मागणी (भाग -८ )

A Father's worry for his beautiful daughter's marriage proposal.
मागणी (भाग -८)


पूर्वसुत्र-
"बळवंतराव आडनावावर जाऊ नका. माजी नगरसेवक भाऊराव पाटील ,कारंजगाव यांचा मुलगा आहे तो. आम्ही ओळखतो त्याला. आपल्यातले नाहीत ते!"
आता मात्र बळवंतराव मटकन खुर्चीवर बसले.
क्रमशः


कथा पुढे-
मागणी (भाग -८)
आता मात्र बळवंतराव खरंच विचारात पडले. आपण मागणी मागणी असा विचार करतो आहोत ते नेमकं काय आहे? राधाला पहायला आलेल्या उपेंद्रने एका नजरेत पाहून तिला मागणीच तर घातली होती पण आपण पुढे जाणं टाळलं आणि यंदा कर्तव्य नाही असं कळवलं.
आता सगळ्या दृष्टिकोणातून योग्य वाटेल असा मुलगा मागणी घालतोय पण तो परजातीचा आहे. कसे पुढे जाणार? खरचं माझं स्वप्न पूर्ण होईल का ?
ते बेचैन झाले. त्यांनी रमणीलाही कॉलेजात त्याला भेटू किंवा बोलू नकोस अशी ताकीद दिली. मग त्यांना रमणीची काळजीच वाटायला लागली. तो अतुल राजकारणी माणसाचा मुलगा आहे व त्याला तोंडावर नकार दिला तर कसं होईल? ही काळजी मन पोखरायला लागली.
आठवडाभराने दिघें करवी अतुल कारंजकरां पर्यंत हा निरोप गेला की रमणीला सजातीय, वयात योग्य अंतर वगैरे पाहूनच विवाहाचा विचार केला जाईल, त्यामुळे क्षमस्व ! आम्हाला कर्तव्य नाही.
या घटनेनंतर सुट्टया होत्या त्यामुळे विषय पुढे वाढला नाही आणि विस्मृतीत गेला.
पण रमणीच्या मनात काही अनुत्तरित प्रश्न राहिलेच.
बारावीच्या परिक्षांनंतर सुट्टया संपल्या बळवंतरावांच्या मनातील मागणीची प्रतिक्षा जणु संपत आली पण एकही स्थळ स्वतःहून आलं नाही.
तिची बारावी झाल्यानंतर रमणी त्याच कॉलेजात बी. कॉम करू लागली तेव्हा बळवंतराव अस्वस्थ व्हायला लागले.
त्यांना आता बढाई मारायला संधीच मिळत नव्हती.
यादरम्यान कधी रमणी ही कॉलेज बद्दल घरी काहिच बोलत नव्हती. कॉलेजला जाणे , घरी अभ्यास करणे व आईला मदत करणे हे तिचं रूटीन. पण तिच्या स्वभावात यादरम्यान खूप बदल झाला होता. शिक्षण माणसाला ज्ञान देतं व स्वतःचं मत बनवण्याचं किंवा व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य ही देतं. मैत्रिणीं चा स्पष्ट वक्तेपणा , थोडासा आत्मविश्वास तिने कमावला होता व आताशा तसी मनातली भीतीही गेली होती. या यादरम्यान तिचे प्रॉब्लेम तीच सोडवत होती,घरापर्यंत काहीही यायचं नाही. मितभाषीपणा हा तिचा दागिना होता.

बळवंतराव मात्र मनाने अजूनही तिथेच होते. फक्त एका मागणी ची वाट पाहत होते.
पण ही मागणी कुणा सोम्यागोम्या ची, नातेवाईकांची नको होती , ती सुस्वरूप श्रीमंत घरातल्या कुठल्यातरी सुयोग्य मुलाची हवी होती.
एक दिवस चहाचा कप रिकामा करीत माधवराव दिघे, बळवंतराव यांचे जुने स्नेही बोलत बसले होते.
"बळवंत , एक सुचवू का बघ. . . हा मागणीचा हट्ट सोड आता. एक भारी स्थळ आहे माझ्या ओळखीत. बघून घे."
" पण माधव?"
त्यांनी एका स्थळाबाबत इत्थंभूत माहिती दिली.
मुलाची व घरातल्या माणसांची खूप प्रशंसा केली आणि म्हणाले, " बळवंत ही तुझी जुनी समजूत आता सोड, मुलाकडच्यांनी विचारलं काय किंवा तुम्ही विचारलं काय? तुमची मुलगी सुखात राहणं महत्त्वाचं. त्यामुळे मी काय म्हणतो हे स्थळ पहा आणि मंगल कार्य उरकून टाक!"
"अरे माधव। . ते पण आहेच. आता रमणी बी. कॉम. सेकंड इयरला आहे. आता ठरलं तर तिचं फायनल ईयर होईपर्यंत लग्नाची तारीख काढता येईल." एक आशेचा किरण मनात चमकून गेला.
माधवरावांच्या त्या स्थळाची खूप प्रशंसा केल्यामुळे बळवंतरावांनी पत्नीशी विचार विनिमय करायचा ठरवला .
"पाहूयात , तू टिपण तरी आण मग मी घरात बोलतो. " विषय संपला.

