मधुरीमा (भाग १)
"उशीरच झाला. सगळे खोळंबळे असतील.कितीही लवकर यायचा प्रयत्न केला तरी झालाच उशीर. रस्त्यांवर किती ते खड्डे, अन त्यात ट्राफिक जाम. पण शाळेत जाणंही गरचेच होत ना. पॅरेंट्स मीटिंगला मी नाही जाणार तर कोण जाणार. काही होत नाही एकदिवस उशीर झाला तर." मधुरा पार्किंग मध्ये गाडी पार्क करत हॉस्पिटच्या पायऱ्या चढत मनातच बोलत आली. सभोवताली एक नजर टाकली, वेटिंग रूम पेशंटनी भरली होती पूर्ण. ती दिसताच सगळा स्टाफ उभा राहिला, " गुड मॉर्निंग मॅडम."
" व्हेरी गुड मॉर्निंग.अरे, बसा बसा. चालू द्या तुमची कामं. सारिका,चल एक एक पेशंट आत सोड, आणि काल मी तुला एक फाईल काढून ठेवायला लावली होती ती पण दे."
जाता जाता तिची नजर केबिनच्या दरवाज्यावर लावलेल्या पाटीवर गेली " डॉ मधुरा कानिटकर, स्त्री रोग आणि वंध्यत्व निवारण तज्ञ" बाजूलाच एक आई आणि बाळाचा प्रतिकात्मक स्केच. तिच्या एका पेशंटनी तिला गिफ्ट दिली होती ती पाटी. तिनी नको नको म्हणताना दारावर प्रेमानी लावून गेली होती ती. पाटी पाहिली अन तिचा आत्मविश्वास अजून बळावला. तेवढ्यात तिचं लक्ष बाजूच्या केबिनकडे गेलं. केबिनचा दरवाजा लॉक होता आणि लाईट पण बंद होते.
मधुरा केबिनमध्ये गेली. हँडवॉश करत तिने विचारले,
" सारिका, डॉ रीमा कुठे आहेत?"
" मॅम, ऑपरेशन थिएटरमध्ये आहेत. थोड्यावेळापूर्वीच एक इमर्जन्सी केस आली होती, ताबडतोब OT मध्ये शिफ्ट केलं पेशंटला."
"OK. माझ्यासाठी काही निरोप दिलाय का?"
"नाही मॅम."
"बर. ती नवीन आलेली असिस्टंट डॉक्टर काय नाव तिचं.. हा.. डॉ सेजल..तिला म्हणावं डॉ रिमाच्या पेशंट्सची केस हिस्टरी घेऊन ठेव. अन चल पाठव एक एक पेशंट लवकर लवकर."
"पण मॅडम, राउंड राहिला न." कांचन सिस्टर
" आज मॅमला कामानिमित्त बाहेर जायचं होतं म्हणून मॅमनी सकाळी 7 वाजताच राऊंड घेतला. काय ओव्हर घेतला तुम्ही कांचन सिस्टर. नाईटच्या सिस्टरांनी सांगितलं नाही का तुम्हाला. 'मधुरीमा' मध्ये पहिलं प्राधान्य पेशंट्सना असतं. मग बाकीच्या गोष्टींना." सारिका.
'मधुरीमा'च्या प्रवासात सारिकासुद्धा पहिल्यापासून सोबत होती.
सारिकाच बोलणं ऐकून मधुराला थोडस हसायला आलं. "झाला असेल सिनियरपणा झाडून तर पाठवता का पेशंट?"
"हो मॅम" म्हणत सारिका बाहेर गेली.
"हे बघा कांचन सिस्टर, तुम्ही नव्या आहात. काही समजलं नाही तर लगेच विचारत जा. घाबरायचं नाही." मधुरा.
डॉ मधुराच्या डोळ्यातला विश्वास आणि चेहऱ्यावरचा प्रेमळ भाव पाहून रुग्णांचा अर्धा आजार तिथेच बरा व्हायचा. तशीच डॉ रीमा सुद्धा, स्त्री रोग तज्ञ, जर्मनीला जाऊन तिथल्या नवीन पद्धती, नवीन इन्स्ट्रुमेंट्स शिकून आलेली, आत्मविश्वासाने भरुन, हुशारीचं तेज चेहऱ्यावर स्पष्टच दिसायचं तिच्या. पेशंट नुसत्या औषधांनी नाही बरा होत त्याला योग्य कॅऊन्सिलिंगची पण गरज असते, कोणीतरी ऐकून घेणारं पण हवं असतं.. दोघी जणी अगदी मनापासून करायच्या ती गोष्ट. दोघी जरी स्त्रीरोग तज्ञ असल्या तरी वेगवेगळा आजार असलेल्या स्त्रिया यायच्या त्यांच्याकडे. त्यांच्या सगळ्या अडचणी ऐकून, समजावून सांगून त्यांना स्पेशालिस्टकडे रेफेर करायच्या. लोकांचे भरभरून मिळणारे आशीर्वाद ही ''मधुरीमा Maternity and Nusring Home" ची एक जमेची बाजू होती.
वरवर पाहता लोकांना हा दोन डॉक्टर बायकांनी मिळून टाकलेला दवाखाना वाटायचा. पण त्यामागे एक खूप मोठी गोष्ट होती. आयुष्य हे वाटतं तेवढ सोप्प नसत, अन प्रत्येकासाठी ते वेगवेगळं असत. प्रत्येकाच्याच आयुष्यात एक संघर्ष असतो आणि प्रत्येकच संघर्षाची एक कथा असते.
"मधुरीमा " ही कथा आहे डॉ मधुरा आणि डॉ रीमाची, ही कथा आहे एका मैत्रीची, एका विश्वासाची, एका संघर्षाची.
क्रमशः
(कोण होत्या डॉ मधुरा डॉ रीमा आणि काय होता संघर्ष, जाणून घेऊया पुढच्या भागात)
फोटो- गुगलवरून साभार
(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.)
(कथमालिका लिहायची पहिलीच वेळ आहे. काही चुकलं असेल तर नक्की सांगा.कथा कशी वाटली ते पण सांगा. Share करायची असल्यास लेखिकेच्या नावासहित share करू शकता. कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )
© डॉ किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा