महाश्वेता भाग १

कथा आपल्या स्वतःच्याच शरीराशी लढणाऱ्या एका मुलीची

महाश्वेता..



" आणि या वर्षीची कॉलेज क्वीन आहे मिस ऐश्वर्या.." टाळ्यांच्या कडकडाटात ऐश्वर्या स्टेजवर गेली.. तिथे प्रायोजकांनी तिच्या डोक्यावर तो क्राऊन ठेवला.. आणि अचानक तिच्या डोळ्यांवर प्रकाशाचा झोत आला.. "पुरे करा.. खूप झाले फोटो.. पुरे करा.." ती सगळ्यांना सांगत होती.



 " काय पुरे करायचे आहे? ऊठ आता गुपचूप.. नाहीतर अंगावर पाणी ओतीन.." ऐश्वर्याची आई स्मिताताई खिडकीचे पडदे बाजूला करत ओरडल्या.. 

" आई, तू पण ना.. माझ्या छान स्वप्नांवर पाणी फिरव.. कसले छान स्वप्न पडत होते.. मी परत एकदा कॉलेज क्वीन झाले होते.. भरपूर टाळ्या.. आणि फोटो.." ऐश्वर्या डोळे चोळत म्हणाली..

"कॉलेज क्वीन होण्यासाठी आधी कॉलेजला जावे लागते.. घरी झोपा काढून कोणी कॉलेज क्वीन होत नाही."

" हो ग माझे आई.. आवरते आणि जाते.." स्मिताताई पाठमोर्‍या ऐश्वर्याकडे बघत राहिल्या.. त्यांनी तिच्याकडे बघून तिची अलाबला घेतली. कोणाची दृष्ट नको लागायला माझ्या लेकीला..

        ऐश्वर्या आणि तन्मय.. स्मिता आणि राहुल यांची मुले.. चौघांचे छोटेसे मध्यमवर्गीय कुटुंब होते.. तन्मय दहावीला तर ऐश्वर्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती.. ऐश्वर्या, दिसायला जेवढी सुंदर तेवढीच अभ्यासात हुशार आणि वागायलाही नम्र.. त्यामुळे स्मिता आणि राहुल दोघांनाही तिचा फार अभिमान होता. चुणचुणीतपणा आणि सगळ्यांशी मनमोकळेपणाने बोलण्याचा स्वभाव यामुळे कॉलेजमध्ये काही दिवसातच ऐश्वर्या शिक्षकांची तसेच विद्यार्थ्यांचीही लाडकी झाली.. मैत्रिणींनी केलेला आग्रह आणि आईवडिलांनी दिलेली परवानगी म्हणून तिने कॉलेजच्या ब्युटी क्वीन स्पर्धेत भाग घेतला होता आणि लागोपाठ चार वर्षे तो किताब ती जिंकत होती. हे ऐश्वर्याचे कॉलेजचे शेवटचे वर्ष होते त्यामुळे काहिही झाले तरी या वर्षीपण जिंकायचेच असा तिच्या मैत्रिणींचा हट्ट होता. मनातून कुठेतरी ऐश्वर्याला सुद्धा ते हवे होतेच.. पण त्याहीपेक्षा तिच्यासाठी महत्वाचे होती सुजयची इच्छा.. सुजय सध्या कॉलेजचा माजी विद्यार्थी.. कॉलेजच्या आजी माजी विद्यार्थीनींचा क्रश.. सध्या तो पोस्ट ग्रॅज्युएशन करत होता. पण आपल्या फोटोग्राफीच्या प्रावीण्यामुळे कॉलेजच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजर राहत होता..कॉलेजची सेवा हे एक कारण.. दुसरे कारण होते ऐश्वर्या..

        ऐश्वर्याला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला होता.. तिचे ते लाघवी बोलणे, खळखळून हसणे.. बोलताना तोंडाने कमी आणि चेहर्‍यावरच्या हावभावांनी ती जास्त बोलायची.. एक ना दोन.. हजार कारणे शोधून काढली होती त्याने तिच्या प्रेमात पडण्यासाठी. 

तसा तिलाही तो आवडला होताच पण बोलत कोणीच नव्हते.. आधीपासूनच कॉलेजचा फोटोग्राफर असल्याचा फायदा सुजयला खूप झाला.. फोटो काढण्याच्या बहाण्याने, ते देण्याच्या बहाण्याने दोघांचे बोलणे , भेटणे व्हायचे. सुजय मधल्या फोटोग्राफरचे मत होते ऐश्वर्याने मॉडेलिंग करावे किंवा सौंदर्य स्पर्धेत भाग घ्यावा.. पण त्याच्यातल्या प्रियकराला मात्र हे स्वीकारणे जड जात होते.. दोघे जेव्हा जेव्हा आपल्या भविष्याबद्दल बोलायचे तेव्हा सुजय तिला नेहमीच वेगवेगळ्या सौंदर्य स्पर्धेत भाग घ्यायला सांगायचा.. पण अभ्यासाचे निमित्त सांगून ऐश्वर्या ते टाळायची.. पण आता तिची खात्री पटत चालली होती. हिच वेळ होती ठरवायची पुढच्या करियरची दिशा आणि आयुष्याचीही.. कारण एकदा कॉलेज सुटल्यावर परत सुजयची कुठे आणि कितपत गाठ पडेल याचा काहीच अंदाज लावता येत नव्हता.. शेवटी आज त्याच्याशी जे काही आहे ते बोलायचेच असा तिने स्वतःशीच निर्णय घेतला होता.. काहिही झाले तरी सुजयशी बोलायचेच.. तिने सुजयला फोन केला..

