माहेरची मनी भाग 1

एका प्राणी प्रेमी मुलीची धम्माल गोष्ट

माहेरची मनी.

" तृप्ती,अग ये तृप्ती! कुठे उलथली कार्टी?" सुमनताई ओरडल्या.
"आई,एवढी मनीला नेल पॉलिश लावून आलेच!"आतून जोरात आवाज आला.

"जळल मेल लक्षण ते. मनीला बघणार आहे का तो मुलगा?"

आईचा आवाज तार सप्तक भेदून गेला. तशी धावत तृप्ती बाहेर आली.


तर ही आपली नायिका तृप्ती कदम. जिचा जन्म मांजर कुळात व्हायचा तो चुकून माणसात झाला. आजूबाजूला किमान चार मांजरे असली तरच हिला झोप येते.

लहान असताना आई आणि बाबा तिला लाडाने समजावत. परंतु वयानुसार मांजर प्रेम वाढतच गेले.

आता नुकतेच पदवीधर झालेल्या तृप्तीच्या लग्नासाठी आई मागे लागली.

"तृप्ती,आज येणारा मुलगा छान आहे. चांगला पगार आहे,कुटुंब चांगले आहे." आई समजावत होती.

तेवढ्यात गुरर्र करत मनी तिच्या मांडीवर येऊन बसली. आईने सगळी तयारी केली. पाहुणे आल्यावर बाबा आणि पार्थ बाहेर गप्पा मारत बसले.

"मुलीला बोलावता ना?" इति मुलाची आई.

तृप्तीला पाहताच तो मुलगा गालात हसला. त्याला मुलगी आवडली होती.

"अग,पाहुण्यांना चहा दे." आई हळूच म्हणाली.

तृप्ती चहा देत असतानाच मनी आली आणि सरळ त्या मुलाच्या मांडीवर बसली.

"ईईई,तुमच्याकडे मांजर आहे." मुलाची आई ओरडली.

"मनी,मनी नाव आहे तिचे." ओठ दाताखाली दाबत तृप्ती म्हणाली.

"अहो,पण आमच्या हेमंतला मांजरांची एलर्जी आहे." मुलाचे बाबा बोलले.
कसेबसे कार्यक्रम करून पाहुणे घराबाहेर पडले.


"काय म्हणाली ती माझ्या मनीला? मांजर? माझ्या छकुलीला मांजर म्हणाली. कोण तो हेम्या,मनीची एलर्जी." तृप्तीचा पारा चढला होता.

" पण ताई अग त्याला दहा लाखाचे पॅकेज आहे. पोरगा कसला हँडसम आहे." पार्थ बोलला.

असे म्हणताच तृप्ती भडकली,"माझ्या मनीला मांजर म्हणाले. माझा नकार आहे."

"बरं,तसेही पहिलेच स्थळ आहे." बाबा तृप्तीची बाजू घेत होते.

"डोक्यावर घेऊन नाचा राजकुमारीला." आई रागाने आत निघून गेली.

दोनतीन दिवसांनी सुमनताईला तिच्या बहिणीचा फोन आला." कुमे,काय सांगू तुला....." असे म्हणून सगळे वर्णन सांगून झाले.


" एवढेच ना? तुझा प्रश्न सोडवला म्हणून समज. माझ्याकडे एक स्थळ आहे." कुमुदने आश्वस्त केले.


दुसऱ्या दिवशी मावशीने मुलाची माहिती व्हॉट्स ॲप केली. रवी पाटील, बी. ई. कॉम्प्युटर. ह्याच शहरात नोकरीला. एकुलता एक. देखणा आणि छान नोकरी असलेला. आई तर वाचून खुश झाली.

तरीही आईला शंका होती."कुमे,पण मांजरीचे काय?"

आईने विचारताच कुमुद म्हणाली,"त्याची काळजी करू नकोस."

यावेळी पार्थसुद्धा सावध होता. त्याने रवी पाटीलला सोशल मीडियावर शोधले. त्याच्या फॅमिली फोटोत एक गलेलठ्ठ बोका पाहून पार्थ खुश झाला.


"आई,तू त्यांना मनीबाबत सांगून ठेव. परत काही लोचा नको." तृप्तीने धमकावले.

" लोच्या,ही काय भाषा ग? मागच्या वेळी इतके काही झाले नव्हते. आता मांजरीला तू मांजर समजत नसलीस तरी ती मांजरच आहे." सुमनताई रागाने म्हणाल्या.

" आई,तू मनीला तीन वेळा मांजर म्हणालीस!" तृप्ती ओरडली.

इतक्यात,"गोंद्या आला रे!" असे म्हणून पार्थने पाहुणे आल्याचा सिग्नल दिला.

काय होईल पुढील भागात? हे लग्न ठरेल का?

©®प्रशांत कुंजीर

🎭 Series Post

View all