मागणी (भाग-४)

A Father's worry for his daughter's marriage .


मागणी ( भाग -)


लेखिका -
©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी

कथा पुढे-


बाबांनी सांगितलं म्हणून ती आत गेली .
छानसं लिंबू सरबत बनवलं. विलायची टाकली . चाखून पाहिलं.

शेल्फमधले चांगल्यापैकी काचेचे ग्लास घेतले व व्यवस्थित ट्रे मधे मांडले.
हळूवार काळजीपूर्वक शरबत ग्लासमध्ये ओतलं आणि अदबीने ट्रेमध्ये ठेवून बाहेर घेऊन गेली.

तिची आई कौतुकाने लांबून हे पाहत होती. ओट्यावर राडा नाही की कुठे सांडल्याच्या खुणा नाहित.

पोरगी माझी किती समजूतदार आहे असं वाटून गेलं.
रमणीला स्वतःचे रूप किंवा सौंदर्य माहित नाही असं काही नव्हतं पण हा अहंकार लहानपणी नव्हता तेव्हा अबोध वय होतं . . पण वयात आल्यावर आताही तो आला नाही .

अकरावी पार पडलं. मैत्रिणीं सोबत पायीच कॉलेजला जायची. येताना कधी पायी कधी रिक्षात. . तशीच सवय पडली होती.

कॉलेजातलं नवखेपण संपेपर्यंत अकरावी झाली सुद्धा!

तिला लांबून पाहणारे कॉलेजात कमी नव्हते पण तिच्या शांत स्वभावामुळे आणि तिच्या अप्रतिम दिसण्यामुळे तिच्या जवळही येण्यास कोणी धजावत नव्हता.

शिवाय सतत तिच्या मैत्रिणींचा गराडा तिच्याभोवती असायचा .
चौघी मैत्रिणीं तर अशा सोबतच असायच्या जणू त्या तिच्या बॉडीगार्ड आहेत.

तिलाही कुणाशी विशेषतः मुलांशी बोलण्यात काहीच इंट्रेस्ट नव्हता .

अकरावीत असताना खूपदा कॉलेजला खाडे पण झाले, बरेचदा ती घरच्या काही कारणाने जायची नाही.
कॉलेजच्या मोठ्या कार्यक्रमात कधी भागही घ्यायची नाही कारण तिच्या वडिलांना ते विशेष आवडायचं नाही .
तिने स्टेजवर जावून चार लोकांच्या नजरेत येणं त्यांना मान्य नव्हतं .

त्यामानाने राधाचं म्हणजे तिच्या मामे बहिणीचं हिच्या विरूद्ध होतं.
राधाच्या आईला वाटे की राधा दिसायला सर्वसाधारण आहे तर तिला योग्य स्थळ मिळणं कठिण आहे म्हणून जास्त शिकवू नये, आतापासून स्थळं पहावीत आणि लग्न उरकून टाकावं.

याविरुद्ध वेंकटमामाची इच्छा होती की राधाला बी ए एलएलबी करवावं आणि तिने मोठी वकील व्हावं. ते कोर्टात कामाला होते तर स्त्री वकीलांची आवश्यकता त्यांच्या लक्षात येत होती.
राधाने स्टेजवर जावे , कार्यक्रमात भाग घ्यावा, भाषण द्यावं असं वेंकटमामाला नेहमी वाटे. संचलन कराव, वाद- विवादात भाग घ्यावा म्हणजे त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढेल असंही वाटायचं.

