बोला गुणसुत्रांची कमाल!

Magic of sex chromosomes

#बोला_गुणसुत्रांची_कमाल!

गंगा आमच्या बिल्डींगजवळच्या फुटपाथवर बसणारी फुलवाली. पहाटे उठून घरातलं सारं आवरुन एक टिपॉय,  स्टूल व फुलांची टोपली घेऊन बसायची. तिचा नवरा,शंकर फुलमार्केटमधून फुलं आणायचा.

 गंगाला दोन लेकी,थोरली माया नि धाकटी छाया. दोन्ही लेकी आईवडिलांना मदत करतात. माया घरात केरवारा करते,भांडी घासते. धाकटी आईने धुतलेले कपडे वाळत घालते. देवाच्या गुणाच्या लेकी. दिसायला मायासारख्याच सावळ्या,टपोऱ्या पाणीदार डोळ्यांच्या,हसऱ्या,बोलक्या.

 संध्याकाळी या दोघी आपापली पुस्तकं घेऊन ठेल्यावर बसायच्या. मोगरा,जाई,जुई,सायलीचे हार टिपॉयवर रचून ठेवलेले असायचे. कोणी गिर्हाईक आलं की गजरा हाताने मापायच्या,ब्लेडने तोडून,हिरव्यागार पानात गजऱ्याची गुंडाळी ठेवून पानाची टोकं दुमडायच्या व दोऱ्याने बांधत,हसऱ्या डोळ्यांनी पुडी गिर्हायकाला द्यायच्या. पैशाचा हिशेब बरोबर ठेवायच्या. कोणी गिर्हाइक नसेल तेव्हा घरचा अभ्यास करत बसायच्या. 

संध्याकाळी गंगा घरातलं आवरायची तर तिचा नवरा हातगाडीवर मक्याची कणसं,लिंबं विकायचा. घरात सासू होती. तशी धट्टीकट्टी होती. गंगा या घरात आली तेव्हा सासू तिला फार जीव लावत होती पण एका वर्षात गंगा नि शंकऱ्याचं विरजण लागलं नि मायाचा जन्म झाला.

 सासूचं तोंड एवढूसं झालं . सासूला नातवाची आशा होती. दुसऱ्या वेळेला गंगा गरोदर राहिली तेव्हा सासूने तिला माहेरी जाऊ दिले नाही. गेल्या टायमाला म्हायराला गेलली तवा पोरगी घिऊन आली. हे टायमाला इथच काय ते होवंदे,सासू म्हणाली. सासूने नऊ महिने गंगीची अगदी मनापासून काळजी घेतली. तिला खाऊ वाटेल ते करुन घालायची. 

थोरल्या नातीला सांभाळची. तिला सांगायची,"बाय,तुजा भाव येनार हाय तुजेसंगती खेळायाला." छोटी माया खुदकन हसायची नि आजीच्या मांडीवर जाऊन बसायची पण गंगीला दुसरीसुद्धा मुलगीच झाली नि सासूचं टाळकंच फिरलं. तिला गंगीचा खूप राग आला होता तरी तसल्यानेच तिला मेथीची भाजी,ज्वारीची भाकरी खाऊ घालायची. 

त्यातच शंकरची मिल बंद पडली. काही महिने घरातल्या साठवणुकीवर काढले मग मात्र शंकरने गंगीला दोन्ही पोरींसकट थोड्या दिवसांसाठी माहेरी पाठवले. 

तिथेच गंगीने मुलं बंद होण्याचं ऑपरेशन करुन घेतलं. सासूला ते कानोकानी कळलं. गंगीच्या माहेराला येऊन सासूने हंगामा केला. गंगीने शंकरला बोलवून घेतलं. शंकर आईला म्हणाला,"तू काय आमाला आपरेशन करुन देणार नव्हतीस म्हनून मीच गंगीला इथं र्हावून करुन घे म्हनलं. येकतर नोकरी नाय त्यात कुटुंब वाढवीत कशापायी राहू. झाल्या दोन पोरी देवाच्या दयेन त्या बास झाल्या मला." 

"या सटवीन ठार यडा केलाय तुला. करा दोघंबी जीवाला वाट्टल त्ये. माज्या म्हातारीचं कोण आईकतया. सवताचा पोरगाच आयकिनासा झाला तर दोष तरी कोनाला देयाचा."

