मागणी (भाग-६)

A father's desire for daughter's marriage proposal .

मागणी ( भाग -)


पूर्वसुत्र -

ती घरातल्या परकर ओढणीवरतीच होती.
लांबसडक वेणीचा( अडचण नको म्हणून ) अंबाडा बांधलेला.
आई ने समजावलं की "असू दे . तुझं काही काम नाही त्यामुळे तयार व्हायची गरज नाही. तू राधेसोबत खोलीतच बस , आम्ही बोलावलं की तिला बाहेर पाठव."
रमणीला हे पटलं नाही पण पर्यायच नव्हता.



कथा पुढे -
मागणी (भाग -)


रमणीला ही वाटत होतं की तिनेही पहावं की हा मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम नेमका कसा असतो, का मुली असं भीतात?
पण शक्य नव्हतं कारण आईने तयार व्हायला सुद्धा सांगितलं नाही. खोलीतच रहा असा इशाराही केला.
बळवंतरावांची विशेष इच्छा नव्हती हा कार्यक्रम इथे करण्याची पण वेंकटरावांशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे त्यांना नकार देता आला नाही. शिवाय स्थळ इथलंच होतं त्यामुळे ते सोयीचं पडलं असतं.
राधाही खूप छान तयार झाली व सुंदर दिसत होती. रमणी तिला काही बाही चिडवत होती.
ठरलेल्या वेळी पाहुणे आले.
गरमागरम कांदे पोहे बनवले गेले.
चहाचं आधण तयारच होतं.
राधा खूप बेचैन होती
तिला असं वाटत होतं की तिला सुद्धा मुलाशी बोलण्याचा अधिकार आहे पण सर्वांसमोर तिचं बोलणं योग्य ठरेल की नाही ?
जर घरच्या लोकांनी थोडासा आधुनिक पणा दाखवून दोघांना बोलण्याची संधी दिली तर खूप चांगलं होईल.
असं ५-६ प्रश्न विचारून अन एवढ्या गर्दीत १० मिनिट मुलाला पाहून आयुष्यभराचा निर्णय कसा काय घेणार?
रमणी च्या मनातली उत्सुकता मात्र तशीच कायमहोती.


पाहुणे आले, असं कळालं अन सगळे जण त्यांच्या स्वागतासाठी बाहेर गेले.
त्यांना हॉलमध्ये बसवण्यात आलं.
मध्यस्थीं कडून सर्वांची ओळख झाली.
मुलगा , त्याची बहिण , आई वडिल व जावई असे पाच जण पहायला आले होते. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आणि मग पोहे घेऊन मुलीला बोलवण्याचा निरोप आला. पोह्यावर खोबरं टाकता टाकता पद्मा मामींच्या सूचना देणं चालूच होतं.
आता मात्र राधाच्या हृदयाची धडधड खूप वाढली होती. पुन्हा तेच, हॉल मध्ये पाच -सहा जण बसले होते. त्यातला नवरा मुलगा नेमका कोणता, बावऱ्या नजरेने त्याला शोधणं, मग त्याला एका नजरेत बघणार आणि केवळ त्या बघण्या पोटी त्याच्यासोबत आयुष्य घालवायचा निर्णय घ्यायचा हे कुठपर्यंत लॉजिकल आहे ,हे तिला कळत नव्हतं . पण पर्याय नव्हता.
सासुबाई म्हणाल्या "असू द्या इतकं टेशन नका देवू मुलीला , मुलीला सहजच बोलवा, अगदी ट्रे वगैरे घेवून नको. घाबरतात अहो मुली. "
मामींचा जीव भांड्यात पडला. त्याच पोह्यांचा ट्रे घेवून आल्या व सर्वंना दिले.
राधा हॉलमध्ये येवून बसली. पसंत करण्यासारखी होतीच ती , आज तर छानच दिसत होती.