दुसऱ्या दिवशी मुलाचा फोटो आणि टिपण घेऊन माधवराव आले.
मुलगा खरच खूप सुंदर व राजबिंडा होता

चेहऱ्यावरही कर्तबगार वाटत होता.
त्याच्या घराची माहिती वगैरे घेतली आणि माधवरावांच्या ओळखीतला असल्यामुळे जास्त काळजी करण्याचे कारणही नव्हते.
बळवंतराव मुलाचा फोटो व माहिती बघून मनात सुखावले.
पण मनाच्या एका कोपऱ्यात ती सल राहूनच गेली, रमलीला मागणी न आल्याची.
" मी त्यांना लवकरच यायला सांगतो , तुम्ही फक्त तयारीत रहा. हवं तर मीच मध्यस्थी आहे असं समजा!"
माधवराव तिथून उठले आणि बळवंतराव आनंदी मूडमध्ये घरात आले.

" ऐकलत का भागी ! आता मात्र तयारी करावी लागेल बर का?"
स्वयंपाक घरात शिरत बळवंराव बोलले.
" कशाची तयारी बाई ?" पोळ्या करता करता थांबल्या
"कशाची म्हणजे काय आपल्या रमणी च्या लग्नाची, ऐनवेळी वेळ पुरणार नाही फारच धावपळ होईल. पुन्हा ते. . "

" अहो हे काय बोलता तुम्ही अचानकच काय खूळ काढलं, कुणी येऊन गेले होते की काय, म्हणजे तुमच्या लेकीला मागणी घालायला ?"
"मग कुणी यायलाच हवय का दारात? मुलाकडचे आले नाहीत म्हणून काय झालं ? थोडं मी पण मन मारलं कारण माधवनेच एक स्थळ सुचवलं आहे. चांगला आहे मुलगा . . वडिल सी.ए. आहेत, मुलगा त्यांच्या हाताखाली काम करतो आहे ." बळवंतराव हे बोलतानाही विचार करतच होते.

"इतकी शिकतीय ना रमणी , लवकर होईल ना थोडं! "
" श्रीमंत घराणं आहे आजकालच्या काळात श्रीमंत व शिकलेले असे किती कमी लोक असतात ,माधवने सगळं व्यवस्थित सांगितलंय अहो!"
बळवंतरावांच्या बदललेल्या पावित्र्याला पाहून त्यांना कळेचना की काय बोलावे.

" फक्त मुलगी दाखवण्याचाच काय तो फरक आहे किंवा मनातला हट्ट सोडण्याचाच . . तो प्रश्न आहे ना." भागीरथी बाईंनी त्याच्या मनाचा अंदाज घेतला.
त्यांना वाटलं की हे उगीचच म्हणतायत ,असं काही होणार नाही.
म्हणजे त्यांनी हे जास्त गंभीरतेने घेतलं नाही.

" ठीक आहे भागी . . माधव इतकं म्हणतोय तर एक स्थळ बघायला काही हरकत नाही. तिला पाहिल्यावर ते स्वतःहून पसंत करतीलच मग तर लग्नासाठी मागणी घालतीलच. एकच स्थळ ना. . ठीक आहे. तर कळवतो त्याला."
"तुम्हाला योग्य वाटतंय का हे?" पुन्हा अंदाज घेतला.

"अजून एक ,पुढच्या गुरुवारी रमणी ला पाहायला येतील. तर. . "

" आता बाई! हे काय नवीनच ! विचारणं ना पुसणं? लगेच पाहायला येणार आहेत. म्हणजे मुलगा किती शिकला आहे, काय करतो? कुठे असतो ?घरदार कसं आहे? चौकशी नाही की काही नाही. . " पत्नीच्या या वाक्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडलं.
" कशाला हव्या तुम्हाला नसत्या चौकशा? मुलगा चांगला आहे म्हटलं ना, त्याला काय करायची नोकरी ? बापाची एवढी इस्टेट आहे . मी जेवढं सांगतो, तेवढं करा!"
बळवंतराव एकदम संतापले. म्हणजे मनात तो तडजोड करण्याचा भाव काही जात नव्हता. मागणीशिवाय लग्न ठरवतोय तेही पारंपारिक पद्धतिने ते त्यांच्या पचनीच पडत नव्हतं.
" कोणाबद्दल बोलताय बाबा ? काय झालं ?"
रमणी तिच्या खोलीतून बाहेर आली.

