माघी गणपती उत्सव - अविस्मरणीय अनुभव !

ते वातावरण इतकं भरून टाकणारं जणू भक्तीरस, स्फुरण आणि स्फूर्ती यांचा मिलाफच!

दरवर्षी  जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येणारा माघी गणपती उत्सव, कोकणातील बऱ्याच गावांमध्ये अतिशय उत्साहात साजरा केला जातो.  आईकडून बरच ऐकलं होतं परंतु नेमक्या तेव्हा परीक्षा येत असल्यामुळे  कधी बघितला नव्हता. साधारण नव्वदच्या दशकात असेल, गणपती बाप्पाच्या कृपेने त्या वर्षी उत्सवाला जाण्याचा योग आला.आईच्या माहेर-गावी म्हणजे गुहागर तालुक्यातील एका छोट्याशा गावी आम्ही (मी आणि आई) जाऊन धडकलो.

हे डोंगरात वसलेलं गाव. लोकसंख्या तीन चारशे पेक्षाही कमी असावी. गावात ५-६ मुख्य घर. गर्द झाडी मध्ये लपलेली कौलारू घरं. एका घरातून दुसरीकडे जाताना डोंगर चढावा तरी लागे किंवा उतरावा तरी. घरापर्यंत गाडी जात नसे.  

एरवी तुरळक वस्ती असणारं गाव शहरातून आलेल्या पैपाहुण्यांनी अगदी भरून गेलेलं.

गावातल्या गणेश मंदिरात (एका गावात एकच गणपतीचं देऊळ ) सर्व गावकरी मिळून हा उत्सव साजरा करत. 

डोंगराचा उंच कडा, त्याच्या पायथ्याशी हे छोटेखानी देऊळ. देवळाच्या चारही बाजूने पन्नास एक फुटांची मोकळी जागा, देवळाच्या समोरची पन्नास एक फुट मोकळी जागा संपली की डोंगर उतार परत सुरू ( कसच ते  दरीच म्हणा, )५०-६० फूट खाली  एक दोन घर आणि एक छोटेखानी सभागृह, जेथे उत्सवाचे गाव जेवण केले जाई.

तर हा माघी गणती उत्सव २-३-५ दिवसांचा असतो. 

आदल्या दिवशी देवळाची सजावट, पताका बनवून लावणे,  लाल मातीच्या सारवलेल्या अंगणात रांगोळ्या काढणे, भींती कोनाड्यावर बोरू सारख्या काड्यांनी चुन्याची रांगोळी-नक्षी काढली जाई. 

मुख्य दिवस हा गणेश जयंतीचा.

सकाळी गणेशजन्मची धामधूम, साग्रसंगीत पूजा अर्चा चाले.

तर खालच्या सभागृहात स्वयंपाकाची तयारी. पाहुण्या रावळ्या सकट सर्व माणसे महाप्रसादासाठी जमत. गावातील मंडळी मिळूनच बहुदा स्वयंपाक करत असावीत. ते नीटसं आठवत नाही परंतु पंगती मात्र आठवतायत. पत्रावळी/ केळीच्या पानांच्या पंगती. "वदनी कवळ " पासून, "नमः पार्वती पतये हर हर महादेव" चा गजर. ताक , पाणी, लिंबू वगैरे वाढायला आम्ही केलेली लुडबुड. सगळ्यांना जेवताना गंध लावायचा एक loop असे त्याने गंध लावले जाई. खाली जेवणं उरकतायत तोवर वरती दुपारी गावातल्या स्थानिक मुलांसाठी काही स्पर्धा वगैरे आयोजित केल्या असतं. 

संध्याकाळी कीर्तन. त्यानंतर मुख्य आरती. ह्या मोठमोठ्या आरत्या, घालींग लोटांगणला गोल गोल उड्या मारत स्वतः भोवती फिरायचे, मंत्रपुष्पांजलीचा लांबलेला ओ सगळंच एकदम भारी!