रमणीला मात्र खोलीमध्ये खूप बोर होत होतं.
बाहेरच्या खोलीतल्या बोलण्याचा, मध्येमध्ये हसण्याचा आवाज येत होता.
मग मुलीला काही प्रश्न विचारा वगैरे सुरू झालं.
खूप टिपिकल प्रश्न विचारले गेले, स्वयंपाक येतो का ?
घर कामाची आवड आहे काय ?
छंद, गाणं, विणकाम वगैरे?
राधा जुजबी उत्तरं देत होती , खालमानेनेच. . व मामी मधे मधे बोलत होत्या.
मुलाने एखादे दोनच औपचारिक प्रश्न विचारले होते व राधाने स्पष्टपणे न पाहता आवाजाच्या दिशेने उत्तर दिले होते.
मुलाच्या बहिणीने विचारले , "शिक्षणाची आवड आहे का?"
या प्रश्नाच्या वेळी मात्र राधाच्या लक्षात आलं की आता बोललो नाही तर पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो.
त्यामुळे ती म्हणाली की "मला बी.। एलएलब. करायचं आहे आणि वकील व्हायचे आहे, म्हणजे अशी माझ्या वडिलांचीही इच्छा आहे."
मग सासुबाई म्हणाल्या "शिकवण्याची इच्छा आहे वहिनी तर मग लग्नाची घाई का करत आहात? "
या प्रश्नावर ती पद्मा मामींकडे काहीच उत्तर नव्हतं.
मुलाचे वडील म्हणाले, "ठीक आहे तिला आवड असेल तर आपणही शिकवू शकतो. पूर्वीसारखा नाही राहिलं आता. मुली लग्नानंतरही शिकतात. तिची तयारी असेल तर आपण शिकवू ."
ह्या एका सजेशन मुळे राधाला या स्थळाबद्दल आपुलकी निर्माण झाली.

इतक्यात खाणे पिणे झाले म्हणून भागीरथी बाई चहाचा ट्रे घेऊन आल्या आणि राधाला प्रत्येकाला चहा द्यायला सांगितला.
चहाचा कप देताना प्रत्येकाची ओळख करून दिली जात होती.
जेव्हा मुलाचा नंबर आला तेव्हा राधाने (त्याला स्पष्ट पाहिलं नव्हतं त्यामुळे) त्याच्या हातात कप देताना त्याच्या हाताकडे न पाहता त्याच्या चेहऱ्याकडे नजर वळवली , मुलाने सुद्धा नेमक्या त्याच वेळेला तिच्याकडे पाहिलं.
दोघांची आपोआप नजरानजर झाली आणि हातातला कप निसटला.
मुलाच्या अंगावर चहा सांडला.
थोडासं पोळलं आणि बैठकीत एकच गोंधळ.
राधा घाबरून गोंधळली.
"सॉरी सॉरी. . चुकुन झालं. तुम्हाला बाथरूम दाखवते " असं म्हणून ते दोघे जण आत मधल्या साईडला वळले.

या गोंधळाच्या आवाजामुळे नेमकं काय झालं हे रमणीला कळलं नाही म्हणून रमणी राधाच्या मदतीसाठी धावली.
मग मध्ये पटकन पाणी घेऊन आली.
त्या मुलाने पटकन चहा सांडला तिथे पाणी लावलं. हात धुतले आणि रुमालाने हात पुसताना त्याचं लक्ष तिकडे गेलं.
राधा बाजूलाच उभी होती आणि तो निरखून रमणीच्या त्या साध्या रूपाला पाहत होता.
तो पाहतोय हे कळल्यावर रमणी लगबगीने खोलीत पळून गेली.
तो परत आला आणि मग औपचारिक गप्पा झाल्या .
मुलाला पुन्हा एकदा चहा दिला गेला.
निघताना त्यांनी लगेच होकार द्यावा अशी अपेक्षा असली तरीही मुलाकडचे लोक कधीच जागेवर होकार देत नाहीत.
घरी गेल्यावर ती चर्चा करणं खूप जरुरी असतं.
मी कळवतो असं म्हणून मध्यस्थी व मंडळी गेली.

ते गेल्यानंतर पद्मा मामी राधा वर चिडल्या.
"राधे ही काय पद्धत झाली , त्यांनी चहाचा कप हातात धरल्याशिवाय तू कसा सोडलास? तुझा वेंधळेपणा पाहून त्यांनी नकार दिला तर आपण काय करायचं? चांगले लोक आहेत. योग जुळून आला तर बरंच ना !"
" हे पहा तिच्यावर चिडू नकात. लहान पोरी आहेत. गांगरतात अशा प्रसंगी. . दमाने घ्या. तिला टेंशन आलं असेल. त्या मुलानेही नको का कप पकडायला?" वेंकटमामा बोलले.
भागीरथी व बळवंतरावांनी समजावले .

रमणी हळूच खोलीतून बाहेर आली. "काय झालं राधे?"
आईच्या रागावण्याने दुखी झालेल्या राधाने रमणीला मिठी मारली व रडायला लागली.
"ताई, तुमच्यासारखं नाही ना आमचं नशीब. त्यांचा होकार येणं महत्वाचं आहे ना आमच्यासाठी. " पद्माचा मानसिक ताण वाढला अजून व भागीरथी बाईंच्या जवळ जावून वैताग करू लागली.
*********

