माहेर लग्नानंतरचं.. भाग १

कथा एका लेकीची


माहेर लग्नानंतरच..


"सोना, देवाचे वस्त्र कुठे ठेवले आहेस? पटकन दे गुरूजी ताटकळले आहेत." लग्नघरातला पहिला आवाज आला.

" बाबा तिथेच ठेवलं आहे. कलशाच्या बाजूला."

" सोना.. अग हा चहा तेवढा बाहेर नेऊन देतेस का?"

" हो काकू.. हातातली तुळशीपत्र ठेवून येतेच."

" सोना.. माझं उपरणं सापडत नाहीये." आतून दादाने विचारले.

" ते मला कसं माहित असणार? विचार तुझ्या बायकोला?" नवीन वहिनीला डोळा मारत सोनल म्हणाली. ते ऐकून दादा गोरामोरा झाला..

" देणार असशील तर दे.. उगाचच काहीही बोलू नकोस."

" देते थांब." त्याला वेडावून दाखवत सोनल बोलली.

" सोना.. इथे ये जरा." आईने हाक मारली.

" बोला.. नुसते सोना, सोना, सोना.. उद्या माझं लग्न झाल्यावर काय करणार काय माहित?" आईच्या हातातली भाजी घेत सोनल म्हणाली.

" तुझं लग्न झालं तरी आम्ही कामासाठी तुला इथे बोलावून घेत जाऊ." सोनल तावडीत सापडली हे बघून दादाने मस्करी करायला सुरुवात केली.

" मी काय तुमची मोलकरीण आहे का? कामं करायला बोलावणार म्हणे.." सोनाच्या डोळ्यात बोलता बोलता पाणी आले. कारण हळूहळू तिच्यासाठीही स्थळं चालून येऊ लागली होती. ते बघून आईला वाईट वाटलं.

" का रे, सतत माझ्या लेकीला त्रास देतोस? असंही तिच्या वाचून तुझं पानही हलत नाही. मग कशाला उगाच रडवतोस?" आई दादाला ओरडली.

" सोना.. तू त्याच्याकडे लक्ष नको देऊस. घे आधी ही खिचडी खाऊन घे. कधीपासून नाचते आहे बिचारी पोर." काकू गरम खिचडीची बशी सोनाच्या हातात देत म्हणाली.

" आणि मला?" दादाने विचारले.

" तुला टुकटुक.." सोनल त्याला चिडवू लागली.

" असं कसं टुकटुक.. हे बघ.." असं म्हणत दादाने सोनलच्या बशीमधली खिचडी खायला सुरुवात केली. एकमेकांना चिडवत दोघांनी ती खिचडी संपवली सुद्धा. त्या दोघांचे वागणे बघून आई आणि काकूने डोळे टिपले.

"माझ्या लेकीवरचं सगळ्यांचं प्रेम असंच राहू दे.." आई मनात म्हणत होती.

दादाची लग्नाची पूजा झाली आणि लगेचच सोनलला एक चांगले स्थळ चालून आले. सोनलचे शिक्षण पूर्ण झाले होतेच. तिला नोकरी करून बघायची होती. पण नोकरीसाठी हे स्थळ गमवावे असे घरातल्यांना वाटत नव्हते. सोनललाही अक्षय आवडला होताच. मग तिनेही जास्त आढेवेढे न घेता लग्नाला होकार दिला. सोनल सासरी जाणार म्हणून आईला वाईट वाटत होतं.. पण ती आपली सतत एकच वाक्य म्हणायची, एक लेक आली आणि दुसरी चालली. हे ऐकून सोनलला वाटू लागले खरंच का वहिनी आल्यामुळे आईला माझी उणीव भासणार नाही? हा विचार मनात आला की ती उदास व्हायची. ते बघून दादा आणि तिची चुलत भावंडे परत तिला हसवू लागत. त्या मस्करीत हे सगळे विचार तिच्या मनातून निघून जायचे.

सोनलचे लग्न लागले. वहिनीच्या पाठवणीच्या वेळी हसणारी सोनल स्वतःच्या लग्नात मात्र खूप रडली. आणि माहेरच्या सगळ्यांचा निरोप घेत सासरी आली.

सासरी आल्यावर सोनलचे माहेरचे प्रेम तसेच राहिल की बदलेल? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all