची. आता ही पत्र लोप पावली आहेत. या पत्राची जागा स्मार्टफोनने घेतली आहे. फोन मुळे आपण कधीही कोठेही कसेही बोलू शकत आहोत. पण या फोनला पत्राची सर येत नाही येवढे मात्र खरे.

आज जर पुन्हा एकदा मला माझ्या आईबाबांना पत्र लिहावेसे वाटले कारण ही तसेच आहे. आई गेल्यानंतर मी एका वर्षांनी माहेरी जाऊन आले. तर तिथे गेल्यावर मला आईबाबांची खूप आठवण आली. जे मी बोलू शकले नाही ते मी या पत्राद्वारे लिहून माझे मन मोकळे करणार आहे.

शुक्रवार
१४.१०.२२

ति. आई बाबा
सा. न.वि.वि.
पत्रास कारण की कालच मी माझ्या घरी सुखरूप पोहोचले.काळजी नसावी. नेहमीप्रमाणे प्रवास सुखकर झाला.

पण....!!!!

पण आई मी कोल्हापूर येथून बेंगलोर ला पोहचे पर्यंत प्रत्येक तासा तासाला येणाऱ्या तुझ्या फोनची वाट पाहत डोळे पाणावले होते गं. आई बाबा गेले तेव्हा तुझ्याकडे बघून आम्ही आमचे दुःख सावरून घेतले. तुझ्यातच आम्ही बाबांना बघू लागलो होतो. पण हे देखील क्षणभंगुर असते हे तेव्हा कळालेच नाही ग. बाबांच्या जाण्याची जखम आमची भरलीच नव्हती तोच तू त्या जखमेवर फुंकर मारण्यापेक्षा तीच जखम पुन्हा चिघळवून गेलीस. बाबांच्या पाठोपाठ तू अशी काही निघून गेली जशी की तू खरोखरच त्यांची सावली बनून होतीस.

तुला माहित आहे जेव्हा मी इथून निघणार सुट्टी साठी हे कळले की बाबांचे सतत फोन सुरू व्हायचे." कधी निघणार ? मुलांना घेऊन व्यवस्थित बस . खिडकीतून हात बाहेर काढतील बघ मुले.लक्ष ठेव त्यांच्यावर. सांभाळून ये ग." रोजचे हेच दोन तीन वाक्य पण न चुकता येणारा फोन आता तीन वर्षे झाली बंद झाले आहे.

मला न्यायला येण्यासाठी धडपडत येऊन बस स्थानकावर बसणारे बाबा हातात नातवांना खाऊचा पुडा घेऊन जिथे बसायचे ती जागा रिकामी झाली आहे ग. मला मुलांबरोबर गाडीतून उतरताना नाही झाले तरी माझ्या बॅगा धरण्याची त्यांची तळमळ एका हाताने नातवाचे बोट धरून उभे राहण्याचा प्रयत्न करणारी ती मुर्ती दिसलीच नाही ग मला.

भरलेल्या डोळ्यांनी मी रिक्षा थांबवणार तोच समोर दादा येऊन उभारला. त्याने पटापट माझ्या बॅगा घेऊन गाडीतून घरी घेऊन आला. दाराकडे नजर लावून बसणारे ते थकलेले डोळे मला दिसले नाही ग . पण हातात पाण्याचा तांब्या घेऊन दारात उभी राहिलेली वहिनीने भाकरीचा तुकडा ओवाळून पायावर पाणी घालून मला गळाभेट घेऊन आत आली.

तुझा आणि बाबांचा रिकामा पलंग पाहून मला गलबलून आले ग . नकळतच डोळ्यांतून अश्रू अनावर होऊन गालांवर ओघळू लागले. तोच इवल्या इवल्या हाताने माझे डोळे पुसत छकुली ने एक जादू की झप्पी दिली. इतक्यात तुझा लाडका नातू ज्याच्याबरोबर तुझे पाच मिनिट पण पटत नव्हते पण त्याच्याविणा तुला गमतही नव्हते असे बाबांचा लाडक्या शेंडेफळाचा शेंडेफळ समोर आला. त्याला बघताच मला बाबाचाच चेहरा दिसला. तेच तेज तोच चेहरा तसेच उभारणे.

प्रवास कसा झाला असे विचारत विचारत वहिनीने चहा नाश्ता दिला. जसे तू करायची न मी आल्यावर जेवण माझ्या आवडीचे तसेच तुझ्या सुनेने केले हो.

