माहेरची साडी. भाग ४(अंतिम भाग.)

कथा एका माहेरवाशीणीची.

जलदकथामालिका लेखन स्पर्धा.

विषय - माहेरवाशीण 


माहेरची साडी.

भाग- चार. (अंतिम.)



"यू मोस्ट वेलकम डिअर मम्मा. चला आता बाहेरच चहा घेऊ या. मी गरम करून आणते." रेवा.


"चल बाहेर. आणि हा चहा असू दे. मीच आपल्या दोघींसाठी दुसरा चहा करते." चहाचे कप घेऊन स्वयंपाकघराकडे जात गौरी म्हणाली.


******


"आज्जीऽऽ" बाहेरूनच साद घालत सुयश आत गेला. त्याला आणि त्याच्या पप्पांना रेवाने गौरीच्या मनातील खंत बोलून दाखवली होती. आणि म्हणून ते दोघं संध्याला माहेरापणाला घ्यायला सकाळीच मामाच्या दारात पोहचले होते.


"सुयश? इतक्या सकाळी, असा अचानक? काय झाले? गौरी बरी आहे ना? मला काल रात्रीपासून सारखी तिची आठवण येत होती." सत्तरीच्या आसपास पोहचलेली संध्या काळजीने विचारत होती.


"हो गं आज्जी. म्हणूनच तर तुला आणि आजोबांना आम्ही घ्यायला आलोय." तो.


"म्हणजे तिला खरंच बरं नाहीये का? जावईबापू?" 


"तू आमच्यासोबत तडक घरी चल बघू. तेव्हाच तुला समजेल."तिचे बोलणे मध्येच कापत जरासा गंभीर चेहरा करून सुयश म्हणाला. संध्या आणि तिच्या यजमानाने सुयशच्या पप्पाकडे पाहिले. त्यांचाही चेहरा गंभीर होता. शुभम कडे नजर टाकली तर मला काही माहित नाही म्हणून त्याने खांदे उडवले.


"आई, सुयश एवढा म्हणतोय तर जाऊन ये बघू. मी आणि सुलभा मागोमाग येतोच. " तो म्हणाला.


डोळ्याला पदर लाऊन संध्या कारमध्ये जाऊन बसली. गौरीच्या बाबांच्या मनात सुद्धा कालवाकालव होत होती. भरल्या मनाने तेही तिच्या बाजूला जाऊन बसले. पप्पा बाजूला बसल्यावर सुयशने कार सुरू केली. निघताना आपल्या लाडक्या मामाकडे बघून डोळा मारायला तो विसरला नाही.


खरं तर रात्रीच त्याने शुभम आणि सुलभाला फोन करून त्यांना आपल्या कटात सामिल करून घेतले होते. त्यामुळे ते घ्यायला आले तेव्हा काहीच ठाऊक नसल्याचा त्यांनी उत्तम अभिनय केला.


दोन तासात ते त्यांच्या घरी पोहचले. दारावरची बेल वाजली. दार उघडेपर्यंत गौरीच्या आईबाबांची धडधड वाढली होती. दोन मिनिटात दार उघडले. समोर सौभाग्याचा साज ल्यालेली गौरी हातात आरतीचे ताट घेऊन उभी होती. आईबाबाकडे बघून तिने गोड स्मित केले. त्यांचे पाय धुऊन, औक्षण करून त्यांना आत घेतले.


"गौरी, काय आहे हे? तू तर धडधाकट आहेस. मग हे दोघे आम्हाला असे का घेऊन आले?" सोफ्यावर बसताक्षणीच तिच्या वडिलांनी प्रश्न केला.


"माहेरापणाला." आईचा हात हातात घेत गौरी प्रेमाने म्हणाली.


"म्हणजे?" संध्या तिच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाली.


"आई बाबा, तुम्ही दोघांनी कधीच आईची माया अन वडिलांचे प्रेम अनुभवले नाही ना? आजपासून हे घर म्हणजे तुम्हा दोघांचेही माहेर आहे. आणि आई तुम्ही इथल्या माहेरवाशिण बरं." संध्याच्या आवडीचा नाश्ता प्लेटमध्ये भरत रेवा म्हणाली.


गौरी आणि रेवाने मिळून मग माहेरपणाची संकल्पना संध्याला सांगितली तेव्हा तिचे डोळे भरून आले. माहेर नावाचा हळवा कोपरा आपला नाहीच ही आयुष्यभराची सल तिच्या नातसुनेने आज भरून काढली होती.

आठ दहा दिवस मनसोक्त पाहुणचार झाल्यावर शुभम आणि सुलभा त्यांना घ्यायला आले.


"माहेरचे सुख अनुभवले असेल तर आता आपल्या घरी परत जाऊया. आईबाबा तुम्ही घरी नाहीत तर आम्हाला घर खायला उठलेय हो." सुलभा म्हणाली तशी मग गावाला जायची तयारी सुरू झाली.


गौरीने तिच्या पहिल्या माहेरपणात आणलेल्या त्याच गर्द निळ्या रंगाची नवीकोरी साडी आईला नेसवली. तेव्हा तिचा ऊर भरून आला. तिथून निघताना आज सर्वांचे डोळे पाणावले होते. देवकृपेने संध्याच्या पदरात सर्व सुखं होती. मुलगा, सून, नातवंडे सगळी प्रेमळ होती पण ही माहेरपणाची ऊब तिच्या पदरी पहिल्यांदा पडली होती.


एखाद्या माहेरवाशीण मुलीप्रमाणे माहेरची साडी लेवून संध्या आज डोळ्यात आसू आणि हसू घेऊन परतीच्या प्रवासाला निघाली होती.


*समाप्त *

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

********


🎭 Series Post

View all