या दोन्ही पतीपत्नीतल्या विचारांच्या मतभेदात राधाचा मात्र कोंडमारा होत होता.
आता यावर्षी राधा व रमणी दोघी ही बारावी ला आल्या होत्या.
कॉलेजात जास्त अॅक्टिव नसली तरीही तिच्या शांत , सरळ वागण्याने व दिसण्याने ती मोठ्या घोळक्यातही लक्ष वेधून घ्यायची.
मिस रमणी म्हणजे कॉलेजातलं मूर्तिमंत सौंदर्य अशा नावाने कॉलेजात ती प्रसिद्धही झाली होती.
तिच्या वर्गातले तर तिला पहायचेच पण सिनियर मुलं सुद्धा लांबून तिला न्याहाळत असायचे.
मुलीचं देखणेपण म्हणजे मिस रमणी असं जणू समीकरणच बनून गेलं.
ती इतकी सोशल किंवा नवीन माणसांशी मिसळून राहायची नाही, विशेषतः मुलांपासून अंतर ठेवून असायची .
मुळात रमणीचं ध्येय हे सुद्धा लग्न होईपर्यंत वडील जितकं शिकवतात तितकं शिकून घ्यायचं . . एवढंच होतं. कारण कोण जाणे कुठल्या वेळेला योग्य स्थळाची मागणी यायची आणि तिचे वडील शिक्षण थांबवून लग्नाचं बघायचे.
यामुळेच तिने अभ्यासाचा किंवा स्वतःच्या करिअरचा विशेष विचार केला नाही आणि वाणिज्य शाखा घेतली.
अकरावी तर सहज निघून गेली. कॉलनीतल्या एक दोन मैत्रिणीं व कॉलेजच्या रस्त्यातल्या गल्लीतच राहणार्‍या दोघी जणी असा पाच मुलींचा छान ग्रुप बनला होता. या सगळ्या मुली बर्‍याच होत्या पण दिसायला सर्वसाधारण होत्या. कदाचित त्यामुळे रमणी त्या घोळक्यात जास्तच उठून दिसायची.
त्यातल्या दोघी जणी मोनिका आणि अपर्णा उच्चशिक्षित घरातल्या होत्या, बर्‍यापैकी स्वतंत्र विचाराच्या. चित्रा अभ्यासात खूप हुशार पण सरळ स्वभावाची तर सारिका थोडी फटकळ पण मायाळू आणि खूप क्रियेटिव होती.
चित्रा रमणी कडे यायची मग दोघी चालत चालत पुढे यायच्या तर या तिघी एकानंतर एक सोबत यायच्या आणि असं गप्पा मारत कॉलेजपर्यंत पोहोचायच्या.
क्लासेसच्या वेळी सारिकाची पुन्हा- पुन्हा भेट व्हायची नाही पण पाचही जणी डबा एकत्रच खायच्या. शेवटचं लेक्चर संपल्यावर रमत गमत पायी घरी यायचं . .किंवा कधी कधी ऑटोरिक्षा ने यायच्या. असं काहीसं रूटीन होतं.
छान गप्पा व्हायच्या ,कधीकधी चर्चा व्हायच्या कधी अभ्यासावर , कधी सिनेमावर तर कधी सामाजिक परिस्थितीवर देखील गप्पा व्हायच्या.
राधा सुद्धा या सर्वांना ओळखायची. ती आली की कधी सगळ्या मुली मिळून बागेत जायच्या किंवा मग भेळ वगैरे खायलाही जायच्या.
असंच एकदा रमणी बारावीत असेल तेव्हाचा एक प्रसंग !

एक दिवस रमणी रोजच्याप्रमाणे कॉलेजला निघाली तर बळवंतराव म्हणाले , "बेटा. .आज क्लास नसतील जास्त. . तर लवकरच घरी ये. . नाहीतर एक कर . . आज जावूच नकोस ना !"
"काय झालं बाबा?"
" काही नाही गं . पण तुझ्या वेंकटमामाचा निरोप होता. मामी व राधा ते सगळेच येतायत आज . तू असतीस तर आईला मदत झाली असती. "
" हो का! पण बाबा . . महत्वाचे क्लास आहेत. जावं तर लागेल. मी लवकर येईन निघून. . पण मग मी आज मैत्रिणीं साठी थांबु शकत नाही."
" बरं एक काम कर हे थोडे पैसे ठेव आणि येताना रिक्षानेच ये. पायी नको एकटीच."
इतक्यात चित्रा रमणीकडे अंगणात आली.
"आले गं चित्रा. थांब, डबाच विसरले , घेवून येते."

"रमणी. . डबा कशाला गं? दुपारी घरीच येणार आहेस ना. . मग घरीच जेव!"
बाबा म्हणाले तसं रमणीलाही आठवलं.

"हो हो चालेल. येते गं आईऽ
बरं बाबा येते. " असं म्हणत रमणी बॅग घेवून आली व चित्रासोबत चालायला लागली.

