May 15, 2021
नारीवादी

माहेर

Read Later
माहेर

मीनल दिवाळीची सगळी तयारी अगदी मनापासून करत होती.. तिने घराची सजावट खूप छान केली होती.. फुलांच्या माळा, फुलांचे तोरण सगळे काही तिने मन लावून केले होते.. फराळही छान बनवला होता..

आता दिवाळीला सुरुवात झाली.. तिने सारं काही आनंदाने केले.. धनत्रयोदशी, दिवाळी आणि लक्ष्मीपूजन सगळा विधी अगदी मन लावून पार पडले.. तिच्यात कसलीही कसर सोडली नाही..

आता आजचा दिवस भाऊबीजेचा उजाडला.. मीनल आज सकाळपासूनच खूप उदास होती.. तिचे कशातच लक्ष लागत नव्हते.. दिवाळीसाठी सारं काही आनंदात वावरणारी मीनल आज सकाळपासून खूप दुःखी होती.. ती दुःखी असण्याचे कारण सगळ्यांना माहिती होते.. त्यामुळे मी तिला काहीच बोलले नाही.. मीनलने सकाळी उठून स्वयंपाक केला.. सगळं आवरले आणि खोलीत जाऊन रडू लागली.. कारण दरवर्षी भाऊबीजेला येणारा तिचा भाऊ आज येणार नव्हता.. कोरोनाच्या या महाभयंकर रोगामुळे तिचा भाऊ गेला होता.. त्याला कोरोनाची लागण झाली होती.. त्यातून तो सुटावा म्हणून तिने देवाची मनोमन प्रार्थना केली होती.. पण तिचे दुर्दैव या रोगातून तिचा भाऊ वाचू शकला नाही.. तिला सकाळपासूनच खूप वाईट वाटत होते.. घरच्यांनीही खूप समजावले.. पण शेवटी भाऊच होता तो.. त्याची आठवण आल्याशिवाय कसे राहणार??

तिला आठवू लागले.. तिचा भाऊ जाता जाता काहीतरी खोड्या काढायचा.. ती चिडायची आई सांग ना याला किती छळतो हा मला.. आईला सांगायची.. आईला त्यांची भांडणं सोडवू पर्यंत नाकीनऊ यायची.. पण ते दोघे भांडणारही आणि एक होणारही..

तो दर रक्षाबंधन आणि भाऊबीजला यायचा.. अगदी न चुकता.. ती पण त्याच्या आवडीचे गोडधोड बनवून त्याला खाऊ घालायची.. लहानपणी चिडवून मग गिफ्ट देणारा तो आता न मागताच गिफ्ट देत होता.. ती सारं काही आठवून रडू लागते..

तिला आता माहेर म्हणून उरलेच नव्हते.. एकुलता एक भाऊ होता तो पण कोरोनाने हिरावून नेला.. आता माहेर म्हणून काय उरले? असे तिला वाटू लागले.. इतक्यात तिचा भाचा येताना तिला दिसला.. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.. ती उठून त्याला आत बोलावते.. "आत्या आईने हे फराळाचे आणि साडी दिली आहे.." तिचा भाचा म्हणाला.. हे ऐकून तिचे डोळे पाणावले.. वहिनीने माहेर जपलय.. आणि भाच्यालाही तेच संस्कार देत आहे.. तिला मनोमन आनंद झाला आणि तिने पाणावलेल्या डोळ्यांनी वहिनीला फोन केला..

फोनवर तिला काहीच बोलता येईना.. डोळ्यातून पाणी वाहू लागले.. "ताई, मी असेपर्यंत तुमचे माहेर जिवंत असेल.. तुम्ही काळजी करू नका.." हे ऐकून ती रडू लागली..


खूप दमायला झालं की
विसावा घ्यायला लागत एक हक्काच माहेर..
खूप काही मनात साचले की
हलक करायला लागत एक हक्काच माहेर..
मनावर दडपण असलं की
मोकळं करायला लागत एक हक्काच माहेर..
सुख म्हणजे नक्की काय असतं
ते समजायला लागत एक हक्काच माहेर..
मी तुझ्या सोबतच आहे
असे सांगायला लागत एक हक्काच माहेर..
किती काम करशील थोडा विसावा घे
हे सांगायला लागत एक हक्काच माहेर..
अंगणात बागडायला
लहानपण जगायला लागत एक हक्काच माहेर..
थोडा विसावा घ्यायला
मन रमवायला लागत एक हक्काच माहेर.. 

Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..