 त्याच दिवशी शंकर गंगी नि दोनीव लेकींना घरी घेऊन आला. गंगीच्या माहेरी शेजाराला फुलाचं दुकान होतं. तिथे तिची उठबस असायची. हारवाल्या काकाकू़सोबत बसून गंगीने हार,गजरे शिकून घेतले होते. 

               गंगीने नवऱ्याला फुलांचा धंदा करुया म्हणून सांगितलं. शंकर म्हणाला,"मालासाठी पैकं कुठनं हानायाचं?"

"काय काळजी करु नका. ह्या डोरल्यातले मणी ठेवा गहान,मंग सोडवू आपुन."

"खुळी क काय तू,गंगी."

"खुळीच समजा पन येवडं माजं आयका."

 शंकर मनात नसतानाही ते डोरलं गहाण ठेवून पैसे घेऊन आला. मेन मार्केटला गंगीच्या माहेरच्या शेजाऱ्यांच्या ओळखीचे फुलविक्रेते होते. शेजाऱ्यांनी शंकरची नि त्यांची रुजवात घालून दिली. 

शंकर पहाटे जाऊन मोगरा,पिवळीपांढरी शेवंती,अस्टर,गुलाब,सायली,झेंडू..अशी सारी फुलं घेऊन यायचा. मुलं लहान असताना गंगी घरात बसून गजरे,हार करुन द्यायची. शंकर विक्रीला बसायचा. 

कधी एक दिवस आराम नव्हता गंगीला. घरातलं करायचं,लेकी सांभाळायच्या,गजरे करायचे. त्यात सासूचं तोंड नुसतं चालू असायचं,"न सांगता ## आपरेशन करुन आली. माज्या पोराला फसिवला. त्याला आपले बाजून केला. तो मला इचारिनासा झाला. या सटवीन जादू केली तेचेवर.

 शंकरची बहीण वर्षातून दोनदा माहेरपणाला यायची. तिला दोन मुलगे होते..गोरेपीट तिच्याचसारखे. म्हातारी त्यांची अलाबला करायची. त्यांना खायला घेऊन द्यायची पण नातींचा राग राग करायची. 

माया नि छाया जरा मोठ्या झाल्या तशा गंगी घरातलं आवरुन गजरे विकायला बसू लागली नाही वाढता खर्च भागवण्यासाठी शंकर हंगामी फळांची गाडी घेऊन फिरायचा. 

गंगी म्हातारीला उलट उत्तर करत नव्हती. तिच्याकडे कानाडोळा करायची पण मुलींना समज यायला लागली होती. आजी आपला रागराग करते. आपण मुली म्हणून तिला आवडत नाही हे त्या चिमण्या जीवांना कळू लागलं होतं. 

               माया,छाया दोघीही आईला घरकामात मदत करायच्या. आईला परवडेल अशाच गोष्टी मागायच्या. उगा नको ते हट्ट करत नव्हत्या. मायाला पहिली पाळी आली तेव्हा शंकरने तिच्यासाठी पावकिलोभर सुका मेवा आणला. म्हातारीला दिसलं तशी जाम कातावली,"काय गरज या पोरींले सुका मेवा खाऊ घालायाची. लोकाच्या घरला जायच्या हायती. कशाला उगा लाड करितो त्याहिंचे. डोक्यार बसतील तवा समजंल."

"अगं,माये तुला काय दवापानी हवं ते देतो ना मी मंग कशापायी कावतीस?"

"कशापायी कावतीस!आरं मला नातू हवा होता रं . तो तुज्या बायकोनं कुठं दिला! आपरेशन करुन मुरडीत आली. तुबी तिच्या पदरामांग लपनारा आनि येक लेकरु झालं आसतं तर काय बिगाडलं आसतं? या पोरी जातील लगीन करुन. मंग काय हात चोळीत बसनार हायसा?

 माझंच चुकलं तुज्या बायकोला भाव नाय. तवा टकुर चालवाया पायजे हुतं. हिच्या मायला पोरगा न्हाय तर हिला तरी कसा हुनार? तवा लक्षात नाय आलं माज्या." म्हातारी रातभर अशीच बरळत राहिली. 

मायाला फार वाईट वाटायचं जेव्हा आजी तिच्या आईला मुलावरुन बोलायची. खरंतर भाऊबीजेदिवशी,रक्षाबंधनादिवशी तिलाही वाटायचं,आपल्याला एक भाऊ हवा होता. मग त्या दोघी एकमेकींना राखी बांधून एकमेकींचे तोंड गोड करायच्या. 

