माहेरची साडी. भाग -३

कथा एका माहेरवाशीणीची.

जलदकथामालिका लेखन स्पर्धा.

विषय - माहेरवाशीण 


माहेरची साडी.

भाग- तीन.


"आईचे प्रेम दडले आहे गं त्यात." ती खिन्न हसली. "पण आईला कधी असे प्रेम अनुभवायला मिळालेलंच नाही."


"म्हणजे?" गौरी इतकी हळवी होऊन बोलत होती तर राशीलाही ते ऐकून घ्यायची इच्छा अनावर झाली होती.


"माझ्या आईला माहेरचं नव्हतं अगं. ती लहान असताना आजी वारली आणि काही वर्षांनी बाबा तिला सोडून गेले. मामा मामी कडे वाढली ती. पण त्या लोकांनी कधी जीव लावला नाही गं." तिने आवंढा गिळला.


"पुढे तिच्या आयुष्यात माझे बाबा आले आणि त्यांनी लग्न केले. बाबांची अवस्था आईसारखीच. त्यांना सावत्र वडील, त्यामुळे वडिलांचे प्रेम लाभले नाही आणि आईनेही दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनाही मायेची अशी कोणीच नव्हते. माझ्या आणि शुभमच्या जन्मानंतर आम्हीच त्यांचे जग झालो. त्यांना त्यांच्या आईवडिलांचे प्रेम मिळाले नाही म्हणून त्यांनी आम्हा दोघांना खूप प्रेम दिले. मुलगी म्हणून माझ्यावर तर जास्तच जीव.

लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही खूप प्रेम मिळाले मला. माझे माहेरपण मी भरभरून जगले. तेव्हा कधी मला आईबद्दल फारसे वाटले नाही गं. पण आज जेव्हा रेवा तिचे माहेरपण करून गेली. ती जाताना माझ्या मनाची जी अवस्था झाली होती तीच अवस्था माझ्या आईचीही होत असेल ना गं? " तिने राशीकडे पाहिले.


"हो मम्मा, प्रत्येकच आईची ही अवस्था असते. मी इकडे परत येताना माझी मॉमसुद्धा हळवी होतेच की." तिचे हात हातात घेत राशी म्हणाली.


"पण हे हळवेपण माझ्या आईच्या वाटेला कधीच आले नाही गं. लग्नानंतर माहेरी ती कधी गेलीच नाही. कुठल्या माहेरी जाणार? जिथे कोणी हक्काचे नव्हतेच. ती मग कुणावर हक्क गाजवणार होती? ना माझ्या आईला आणि ना माझ्या वडिलांना त्यांच्या मायेच्या माणसांचे प्रेम लाभले. माहेरवाशीण म्हणून मिरवण्याचे भाग्य आईच्या वाट्याला कधीच लाभले नाही. मला त्याचे फार वाईट वाटते गं." एक हुंदाका देत गौरी म्हणाली.


"अहो मम्मा, एवढंच ना? मग आपण करूयात ना त्यांचे माहेरपण." राशीने गौरीच्या खांद्यावर विश्वासाचा हात ठेवत म्हटले.


"म्हणजे?" न कळून गौरी.


"म्हणजे आपण आईंना घरी घेऊन येऊ. त्यांच्या आवडीनिवाडीचे खायला करू. त्यांचे मस्त लाड करू. मी माहेरी गेल्यावर किंवा रेवा इथे आल्या वर जे कोडकौतुक होते तसेच काही करूया. काय म्हणता?" राशीने प्रस्ताव ठेवला.


"पण आईला आवडेल हे? आणि शुभम? त्याला तरी पटेल का आईने असे इथे येऊन राहिलेले?" गौरी.


"मम्मा, त्या तुमच्या देखील आई आहेत ना? त्यामुळे तुमच्यावर त्यांचा हक्क आहे. त्यांनी बिनधास्त इथे यायला हवे. आणि आपण तर माहेरपणाला बोलावतोय ना, कायमस्वरूपी नाही. मग मामांना काय प्रॉब्लेम असेल?" रेवा.


"हो गं रेवा. हे कधी माझ्या ध्यानातच आले नाही. माझे लग्न झाले. सासूबाई जरा कडक स्वभावाच्या होत्या म्हणून मग मुलीच्या संसारात लुडबुड नको म्हणून आई फारशी आपल्या घरी आलीच नाही गं. आली तरी एक दिवस राहून निघून जायची. मग मीच माहेरापणाला जाऊन माझी हौस भागवून यायचे. आता सासूबाई नाहीत पण तू म्हणालीस तसा कधी विचारही माझ्या मनात आला नाही. रेवा खरंच थँक यू." इतका वेळ नाराज असलेला गौरीचा चेहरा आता खुलला होता.


"यू मोस्ट वेलकम डिअर मम्मा. चला आता बाहेरच चहा घेऊ या. मी गरम करून आणते." रेवा.


"चल बाहेर. आणि हा चहा असू दे. मीच आपल्या दोघींसाठी दुसरा चहा करते." चहाचे कप घेऊन स्वयंपाकघराकडे जात गौरी म्हणाली.


रेवा म्हणते तसे खरंच गौरीच्या आईचे माहेरपण होईल का साजरे? वाचा पुढील अंतिम भागात.

:

क्रमश:

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

*****


🎭 Series Post

View all