"का गं , काय झालं. बरं वाटत नाहीय का तुला ? घरी का यायचं?" चित्राने सहज विचारलं.
"अगं मामा- मामी अन राधी येणार आहेत तर बाबा म्हणाले की घरीच रहा पण ते \"एस पी\" चं लेक्चर आजच असतं ना. . बुडवलं तर काहीच कळणार नाही मला."
"ते पण खरच म्हणा ! "

जेव्हा मैत्रिणीं चालत निघाल्या तसं रमणी म्हणाली ,"ऐका ना, येताना मी सोबत नसणार आहे. दुपारी जेवणाआधी च घरी येईन बहुतेक. माझी वाट पाहू नका !"
" का गं कुठे चाललीस कॉलेजला दांडी मारू. ? " मोनिका ने हळूच विचारलं व डोळे मिचकावले.
" काहीही काय गं मोना, मी बापडी कुठे जाणार? . .घरी लवकर येणार आहे इतकंच. अगदी निघताना बाबा म्हणाले तसं!"
" अरे वा घरी लवकर बोलावतायत. . ! काहीतरी गडबड दिसतेय. बघायला वगैरे येणार आहेत काय कुणी?" सारिका ने वेगळाच सूर छेडला.
" काहीही काय गं तुम्ही. . सुतावरून स्वर्ग गाठताय. हे पहा चित्राला विचारा . ती होती की नाही त्यावेळी!" रमणी या विचारानेच कावरी बावरी झाली.
पटकन चित्राने सावरून घेतलं. . " अगं हो राधा व तिचे आई बाबा येणार आहेत तर काका हिला थांबच म्हणत होते. ही त्या एस.पी च्या लेक्चर साठी आलीय!"
"बरं बरं कळंलं. मोठी वकील तिच। . पण सगळेजण येतायत म्हणजे काहीतरी कांदेपोहे तर आहेतच. . !" अपर्णा हळूच म्हणाली.
"तिला कशाला बाई कांदे पोहे. . माझे बाबा तर नेहमीच सांगतात की रमणीला मागणी येणार तेव्हांच ते तिचं लग्न करणार. असं दाखवून नाही काही!" आता चित्राही त्यात सामिल झाली.

"काय यार कुठल्या काळात आहात तुम्ही.
अजूनही सो टिपिकल. माझं तर ठरलंय मी लव्ह मॅरेजच करणार. माझ्या घरून तर हरकतच नाही कारण म म्मा पापाचं इंटर कास्ट मॅरेज आहे. मला पूर्ण स्वातंत्र्य आहे!" मोनिका फुशारकीने म्हणाली.
आता मात्र रमणीच्या छातीत एकदम ध ड ध ड वाढली. .लवमॅरेज शब्द ऐकून. जसं काही काहीतरी पाप केलंय. त्याकाळी प्रेम , आवडणं , लव किंवा लवमॅरेज हे इतके कॉमनली उच्चारलेही जायचे नाही. त्यात रमणीच्या घरातल्या त्या वातावरणात तर हे कधीच नाही.
"काही पण बोलतेस काय मोनिका. .? आपण कॉलेज जवळ आहोत." रमणीने दाबण्याचा प्रयत्न केला.
" असू दे गं बाई. . मी नाही भीत कुणाला!"
"मला विचारल्याशिवाय घरी माझं लग्न ठरवणार नाहीत एवढं स्वातंत्र्य तर मला पण आहे." अपर्णा म्हणाली.
" हे पहा मी तर आई बाबांवर सोडलंय बाई. माझ्यावर ती जिम्मेदारीच नको. भलं बुरं कळतं त्यांना. उद्याला माणूस कसाही निघाला तरीही तेच बघून घेतील ना. . माझी चूक राहणार नाही.!" सारिका सांगत होती.
या सगळ्या चर्चेत रमणीच्या लक्षात एक गोष्ट आली की सगळ्यांना स्वतःची मतं आहेत . . किंवा त्यांची स्वप्न व प्लान आहेत. पण तिचं खरंतर काहिच नाहिय. तिने आयुष्याचा विचारच केला नाहीय गंभीरतेने.
त्या कॉलेजात पोहोचल्या होत्या.
लेडिज रूम मधे जावून , फ्रेश होऊन , इतर मैत्रिणींशी बोलून सगळ्याजणी आपापल्या विषयाच्या क्लासला गेल्या.

तीन महत्त्वाचे लेक्चर झाले आणि रमणीने ठरवलं की ती आता घरी जाईल.
दोघी तिघी मैत्रिणींना विचारलं अजून कुणी येवू इच्छिता का ? कुणीही तिच्यासोबत यायला तयार नव्हतं.
मग तिला आठवलं की बाबांनी सांगितलं होतं की येताना पायी नाही तर ऑटोरिक्षा ने ये म्हणून !
त्यामुळे ती लगबगीनं कॉलेज मधून निघाली.
गेटमधून बाहेर पडणार इतक्यात तिच्या लक्षात आलं की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे.


क्रमशः


©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी
दिनांक ०६.०४ .२२





🎭 Series Post

View all