एके दिवशी विज्ञानाच्या बाई वर्गात  गुणसुत्रांविषयी शिकवत होत्या.. मानवी शरीरात गुणसुत्रांच्या तेवीस जोड्या असतात. बावीस जोड्या या स्त्रीपुरुषांत सारख्याच असतात. तेविसाव्या जोडीला लिंग गुणसूत्र म्हणतात(सेक्स क्रोमोझोम्स) ही स्त्रियांमधे xx असते तर पुरुषांमधे xy अशी असते. ज्यावेळी शुक्राणू आणि स्त्रीबीज यांचे मिलन होते तेव्हा गर्भ तयार होतो. यावेळी स्त्रीच्या एक्स गुणसुत्राशी पुरुषाचं वाय गुणसूत्र येऊन मिळालं तर मुलगा होतो व स्त्रीच्या एक्स गुणसुत्राशी पुरुषाचं एक्स गुणसूत्र येऊन मिळालं तर होणारं अपत्य हे मुलगी असते. 

झर्रकन मायाचे डोळे लकाकले. सगळा वर्ग शांतपणे ऐकत होता. माया उठून उभी राहिली,"म्हणजे बाई,स्त्रीवर अवलंबून नसतं मुलगा किंवा मुलगी होणं?"

"मुळीच नाही. लिंग हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून असतं आणि ते त्यालाही कुठे ठाऊक असतं,नक्की कुठचं त्याने दिलं ते."

"म्हणजे बाई..एखाद्या बाईला मुलगा होत नाही म्हणून छळतात ते चुकीचं ना."

"हो माया. अगदी बरोबर बोललीस तू. बाईचा,तिच्या माहेरच्या माणसांचा यात काही संबंध नसतो." मायाला हे सारं ऐकून फार आनंद झाला. 

बाईंनी मग त्यांना सांगितलं की गर्भलिंगनिदान करणं हा एक गुन्हा आहे तरी बरेचजण गर्भलिंगनिदान करुन स्त्रीभ्रुणहत्या करतात व त्यामुळे स्त्रीपुरुषांच्या गुणोत्तरात प्रचंड तफावत होते. निसर्गाच्या विरुद्ध माणूस पाऊल उचलतो व त्याची शिक्षाही भोगतो. आजकाल जे बलात्कार होतात त्यांना काही अंशी स्त्रियांचं घटतं प्रमाणही जबाबदार आहे.

मायाला तिच्या वडिलांचा खूप अभिमान वाटला कारण शंकरने त्या दोघी बहिणींना जन्माला येऊ दिलं होतं व फुलासारखं सांभाळत होता तो त्यांना.

घरी येताच ती आजीजवळ जाऊन बसली नि आजीला सांगू लागली,"आज्जे,तू सदा माझ्या मायला पोरगा नाय म्हून नाव ठिवतीस."

"होय मंग काय चुकीचं बोलिते मी? हाय पोरगं तिच्या कुशीनं उजिवलं? हाय का येकबी वंशाचा दिवा?"

"आज्जे,आजच आमाले बाईंनी शिकविलं, पोरगा किवा पोरगी होनं हे बाच्या गुणसुत्रावर अवलंबुन आसतया. आता आमच्या बाचं नेमकं एक्स गुणसुत्र जास्ती चपळ निगालं म्हून आमी जन्माला आलो नायतर माझ्या मायला पोरगा झाला आसता. माझ्या मायचा ह्यात काय बी दोष नाय तवा परतपरत माज्या मायला नि माज्या आजवळच्या मानसांना जर नावं ठिवलीस तर शाळंतल्या बाईंनाच आनून तुझ्यापुढं उभी करीन नायतर तुलाच उचलून शाळेत घिऊन जाईन."

म्हातारी मायाचा अवतार बघतच बसली नि मनात म्हणाली,"आसं असतया व्हय. म्हंजे माज्या पोराचीच चुकी नि मी लोकाच्या पोरीला बोल लाविला जनमभर."

गंगीला जाम हसू येत होतं हे आजीनातीचं गुज ऐकून तिने गरमगरम ज्वारीची भाकरी दुधात चुरुन म्हातारीला दिली. म्हातारी मनात म्हणत होती,"आजपातूर लयी दुखावलं बग सुने तुला पन या पोरीनं डोळे उगाडले माजे."

--------सौ.गीता गजानन गरुड.