Login

मागोवा भाग चार

विशेष पुरावा नसतांना एका पोलीस इन्स्पेक्टरने उलगडलेली केस आणि त्यातून समोर आलेलं सत्य
भाग - ४

भाग तीन मध्ये आपण पाहिलं, मयत मुलीची ओळख पटवण्यासाठी आशुतोष मुंबईला पोहचतो. आता पुढे...

'लकी बाटलीवाला' ही पाटी बंगल्या समोर दिमाखात चमकत होती. वरकरणी घरात काही दुःख, चिंता असेल असं वाटत तरी नव्हतं. एक पोलीस अधिकारी जरी असलो, तरी असं कोणाच्या घरात पूर्वकल्पना न देता, पुराव्या शिवाय... 'नुसतंच वाटतंय' ह्या आधारावर कसं जावं, हा विचार करत असतानाच गेटवरच्या सिक्युरिटीने गणवेश बघताच त्याला आत घेतलं.

बंगला तसा खूप मोठा किंवा अगदी उच्चभ्रू म्हणावा असा नव्हता. हॉल मध्ये बसून त्याची टेहाळणी चालू होती. एक फॅमिली फोटो होता. नवरा बायको आणि तीन मुली. साधारण मोठी बारा तेरा वर्षांची आणि धाकटी पाच वर्षांची असावी. शिवाय मागचं दृश्य बघता एखाद्या गावातील फोटो वाटत होता. छे, ही तिची फॅमिली नसावी. उगीच आलो आपण इथे...असं स्वतःला बोलं लावत असताना लकी बाटलीवाला समोर आले.

"ते इन्स्पेक्टर...आमच्या घरला कशामुळे आले?" लकीने चाचरत विचारलं आणि त्याच्या टोन वरून आशुतोषला वाटलं आपलं येणं ह्यांना अपेक्षित होतं की काय?

आशुतोष उत्तर देणार तेवढ्यात, "पपा बाय...वूई विल कम बॅक बाय एट..." म्हणत दोन मुली, साधारण विशीच्या आत बाहेरच्या 'लकीला' बाय करत होत्या.

अच्छा, म्हणजे हा त्यांच्या लहानपणीचा फोटो आहे तर...मग तिसरी कुठे? आशुतोषच्या मनातला संशय बळावला.

"ए जस्मिन, लीली हाऊ कॅन यु फर्गेट टिफिन? आणि ते मोबाईल घेतला नां? मला टेन्शन येते, फोन केला की पीक करालाच पाहिजे..." मिसेस बाटलीवाला धावत पळत टिफिन देऊन गेल्या. जस्मिन, लीली म्हणजे तिसरी रोझी असूच शकते. लकीने बायकोला ओरडून सांगितलं, "ते इन्स्पेक्टर साहेबला, चाय पाठवं."

"साहेब बोला नी, ते इकडे कसं आले?" लकीच्या बोलण्यातली भीती आशुतोषला स्पष्ट जाणवत होती.

"तिसरी मुलगी कुठे तुमची?" आशुतोषने डायरेक्ट विचारलं. लकी चपापला, "आम्हाला दोनच मुली असते..." असं थोडक्यात उत्तर त्याने दिलं.

"पण मग हा फोटो?" आशुतोष.
"हां ते माझ्या ब्रदरची पोरगी असते. ती इकडे न्हाय."

"खरं?" असं डोळ्यात डोळे घालून आशुतोषने विचारताच लकी घाबरला. त्याला घाम सुटला. "डार्लिंग, चाय पाठवं नी..." म्हणत तो खाली बसला.

आता तर आशुतोषची खात्री पटली की, रोझी आणि ह्या केसचा काहीतरी संबंध आहे नक्की...! त्याने विचारलं, "कुठाय रोझी?"

त्याचवेळी चहा घेऊन आलेल्या मिसेस बाटलीवाला रोझीचे नाव ऐकून थबकल्या. त्यांची रिऍक्शन बघून लकी ओरडला, "ए साला तू इथे काय करते नी, बाबुरावकडे दे चाय, तू आत जा..."

आशुतोषच्या पटकन लक्षात येताच त्याने मोर्चा त्यांच्याकडे वळवला, "इज रोझी युवर डॉटर? हे तिचं आहे का?" म्हणत त्याने रोझीच्या हातातील घड्याळ आणि टॅटूचा फोटो मिसेस लकीला दाखवला.

"येस, बट ते पांचगणीला गेले असते. तुम्हाला काय मालूम तिच्याबद्दल?" तिने उत्सुकतेने विचारलं.

लकीला आता कळलं होतं की आशुतोष आता माहिती काढणारच. तो रागाने म्हणाला, "शी इज माय डॉटर...पण आम्ही म्हणजे मी तिच्याशी बोलत नसतोय...शी इज अडल्ट नाऊ, मी तिची जबाबदारी घेत नाही..." त्याने रागाने मिसेसकडे बघितलं.

"ते तू माझ्याकडे बघू नको, तू फादर असते तिचा, यु कांट से इट...इन्स्पेक्टर, टेल मी, काय झाला, मी हेल्प करते रोझीची...आय लव्ह हर...तू सांग तरी..." मिसेस लकी म्हणाल्या.

"आता रोझीची मदत करायची गरज नाही. तुम्ही माझीच मदत करा तिला न्याय मिळवून द्यायला..." म्हणत आशुतोषने सगळी कथा सांगितली. रोझीचे फोटो दाखवले.

प्रथमदर्शनी तरी ही तिच असल्याचं वाटत होतं. बाटलीवाला कुटुंब दुःखात बुडालं होतं. एक वडील म्हणून लकी देखील खूप रडत होता.

बाटलीवाला कुटुंब सावरल्या नंतर आशुतोषने त्यांना सत्य काय ते सांगण्याची विनंती केली. लकी आणि तिच्या बायकोची डीएनए टेस्ट घेण्यात आली.

रोझीचा मृत्यू झाला. हे ही तिच्या घरच्यांना माहित नाही. किंवा तिची मिसिंग कम्प्लेंट त्यांनी केली नाही. ह्याचं खूप आश्चर्य वाटत होतं आशुतोषला. नेमकं काय झालं असेल हे जाणून घ्यायला तो उत्सुक होता...

लकीने बोलण्यास सुरुवात केली. "सर, मी आणि मिसेस, रायगडच्या छोट्या व्हिलेज मंदी रहात होते. आम्हाला तीन डीकरी, त्यात रोझी एल्डर छोकरी. माझा कापडचा बिझनेस हळूहळू वाढू लागला. मी मुंबईला माल देऊ लागलो. आठवड्यातून चार दिवस मी मुंबईला असायचो. पण फॅमिली तिकडे...मंग मी हा बंगला घेतला. मी एकलच रहायचो इथं मुंबईला आलो की. तवर रोझी बडी झाला. आता घरात पैसा ज्यादा झाला की पोरींला बी ज्यादा मस्ती आली सर. रोझी लई खर्चा कराची. मी तिला एक दोनदा स्कोल्ड केला, मग कमी झाला. पण नंतर काही दिवसांनी मला माझा फ्रेंडनी लई वेगळं सांगितलं. ती पैशासाठी...साहेब... सांगायला पण लाज येते साहेब..."

क्रमशः

काय सांगायचं असेल लकीला? त्या माहितीतून खुन्यापर्यंत पोहचू शकेल आशुतोष?
००

🎭 Series Post

View all