" तुझ्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल ,दुसरं आहेच कोण या घरात !" रमणीला पाहून ते थोडेसे खेळकर झाले.

पण बाबा ,माझ्या नवर्‍याबद्दल, लग्नाबद्दल विषय होता आणि मला विचारलं का नाही तुम्ही?" रमणी आश्चर्यात पडली.

" त्यात विचारायचं काय आहे? लग्न ठरवतोय. . चेहरा असा केलाय जणु गळफास देतोय? "
" रमणी, ऐक बेटा तुझ्या भल्यासाठी चाललंय सगळं !" भागीरथी मधेच बोलल्या.
"हे काय माझ्या भल्याचं. . मलाच न सांगता ? "रमणी पुन्हा रागात आली. "लग्नाबद्दल बोलायचं खूप लांब आहे अजून. फक्त माहिती काढतोय आम्ही स्थळाची. तू शांत हो बाळ!" काहीतरी म्हणून त्यांनी पुन्हा "आपण बघू काय करायचं ते ?" भागीरथीबाई मध्ये पडल्या, वाद नको होते.
"बरं बेटा सगळं सोड आता पाहायचं कार्यक्रम आहे गुरुवारी, मस्तपैकी तयार रहायचं . . अगं रमणी तुला पाहायला येतील ते!" बळवंतरावांच्या पोटातून माया जाणवली. . एवढ्या लाडक्या लेकीला रागवायचं कशाला म्हणून!
"काऽय ?"
शांतपणे बोलणार्‍या रमणीचा चेहरा अचानक रागाने आरक्त झाला.

" बाबा मी सांगतेय ऐका, मला लग्न करायचं नाही !"
हेच अनपेक्षित उत्तर ऐकून बळवंतराव थक्कच झाले.
तिला कधीच वरच्या पट्टीत बोलतानाही पाहिलं नव्हतं.
रमणी वर जीवापाड प्रेम असून देखील ते चिडले,
कदाचित त्यांचा इगो दुखावल्यामुळे असेल!
" हे काय नवीन खूळ काढलंय? लग्न करायचं नाही म्हणजे काय? तसंच रहायचय का मग ? भागी पाहिलं ,यासाठीच शिकवायचं नव्हतं मला."
ते पत्नीकडे पाहून म्हणाले.
" तुम्हाला दुखवायचं नाही बाबा, पण माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी लग्नाचा विचारही करणार नाही. तुम्ही आता लग्नाचा विचार केलात तर मी चार वर्षे घेतलेले शिक्षण फुकट जाईल. तुम्ही प्रयत्न करू नका आणि पाहण्याचा कार्यक्रम वगैरे तर इम्पॉसिबल! मला स्वतःचं प्रदर्शन मांडलेलं आवडणार नाही!" तिने स्पष्टपणे सांगत बळवंतरावांशी नजर मिळवली.
" वा वा छानच ! थोडं स्वातंत्र्य दिलं की जीभ एकदम तेज झाली वाटतं. रमणी किती शांत आहे, सालस आहे, आज्ञाकारी आहे असं सांगून मी टेंभा मिरवतो आणि आज तू मलाच उलट बोलतेस? कुणी शिकवलंय का गं हे तुला?"
" कोण कशाला शिकवेल बाबा पण मला माझ्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे की नाही? नेहमी सगळं तुम्ही म्हणाल तसंच कसं ?"


" हे पहा भागीरथी! पाहिलंत शिकवलेले प्रताप? मी तुम्हाला किंवा रमणीला तुमचं मत विचारलं नव्हतं. मी माधवला शब्द दिलाय. . तर ठरलंय म्हणजे ठरलंय. गुरुवारी ते लोक येणारच आहेत त्यांनी रमणीला नापसंत करण्याची शक्यता स्वप्नातही नाही. म्हणजे झालं लगेच साखरपुडा, बोलणी, लग्नाची तयारी करावीच लागेल." बळवंतराव स्वतःच्या स्वप्नातच रमत होते , त्यांना रमणीच्या किंवा भागीरथी च्या विचार किंवा चेहर्‍यांवरच्या भावांकडे लक्ष देणं गरजेचे वाटले नाही.

" बाऽबाऽ !" रमणी रागाने जोरात ओरडली.
" बाबा मी पुन्हा सांगते हे सगळं होणार नाही. तुम्ही काहीतरी तयारी करू नका. मला प्लीज माफ करा. . . बाबा पण हा निर्णय लादू नका. . माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे बाबा . . . लग्न म्हणजे गंमत नाही. तुम्ही सिरियसली विचार का नाही करत. किमान लग्न केव्हा करायचं हा निर्णय तर मला घेऊ द्या?" आता ती रडून कळवळून बोलत होती.


क्रमशः


©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी
दिनांक २३. ०४ .२२


🎭 Series Post

View all