दुपारी वामकुक्षी घेण्यासाठी वहिनीच्या खोलीत गेले. पलंगावर जरा पहुडले तोच कानात तुझा आवाज आला. एकदम दचकून उठले . पाहते तर काय तुझा नातू तुझे व्हिडिओ फोनमध्ये असलेले लावून बघत होता.

बघता बघता चार दिवस झाले. उद्या मी परत निघणार. दादा वहिनी आणखीन काही दिवस रहा असे म्हणत होते. ती पिल्ले पण नको न जाऊ आत्तू इतक्या लवकर म्हणून रडू लागले. या सर्वांसाठी मग पुन्हा दोन दिवस रहायचे ठरवले.

या दोघांनी माझे लाड असे पुरवले जसे की तुम्ही दोघे करत होतात तसेच. आता परत निघायची वेळ झाली. त्यादिवशी सकाळपासून दादाची धावपळ सुरू झाली होती.मला काय हवं नको त्या वस्तूची बांधाबांध वहिनी करत होती. यांना आवडणारे फराळाचे पदार्थ त्याचबरोबर लिंबाचे लोणचे,लसणाची चटणी,कारळ्याची चटणी,पापड, शेवया एक न अनेक वस्तू मला न सांगता न विचारता या दोघांनी भरुन दिल्या. माहेरची साडी जशी तू आणायची तशीच आणून मला दादाने दिली. मला खूप मान सन्मान या दोघांनी दिला . खरोखरच हे तुम्हा दोघांचे संस्कार आहेत.

मी बाहेर पडणार तेव्हा नकळतच नजर तुझ्या पलंगावर गेली. मला तिथला एक कोपरा ओला दिसला ग. असे वाटले की मी निघताना तू तिथे बसून रडत रडत मला म्हणत आहेस," आता कधी येणार. लवकर ये ग. खूप वाट पाहायला लावू नकोस ग परी. काळजी घे. तब्येत सांभाळून रहा. जाऊन पोहोचल्या पोहोचल्या फोन कर. काळजी वाटते बाळा."
तुझे बोलणे संपते न संपते बाबा पण भरलेल्या डोळ्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवत सांभाळून जा म्हणताना किती तरी आसवांना वाट मोकळी करून देत आहेत.असेच दिसत होते.

भरलेल्या डोळ्यांनी मी बाहेर पडले. जोपर्यंत घर दिसेल तोपर्यंत मी वळून पाहिलं. मला दोन पुसटशा आकृत्या आपले हात हलवत घराच्या उंबरठ्यावर उभे असलेले दिसले ग.

नेहमीप्रमाणे मला बसस्थानकावर सोडायला दादा वहिनी आले होते. बस निघेपर्यंत ते थांबले होते. सांभाळून जा म्हणत ते दोघेही रडत होते. माझी बस वेळेवर निघाली. मी माझ्या शिदोरीत तुझ्या संस्कारात वाढलेल्या दादा वहिनीच्या आठवणींना घेऊन आले. या दोघांच्या माझ्याप्रती असलेल्या काळजी अधीक प्रेमात मी पूर्ण पणे न्हाऊन निघाले होते.

आई मला तुला एक प्रश्न विचारावा वाटतो की तू का जाण्याची घाई केली ??? का तू लवकर गेली ??? आमच्या कडून काही चुकले होते का ??? का न सांगता बोलता अशी चुपचाप निघून गेली ??? सांग ना आई....!!!!

आई म्हणून कोणास हाक मारावी. दिसते का कुठे तू पुन्हा मला एकदा तरी. माझ्या हाकेला धावून येणारी माय माझी अशी कशी निघून गेली. आज एकच मागणं आहे देवाला.जर माझा जन्म पुन्हा होईल तर तो तुझ्याच पोटी जन्माला येऊ दे मला. हिच माय मला जन्मोजन्मी मिळो. काही चुकले असेल तर मला क्षमा कर आई. मी तुझ्या जवळ क्षमा मागावी पण हे देखील तू होऊ दिले नाही. तुला इतकी घाई झाली होती की यावेळी तू माझ्या येण्याची वाट पाहिली नाही. मी येण्याआधीच तू जगाचा निरोप घेतला . तुला असे निपचित पडलेले पाहून मी एकच हंबरडा फोडला पण....

पण.... माझ्या हबंरड्याने तुला पान्हा नाही ग फुटला. आई....!!!!!

तुझीच लेक
परी

©® परवीन कौसर
बेंगलोर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//