मुलाच्या आई वडिलांना वाटले की जरा घरी गेल्यावर स्वतःच्या मुलाशी बोलून किंवा थोडंसं आधुनिक होत आणखी एका भेटीनंतर वगैरे लग्न ठरवण्याच्या गोष्टी कराव्यात . घाई नको.
पण घरी आल्यानंतर त्या मुलाचा नाराज चेहरा पाहून वडील म्हणाले ,
"उपेंद्र , तुला मुलगी आवडली नसेल तर असू दे . बरीच स्थळ आहेत व येतील. हे पहिलंच होतं . थोडासा वेळ दे. घाई नाही."
तरीही तो काहीच बोलला नाही.
" काय झालं बेटा? तुला मुलगी आवडली नाही का ?" आईने विचारलं .
"ताण घेवू नकोस , नाही तर नको म्हणून सांग .आपण तसं कळवून टाकू !" बहिण म्हणाली.
"आमचं काय? संसार तुम्हाला करायचा आहे." वडिलांनी दुजोरा दिला.

" बाबा एक सांगा , मुलीच्या वडिलांचे नाव व्यंकटराव कुलकर्णी आहे ना आणि आपण तिच्या म्हणजे मुलीच्या आत्याच्या घरी तिला पाहायला गेलो होतो ना ! मुलीला आणखी एखादी बहीण आहे का?"
" नाही रे त्यांच्या माहिती पत्रात तर एक मुलगा आणि मुलगी इतकच आहे, मग?"
" आई ,त्या मुलीची कुणीतरी बहीण आहे ती आत मध्ये होती मी पाहिलं तिला , मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. हवं तर तसा त्यांना निरोप धाडा . ते जर त्या स्थळासाठी असतील तर मी लग्नाला तयार आहे . नाहीतर विचार करावा लागेल."
"अरे कोण मुलगी? आम्हाला तर नाही दिसली!"
"चहा सांडला म्हणून मी आत गेलो होतो ना ,त्यावेळी पाण्याचा मग घेऊन आली होती. खूप सुंदर आहे ती."
मुलाच्या आईने कपाळाला हात मारला.

*************
संध्याकाळी मध्यस्तांनी निरोप आणला.

" बळवंतराव मुलाने बहुतेक रमणीला पाहिलंय , त्यांना तुमच्या घरात असलेली दुसरी मुलगी पसंत आहे ,राधा नाही.
तयारी असेल तर ठीक, नाहीतर त्यांना वेळ हवाय "
मध्यस्तांनी स्पष्टच सांगितलं .

हे बोलणं ऐकताच पद्मा मामींचा जीव खुप घाबराघुबरा झाला.
त्यांना हे स्थळ पटलेलं होतं , सासरा आणि सासू पुढे शिकवण्याच्या गोष्टी ही करत होते.
" असं काय झालं बघा? मी तुम्हाला म्हणाले होते रमणी समोर असेल तर राधी ला कोण पसंत करणार?" ती वैतागली.
" पद्मा अगं आपण तर हिला खोलीत बसवलं होतं. ती बापडी तयारही झालेली नव्हती. . मुलाने कसं काय पाहिलं?"
"आत्या ते चहा सांडला म्हणून मी घाबरले तर ती मगात पाणी घेऊन आली होती. . !" राधा हळूच बोलली व रमणीचा हात दाबला.

"अरे देवा ,तिला येण्याची काय गरज होती?" भागीरथी बाईंना उगीचच अपराधी वाटू लागलं होतं.
" असू द्या ताई ,आमच्याच नाण्यात खोट आहे. . !" पद्मा ने हे बोलताच वेंकटरावांना खूप राग आला.
" काही नाणं खोटं नाही. नीटस चांगली पोरगी आहे आपली. हाती पायी धड आहे. अभ्यासात हुशार आहे. "
"अहो पण नकार आला ना . . या गोष्टीचा तुम्हाला राग आला नाही का ? ते चहा सांडला हिने. . !"
पुन्हा ते स्वतःच्या पत्नीलाच रागावले.
" पद्मा पुरे कर, आपल्या मुलीत काहीही खोटं नाही. तिला दोष देऊ नको. इतकं काय झालं ? मी तिला पुढे शिकवीन, वकील करीन . . मला लग्नाची घाई नाही.
आणि सारखी रमणी व राधाची तुलना करू नकोस . . दोघी आपल्याच पोरी आहेत. याचा राधा वर काय परिणाम होतो, याचा कधी विचार केलास का तू?"
" दोघी बरोबरीच्या आहेत . आते मामे- बहिणी आहेत. गोडी आहे गं . .राहू दे. दुसरं स्थळ येईल त्यात काय एवढं." भागीरथी पण म्हणाली .

"असं काही नाही, त्यांना काहीतरी कारणच हवं असेल नकार द्यायला!" मध्यस्थी बोलले.


क्रमशः


©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी

दिनांक १४.०४ .२२


🎭 Series Post

View all