माहेरचं वाण...भाग 1
सोसायटीतल्या सगळ्या मैत्रिणी आज गार्डनमध्ये जमलेल्या होत्या. अधिक महिना सुरू झाल्यामुळे सगळ्यांच्या चर्चेला उधाण आले होते. सगळ्या गप्पा गोष्टीत रंगलेल्या होत्या.
"काय ग यावेळी तुमचं कुणाचं माहेरी जाणं झालेलं नाहीये का? अजून माहेरी गेलाच नाहीत कुणी?" रमाने उत्साहाने सगळ्यांना विचारलं.
"आपलं कसलं ग माहेर, यावेळी जावयाचा मान आहे त्यांचचं माहेर म्हणायचं." अनुराधा बोलली तश्या सगळ्या हसायला लागल्या.
"माझ्या घरी तर बाई हे एकटेच गेले होते."सायली नाक मुरडून बोलली.
"माझ्या आईने स्पेशली मला फोन करून बोलावलंय, दोघेही या. आईने माझ्यासाठी साडी घेऊन ठेवली आणि यांना चांदीचा काहीतरी वाण देणार आहे." पूजाने हसून सांगितलं.
"हं तुझा लग्नानंतरचा पहिलं वर्ष ना."
सगळ्यांनी तिला चिडवलं.
"ये मस्त आहे गं यावर्षीचा अधिकमास, सगळे छान माहेरपण एन्जॉय करतायेत. त्यानिमित्ताने वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात आणि माहेरी जाऊन दोन दिवस राहता येते, मौजमस्ती करता येते."
सगळ्यांच्या गोष्टी रंगल्या होत्या, अदिती मात्र एकटीच वेगळ्या बाकावर बसलेली होती. सगळ्यांच्या गप्पागोष्टी झाल्या आणि सगळ्या आपापल्या घरी जायला निघाल्या. सायलीचे लक्ष अदितीकडे गेलं.
ती सायली जवळ जाऊन बसली.
"काय ग अदिती तू का अशी उदास बसली आहेस?"
"मला कुणीच बोलवणार नाही माहेरी?"
हे ऐकताच सायलीपण उदास झाली, तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिने तिच्या हातावर हात ठेवला, डोळ्याने तिला आधार दिला आणि ती तशीच तिथून निघून गेली.
घरी गेल्या गेल्या निखिलला बोलली,
"निखिल मला तुला काहीतरी विचारायचं होतं?"
"हा बोल न."
"ती आपल्या फ्लॅटमध्ये जी अदिती असते ना, तिला ना मला घरी बोलवायचं आहे."
"मग बोलव ना त्यात काय एवढं विशेष?"
"निखिल हे बघ तू..तू बस इथे. मी तुला थोडं स्पष्ट सांगते."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा