माहेरची साडी. भाग -१

कथा एका माहेरवाशीणीची.

जलद कथामालिका लेखन स्पर्धा.

विषय - माहेरवाशीण 


माहेरची साडी.

भाग -एक.


"मम्मा, येते गं. काळजी घे. दिवसा ऑफिसच्या कामामुळे कॉल करायला जमणार नाही. पण रोज रात्री आठवणीने फोन करत जाईल. तूही करत जा आणि ऐक, रडू नकोस. माझी आठवण आली ना की एक कॉल कर. दुसऱ्या दिवशी तुला भेटायला दारात हजर होईन बघ." लग्नानंतर पहिल्यांदा माहेरपणाला आलेली रेवा सासरी जायला निघाली तेव्हा ती तिच्या मम्माला म्हणजे गौरीला समजावत होती.


"आणि पप्पा तुम्हीही काळजी घ्या. औषधं वेळेवर घेत जा." वडिलांच्या गळ्यात पडून ती म्हणाली.


"सुयशदादा, वहिनी तुम्हीही मम्मी पप्पांकडे लक्ष ठेवा. स्वतःला जपा." सुयश आणि त्याची बायको राशीकडे बघून ती म्हणाली.


"येस डिअर लिटल सिस. यू डोन्ट वरी. मै हू ना?" काहीसे गंभीर झालेले वातावरण हलके करत सुयश हसून म्हणाला. त्याच्या बोलण्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडे हसू उमलले.


"खरंच काळजी करू नकोस. आम्ही सगळे आहोत." राशी लाडक्या नणंदेला मिठी मारत म्हणाली.


काही वेळाने डोळ्यातील अश्रू पुसून सगळयांनी रेवा आणि तिच्या नवऱ्याला निरोप दिला.


"काय गं मम्मा, रेवा तिच्या आवडीच्या मुलाबरोबर लग्न करून गेली तेव्हाही रडलीस. आत्ता आपल्याला भेटून गेली तेव्हाही रडतेस." रेवा गेल्यावर सुयश गौरीच्या गळ्यात हात गुंफुन म्हणाला.


"तुला आत्ता नाही कळायचं. तुला मुलगी होऊन सासरी जाईल ना तेव्हा समजेल तुला." त्याचे नाक ओढत गौरी म्हणाली.


"इम्पॉसिबल. मी तर माझ्या मुलीच्या नवऱ्याला स्वतःच्याच घरी ठेवेल. त्यामुळे असं काही होणार नाही. हं, तो त्याच्या माहेराहून इकडे येताना रडेल ती गोष्ट वेगळी. काय गं राशी?" तो राशीकडे बघून म्हणाला.


"बघू, बघू. आधी स्वतःच्या बायकोचे लाड पुरव. नंतर मग तुझ्या मुलीच्या नवऱ्याला आपल्या घरी रहायला बोलावं." गौरी त्याला टपली देत सूचक हसत म्हणाली तशी राशी गोड लाजली.


लेक सासरी गेली आणि घर एकदम सुने सुने वाटायला लागले. आवरायला म्हणून गौरी आपल्या खोलीत गेली तर बेडवर पडलेल्या दोन साडया तिच्याकडे टक लाऊन बघत आहेत असे तिला वाटले. खरं तर तिने रेवासाठीच तीन साड्या आणल्या होत्या, त्यातल्याच या दोन. तीन साड्यापैकी तिने एकच साडी निवडली होती आणि गौरीच्या कपाटातील दुसरीच साडी मात्र हक्काने सोबत घेऊन गेली.


"तीन तीन साडया मला कशाला गं मम्मा? मी कुठे जास्त साडया नेसते? यातली एक तू ठेव आणि एक वहिनीला दे. आणि ती तुझी एक कांजीवरम होती ना, ती मला आठवण म्हणून दे." रेवा तिला म्हणाली तेव्हा तिच्या हक्काच्या मागणीने तिनेही लगेच ती नवीकोरी कांजीवरम तिच्या हातात ठेवली होती.


बेडवरच्या त्या दोन साड्यापैकी राशीची साडी बाजूला ठेवत स्वतःची साडी कपाटात ठेवायला ते उघडले. तिची नजर कपाटातील इतर साड्यांवर फिरली आणि जुन्या झालेल्या एका साडीवर स्थिरावली. तिने अलगद त्या साडीला बाहेर काढले. मऊसूत कॉटनची गर्द निळ्या रंगाची ती साडी! त्या साडीवर तिने आपला हात अलवारपणे फिरवला. साडीच्या त्या स्पर्शाबरोबरच तिचे मन माहेरच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलू लागले होते.


काय होता गौरीचा भूतकाळ? आणि माहेरच्या कोणत्या आठवणी तिला छळत होत्या? वाचा पुढील भागात.

:

क्रमश:

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

*****


🎭 Series Post

View all