माहेरी जाताना

Maheri jatana

माहेरी जाताना
मन होतं खेळकर,
साजिरं,गोजिरं,
अवखळ,अल्लड

चार दिवस मन
उंदडतं,बागडतं 
भरुन घेतं उरात
माहेराचा मोकळा श्वास

इथेतिथे जागोजागी
मन शोधतं आठवांना
अलगद उलगडतं
बालपणीच्या गाठोड्याला

बावरं मन माहेर
डोळ्यांत साठवतं
छान निर्धास्त
झोपा काढतं

सासरी जाण्याची 
वेळ येते जवळ
मन बालपण ठेवतं
गुंडाळून गच्च

परत एकदा
पहातं डोळे भरुन
माहेरच्या वास्तूस,
हळव्या मातापित्यांस

मन जातं तुळशीकडे
तिच्याशी करतं हितगुज
मातपित्यांवर ठेव लक्ष
म्हणून आर्जव करतं

मन लागतं मग
परतीच्या प्रवासाला
डोळ्यांचे हट्टी काठ
पुसत असतो रुमाल.

------सौ.गीता गजानन गरुड.