Login

मागोवा भाग तीन

विशेष पुरावा नसतांना एका पोलीस इन्स्पेक्टरने उलगडलेली केस आणि त्यातून समोर आलेलं सत्य
भाग - ३

भाग दोन मध्ये आपण पाहिलं... आशुतोषला हॉटेलच्या मागे तरुणीची डेड बॉडी सापडते. पण ओळख पटत नाही. आता पुढे...

थोड्या सूचना देऊन, दुसर्‍या दिवशी सकाळी नऊ वाजता हॉटेलच्या स्टाफची चौकशी ठरवून. आशुतोष घरी परतला. गाढ झोपलेल्या अश्विनीला बघून तिला न उठवता तो बेडवर पडला. पण त्याला अजिबात झोप येत नव्हती.

सकाळी नऊ वाजता, चांदणी हॉटेलमध्ये झाडून सगळा स्टाफ आशुतोष समोर उभा होता.

"मग, मिस्टर मॅनेजर साहेब काय प्रकार म्हणायचा हां? मूर्ख समजलात का पोलिसांना? ओरिजिनल रजिस्टर कुठे आहे? ह्या रजिस्टरमध्ये नाव, पत्ता, फोन नंबर काहीच धड नाही. गोरे, दाखवा तो कागद. बघा, बरेचसे नंबर लागतच नाहीत. सीसीटिव्ही पण नाही तुमच्याकडे? काय पैशासाठी जीवनाचा खेळ मांडलाय का? कोण आहे ती मुलगी?" आशुतोषचा आवाज ऐकून सगळे चळाचळा कापत होते.

"साहेब चुकलं, परत असं नाही होणार. बसवून घेतो कॅमेरा आणि इथून पुढे फोन नंबर पण तपासून घेईन. एकदा माफ करा. आम्हाला कुणालाच त्या पोरीबद्दल माहित नाही सर. चेहरा तर काही दिसत नव्हता. पण आमच्या हॉटेल मध्ये तशी पोरगी मागच्या आठवड्यात नव्हती हो... कसं सांगू तुम्हाला?" मॅनेजर काकुळतीला येऊन म्हणाला.

"कायदा पुरावे मागतो. बाप दाखवं नाहीतर श्राद्ध कर, कळलं का? बघून घेईल एकेकाला, अजूनही वेळ आहे, कुणाला काहीही माहिती असेल तर आत्ताच सांगा नाहीतर..." पिस्तुल मॅनेजरवर रोखत आशुतोष तिथून निघाला.

आजूबाजूच्या हॉटेलमध्ये, गावकऱ्यांकडे, दुकानात सगळीकडे चौकशी करूनही कुठलाच दुवा हाती लागत नव्हता. रिजनल हेड ऑफिस किंवा अगदी प्रत्येक छोट्या मोठ्या पोलीस स्टेशनला फोन करून अशा मिळत्या जुळत्या व्यक्ती विरुद्ध तक्रार असल्याची नोंद आहे का, ही विचारणाही करण्यात आली होती.

एव्हाना दोन्ही डेड बॉडीजच्या पोस्टमाॅर्टम मध्ये, बऱ्याच गोष्टी समोर आल्या होत्या. एकतर दोघीही साधारण पंचवीस ते तीस वर्षाच्या होत्या. दोघींचा मृत्यू नैसर्गिक नसून खून असण्याचीच शक्यता होती. आणि मुख्य म्हणजे दोघींच्या योनीमार्गात (vagina ) धातू म्हणजेच सीमेन आढळून आलं होतं. पण तरीही ह्या गोष्टींवरून त्या एकाच माणसाने केल्या हे नक्कीच सिद्ध होत नव्हतं कारण एकीचा मृत्यू चाकूच्या वारांनी, तर एकीचा गळा दाबून केला होता.

