माहेरची साडी. भाग -२

कथा एका माहेरवाशीणीची.
जलदकथामालिका लेखन स्पर्धा.
विषय - माहेरवाशीण 

माहेरची साडी.
भाग -दोन.

तिची नजर कपाटातील इतर साड्यांवर फिरली आणि जुन्या झालेल्या एका साडीवर स्थिरावली. तिने अलगद त्या साडीला बाहेर काढले. मऊसूत कॉटनची गर्द निळ्या रंगाची ती साडी! त्या साडीवर तिने आपला हात अलवारपणे फिरवला. साडीच्या त्या स्पर्शाबरोबरच तिचे मन माहेरच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलू लागले होते.

"आई गं, ही तुझी साडी मी नेऊ? किती सुंदर रंग आहे." लग्नानंतर पाहिल्या दिवाळीला आलेली गौरी संध्याला तिच्या आईला विचारत होती.

"काय गं ताई, तू नेहमीच आईच्या साड्यावर टपून असतेस. तुला आईने नवीकोरी साडी घेतलीये ना तरीही?" शुभम, गौरीचा लहान भाऊ तिला चिडवत होता.

"ए, तू असू दे रे शुभम. तुला काय कळतं? गौरी, तुला आवडली ना ही साडी? मग ठेव तुलाच." संध्या साडीची घडी करून गौरीच्या बॅगेत ठेवत म्हणाली.

"हं. मस्त मज्जा आहे गं ताई तुझी. एकावर एक फ्री." शुभम तिला चिडवत होता.

"ए गप रे. तू मुलगी नाहीस ना म्हणून तुला काही कळत नाही. माहेरवाशीणीची हीच तर मजा असते. आणि ही साडी खास आहे. आईची जेव्हा आठवण येईल तेव्हा ही साडी मी नेसत जाईन." जराशी भावनिक होत गौरी म्हणाली.

"हो? असं म्हणून आजवर आईच्या चार साडया पळवल्यास. मला माहित नाही का?" तो तिची खेचत म्हणाला तशी गौरी त्याला मारायला त्याच्या मागे धावली.

"नेसली माहेरची साडी." तिचा मार हुकवत शुभम तिला चिडवत होता.

"आई बघ ना गं? कसा हा चिडवतो?" गौरी त्याला सोडून संध्याकडे येत म्हणाली.

"अग्गो माझी लाडुताई? आईकडे माझी कंप्लेंट करतेस होय? घाबरलो ना मी." घाबरल्याची ॲक्टिंग करत शुभम म्हणाला तसे संध्या ने त्याचा कान पकडून त्याला समोर ओढले.

"काय रे सारखं तिला त्रास देतोस? चार दिवस माहेरपणाला आलीये लेक तर तिला सुखाने राहू दे ना." ती त्याला दमटावत होती. हे बघून गौरी नाकाच्या शेंड्यावर अंगठा ठेवून हात हलवत त्याला वाकुल्या दाखवत होती.

"कशी जिरवली एकाची?" हसत ती म्हणाली. तसा तोही तिला जीभ दाखवून चिडवू लागला.

"आई, बघ ना ताई कशी चिडवतेय मला?" तो लटके रुसून म्हणाला.

"चिडवू दे रे. तिथे सासरी काय नवऱ्याला चिडवणार आहे का?" संध्या हसून त्याच्यावरच उलटली तशी गौरी त्याच्याकडे खुन्नस दाखवत हसायला लागली.

"चला, गरमागरम जिलेबी.." तेवढ्यात बाबा गौरीच्या आवडीची जिलेबी घेऊन आले.

"सगळं ताईच्या आवडीचे. मी तर कुणाला आवडतंच नाही." लहानसा चेहरा करून शुभम म्हणाला.

"चल, नाटकं करू नकोस. माझा आवडता तर तुच आहेस." त्याला जिलेबीचा तुकडा भरवत गौरी म्हणाली.

तेव्हाची ती जिलेबी गौरीच्या नजरेसमोर गोलगोल फिरायला लागली आणि आईबाबाच्या आठवणीने डोळ्यातील थेंब त्या निळ्याभोर साडीवर ओघळला.

"मम्मा,आराम करताय का? चहा घ्यायला बाहेर आला नाहीत म्हणून तुमच्याच खोलीत घेऊन आले." चहाचे कप घेऊन आत येत राशी म्हणाली.

"अं, नाही गं. ही साडी घे. रेवाने तुझ्यासाठी ठेवलीय." डोळ्यातील अश्रू लपवत गौरी म्हणाली.

"मॉम, ठेवा हो तुमच्याकडेच. नेसायची असली की मागेन तुम्हाला." राशी हसून म्हणाली.
"आणि ही कुठली साडी? सुंदर रंग आहे." तिच्या हातातील साडी बघत राशीने विचारले.

"माझी माहेरची साडी आहे. आईकडून आणलेली." बोलताना गौरीला दाटून आले.

"मम्मा तुम्ही रडताय? आईच्या आठवण येते का?" तिच्या डोळ्यातील पाणी बघून राशीने विचारले.

"हम्म. तसंच काहीसं. तुला माहितीए राशी, ही साडी ना मी आईकडून आणली होती. आज रेवा जशी हक्काने माझी कांजीवरम घेऊन गेली, अगदी तशीच. माझ्या पहिल्या माहेरपणाला. " ती हळवी होत म्हणाली.

"वॉव! आणि ती तुम्ही आत्तापर्यंत जपून ठेवली. ग्रेटच."

"आईचे प्रेम दडले आहे गं त्यात." ती खिन्न हसली. "पण आईला कधी असे प्रेम अनुभवायला मिळालेलंच नाही."

"म्हणजे?" गौरी इतकी हळवी होऊन बोलत होती तर राशीलाही ते ऐकून घ्यायची इच्छा अनावर झाली होती.

का अशी म्हणाली असेल गौरी? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

🎭 Series Post

View all