आरत्या झाल्या की चालू होत सवाया! पहिली आणि शेवटची सवाई ठरलेली असे ( मंगलाष्टकां सारखं) पण मग मध्ये बाकी उत्साही मंडळींची सवाया म्हणायची स्पर्धा चालू असे. एक म्हणुन झाली की ती संपता  संपता दुसरा पुढची म्हणू लागे. सवाया म्हणजे  वेगवेगळ्या देवतांवर असलेले छोटे श्लोकच.. पण एका ठराविक चालीत म्हणायचे. ऐकायला फारच छान वाटते. एक उदाहरणार्थ, (मला अगदी दोन शब्द आठवत होते आणि थोडी google कृपा)

" रामदुत, रामदुत वायुसुत भीमगर्भ जुत्पती

जो नरात, जो नरात वानरात भक्तीप्रेम वित्पती.. "   

सर्व मुरब्बी मंडळींचे पाठ असतं, नवशिकू ( माझ्यासारखे) बघून म्हणत.

एक दीड तास सवाया चालल्यावर मग भोवत्या.

मंदिराच्या उजवीकडून सुरुवात करायची. आरती भोवती गोल धरायचा आणि दिंडीत नाचतात तस् गोल धरून नाचायच (अगदी ग्यानाबा तुकाराम च्या ठेक्यावर नाचतात तस). त्यावेळी ही " सूर्य उगवला प्रकाश पडला.." सारखी भजनं, भारुडं म्हणत आरती नाचायची. मग देवळाची पाठीमागची बाजू तिकडे परत तसाच गोल करून दिंडी नाचवायची. अगदी तेवढ्याच उत्साहात आणि भजनांच्या जल्लोषात! वातावरण इतकं भरून टाकणारं - भक्तीरस, स्फुरण आणि स्फूर्ती यांचा मिलाफच!

मग मंदिराची डावीकडची बाजू. तिथेही असच गोल करून आरती नचवायची.त्यानंतर मग सांगता.

भोवत्या कमीत कमी २-३  तास तरी चालतं असाव्यात, घड्याळ नाही बघितले पण नाचून नाचून पायांचे जे तुकडे पडले त्यावरून हा अंदाज.

मग कीर्तनाचा उत्तरार्ध चाले आणि हळू हळू मंडळी पांगू लागत.

माघ महिन्यात छान थन्डी असते, आणि कोकणात तर जास्तच गारवा जाणवतो. रात्री झोपायला एक लांब लचक सतरंजी टाकली जाई, त्यावर फार तर एखादी घोंगडी. ओळीने सगळ्यांनी झोपायचे.

दुसऱ्या दिवशी आम्हाला दुसऱ्या एका गावात तिकडच्या उत्सवा साठी जायचे होते. त्यामुळे आई आणि मी अगदी लवकरच उठून आवरून निघालो. बऱ्यापैकी अंतर चालून( म्हणजे डोंगर चढून - उतरून ) एका ठिकाणी आधी टमटम ( ६ जणांच्या टमटम मध्ये १२-१३ लोक कोंबलेले ) मग एसटी बस असं मजल दरमजल करत आम्ही त्या गावी पोहचलो. हे गाव सपाटीला होत आणि मोठ होतं. त्यांच्याकडे त्यादिवशीचा महाप्रसाद होता मसाले भात, भरली वांगी आणि मठ्ठा. गावातल्या लोकांनी मिळून केलेला तो साधासा स्वयंपाक इतका चविष्ट होता की आता २५ एक वर्षांनी पण लक्षात राहिलाय. त्या गावात रात्री स्थानिक कलाकारांच नाटक होतं. ठेवणीतले कपडे घालून सजून अजून सारं गाव लोटले होते बघायला. नाटक विशेष आठवत नसले तरी बालगंधर्व थाटात नटून थटून, जरीच्या साड्या नेसून आणि शेले घालून आलेल्या बायका मंडळी लक्षात राहिल्यात.

दुसऱ्या दिवशी एसटी पकडुन आम्ही घरी परतलो ते कोकणातल्या उत्सवाचा सप्तरंगी उत्साह घेऊनच.

त्यानंतर परत कधी उत्सवाला जायचा योग आला नाही. पण २५ वर्षानंतरही what's app group वर आलेल्या फोटोला नमस्कार पाठवताना माघी गणपतीचा तो एकच वर्ष अनुभवलेला उत्सव हटकून आठवतो, त्यावेळी प्रथमच ऐकलेल्या सवाया कानात घुमू लागतात आणि डोळ्यांसमोर पालखी-भोवंत्या सगळं परत उभं राहतं जसच्या तस!

गणपीबाप्पा मोरया ????????????????

©Prerana kulkarni