डेड बॉडी सापडून आज आठ दिवस झाले होते. कुठेच मिसिंगची तक्रार नसल्याने आणि पोलिसांनी सदर व्यक्तीची माहिती देऊनही कुणी विचारण्यासाठी न आल्याने आता आशुतोषने हा नाद सोडावा, असं वाटत होतं. पण आशुतोषच्या मनातून विचार जात नव्हते.

"अश्विनी, प्लिज एक स्ट्रॉंग कॉफी दे नां..." खुर्चीवर बसत तो म्हणाला.
"लगेच आणते" म्हणत अश्विनी उठली.

वाफाळती कॉफी आशूला देत ती म्हणाली, "काय रे, काय झालं? थकला आहेस का? त्या डेड बॉडी संबंधी काही आणखी माहिती? "

"हो गं. चांदणी हॉटेलमध्ये आणि आसपासच्या हॉटेलमध्ये कुठेच तिचे फिंगर प्रिंट्स मॅच होत नाहीत. पण ती छोटी पॉकेट डायरी नव्हती का मिळाली...त्यावर त्या मुलीचे फिंगर प्रिंट्स आहेत. पण त्यातही काहीच नाही लिहिलेलं. एका फाटक्या पानावर फक्त 4NO4444 असं लिहिलंय. त्याला डिकोड करायचा प्रयत्न चाललाय. पण यश मिळेना. काहीतरी चुकतंय गं. खूप वाटतंय मला, काही तरी कनेक्शन आहे. चार महिन्यांपूर्वी आणि त्या आधी वर्षापूर्वी अशाच मुलींच्याच डेड बॉडी मिळाल्या होत्या. पण कुणाच्या...? त्याचाच पत्ता नसल्याने तपास बंद नाही, पण थंड होत गेला. पण माझं मन अस्वस्थ आहे. काहीतरी गडबड आहे..."

"मी पोलीसअधिकारी नाही, तुमच्याएवढी शार्प पण नाही. पण असंच मनात आलं, गाडीचा नंबर असेल? ती शक्यता पडताळून पाहिलीस?" अश्विनीने विचारलं.

आशुतोषने पटापट फोन लावून सगळी यंत्रणा कामाला लावली. आणि ह्या नंबरच्या सगळ्यांना राज्यातील गाड्यांची यादी मिळवली.

त्यातल्या एका नावावर त्याची नजर स्थिर झाली...

ज्या नावावर आशुतोषची नजर स्थिर झाली होती, ते नाव होते रोझी बाटलीवाला...! त्याला त्याच क्षणी तिच्या हातावरील गुलाबाचा टॅटू आठवला, शिवाय कपडे आठवून त्याला वाटलं ही तिच असणार.

दुसऱ्या दिवशी रोझीची माहिती काढली असता, ती मुंबईतील एका उद्योजकाची मुलगी असल्याचे कळले आणि गाडी नुकतीच खरेदी करण्यात आली होती. अर्थातच गाडी रोझीच्या नावावर... म्हणजे बापाकडे रग्गड पैसा असणार, हे आशुतोषने ताडले. पण ही तीच का हे कसं कळणार? त्यांच्या घरात तिचा फोटो दिसला तरी उपयोग नाही. कारण चेहरा आपण बघितलेला नाही. त्यांनाही फोटो दाखवून उपयोग नाही. मुख्य म्हणजे मोठ्या उद्योजकाची मुलगी असती तर निदान मिसिंगची तरी तक्रार केली असती त्याने...पण त्या पोलीस स्टेशनला तशी तक्रारही नाही. ती नसेलच...पण मला वाटतंय, तीच असेल...आशुतोष समोर मोठा प्रश्नं होता.

अखेर प्रत्यक्ष रोझीच्या घरी जाऊन सोक्ष मोक्ष करायचा, असं त्याने ठरवलं आणि तो मुंबईला गेला.


क्रमशः

खरंच ती रोझी असेल? आशुतोषला नक्की उत्तरं मिळतील?
००

🎭 Series Post

View all