 "हॅलो सुजय.."

" बोल ना.."

" बिझी आहेस?"

" तुझ्यासाठी नेहमीच रिकामा.." ऐश्वर्याच्या गालावर गुलाब फुलले..

"उद्या भेटूया?"

"नेकी और पुछ पुछ?"

" किती वाजता?"

" सकाळी अकरा वाजता?"

" मी वाट पाहतो.."

   सुजयला भेटायचे तर ठरले पण त्यासाठी छान तयारी करायला पाहिजे ना.. तिने आपल्या पार्लरवाल्या ताईला फोन करून घरी बोलावले.. सौंदर्य स्पर्धेत भाग घेत असल्यामुळे महिन्याला तिचे फेशियल चालायचे त्यामुळे आईही त्यावर काहीच बोलायची नाही.. त्या ताई आल्या.. त्यांनी फेशियलला सुरुवात केली..

"ऐश्वर्या.. "

" काय ताई?"

" तू आईसमोर कपडे बदलतेस?"

" ताई.. काहिही काय विचारतेस?"

"सांग पटकन.."

" नाही.. तशी वेळच येत नाही.. पण तू आज हे असे का विचारते आहेस?"

" आईला बोलाव ना.."

" ताई....."

" सांगते ते ऐक.."

" आई.. ए आई.."

" काय ग,काय झाले? टॉवेल हवा आहे का?"

" काकू, जरा इथे येता का?"

 तिच्या आवाजातले गांभीर्य स्मिताताईंना जाणवले..

" काय ग?"

तिने त्यांना खुणावले.. स्मिताताईंचा हात तोंडावर गेला. ऐश्वर्याला हा सस्पेन्स सहन होत नव्हता..

" कोणी सांगेल का मला काय झाले आहे ते?"

स्मिताताई आणि ती ताई दोघी चिडीचूप होत्या.. 

" आई प्लीज सांगना.."

आईने तिला आरशासमोर उभे केले.. तिच्या पाठीशी एक आरसा धरला.. ऐश्वर्याचे सगळे विश्व क्षणार्धात बदलले.. पाठीवर एक पांढरा चट्टा उठून दिसत होता..

" ताई, हे तुमचे पैसे.." ताईंनी काहीच न बोलता सामान उचलले आणि पैसे न घेताच त्या निघाल्या..

" ताई, हे कोणालाच सांगू नका हां.." स्मिताताईंनी त्यांना विनंती केली.

" एवढाही विश्वास नाही माझ्यावर.. अहो गेली पाच वर्ष या पोरीचे सगळे करते आहे मी.. लोकांना नेहमी सांगते त्वचा असावी तर ऐश्वर्यासारखी. आणि आता हे.. कसे सांगणार मी?"

स्मिताताईंच्या डोळ्यात पाणी होते. "आई थोडावेळ मला एकटीला बसू देशील, प्लीज? जाताना दिवा बंद करून जा.." स्मिताताई खोलीबाहेर गेल्या..आतून कडी लावण्याचा आवाज आला.. नंतर एक जोरात फोडलेला हंबरडा ऐकू आला.. स्मिताताईंच्या ह्रदयाचा ठोका चुकला. त्यांनी लगेच ऐश्वर्याच्या बाबांना ऑफिसमधून बोलावून घेतले.. ते ही लगेच आले..

" ऐश्वर्या, अग दरवाजा उघडतेस ना? प्लीज उघड ग.. तुला माझी शपथ आहे.." खूप वेळ आतून फक्त रडण्याचा आवाज येत होता..

" असे काय करतेस ग. प्लीज उघड ना." स्मिताताई काकुळतीने म्हणाल्या.

दरवाजा उघडला.. रडून डोळे लाल झालेली त्यांची लेक त्यांच्यासमोर उभी होती.. तिची अवस्था बघून दोघांनाही भरून आले.. ती तशीच तिच्या बाबांच्या गळ्यात पडली आणि परत रडायला लागली.. " सगळं संपलं.. सगळं संपलं.."



क्रमशः

कथेचा हा भाग कसा वाटला सांगायला विसरू नका..


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

🎭 Series Post

View all