मधुरीमा पर्व २ (भाग ४१)
“ताई, अगं जीजूंना शोधायला आपण हा मार्ग निवडला! म्हणजे तुला वाटतंय की जीजू दोषी आहेत?” सुरजभाईसोबत बोलून रोहित आणि मधुरा परत निघाले होते. मधुराने अरविंदच्या मागावर सुरजभाईला लावल्यामुळे रोहितला आश्चर्य वाटले होते.
“माहीत नाही रोहित; पण बघ ना… अरविंद गायब आहे. तुच विचार कर, रीमाची बातमी मला अमेरिकेत कळाली आणि मी लगोलग निघून आले. खरंच त्याला काहीच समजले नसेल काय? अरे जीवनसाथी आहे ना तो; मग त्याचं काम नाही का रीमाला साथ देण्याचं. आणि अजून एक गोष्ट मला खटकतेय… मी ज्या दिवशी रीमाला सगळी कागदपत्रे सुपूर्त केली होती नेमका त्याच दिवशी अरविंदने कसा काय राजीनामा दिला. मी अमेरिकेत जाईपर्यंत ह्या गोष्टीचा काहीच उहापोह कसा झाला नाही? मला राहून राहून असं वाटतंय की अरविंदने नंतर राजीनामा दिला आणि तो बॅक डेटमध्ये समोर आणला.” मधुरा कार चालवताना बोलत होती. आणि तिने अचानक गाडी थांबवली.
“ताई, काय झालं?” रोहित
“समोर बघ.” मधुरा म्हणाली तसं रोहितनं समोर पाहिलं. समोर ‘मधुरीमा’ ची बिल्डिंग होती. एखाद्या भग्न अवशेषाप्रमाणे वाटत होती. मधुराच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.
“आत जाता येणार नाही का रे?” मधुरा रोहितला म्हणाली.
“नाही ना. पोलिसांनी सील केली आहे ना इमारत.” रोहित
“पण मला विश्वास आहे, एक दिवस मधुरीमा पुन्हा त्याच दिमाखात उभी राहील.” मधुरा डोळ्यातलं पाणी टिपत म्हणाली. तिने रोहितला हॉस्पिटलच्या जवळ सोडलं आणि सरळ घरी निघून गेली. घरी गेल्या गेल्या तिने नितीनला फोन लावला.
“मधु, एवढ्या रात्री कॉल केलास! ठीक आहे ना सगळं.” नितीन म्हणाला.
“नाही रे… रीमाला भेटायला गेले आणि…” मधुराने घडलेली सगळी हकीकत नितीनला सांगितली.
“ओह माय गॉड! आता रीमा कशी आहे?” नितीन
“स्टेबल आहे.” मधुरा
“प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं का रीमाला?” मधुरा
“बघ ना, तुला जसं वाटेल तसं कर.” नितीन
“निती कुठाय रे? तिला आठवण येते का माझी?” मधुरा
“न यायला काय आहे? आताच रडतच शाळेत गेलीये. ती शाळेतून आली की फोन करायला लावतो तुला.” नितीन म्हणाला. मधुरा आणि नितीन बऱ्याचवेळ फोनवर बोलत होते. मधुराने तिच्या डोक्यातल्या प्लॅन व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी नितीनला शेअर केल्या आणि ती झोपून गेली.
सकाळी उठून, तयारी करून ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. डॉक्टरांचा राऊंड नुकताच आटोपला होता. रीमा स्टेबल होती. त्याचदिवशी रीमाच्या केसची तारीख होती. अनिरुद्धने कोर्टात रीमा आजारपणाचे कागदपत्र सादर केले आणि पुढची तारीख घेतली.
सुरजभाईला कोलकात्याला जाऊन चारपाच दिवस झाले होते. मधुराने सांगितल्याप्रमाणे तो परत आल्यावर तिला भेटणार होता. पण ह्या दिवसांत त्याचा काहीच पत्ता नव्हता.
एकदिवस मधुरा वेटींग लॉबीमध्ये बसलेली होती. तितक्यात तिला मधुकररावांचा फोन आला.
“बाबा, बोला.” मधुरा म्हणाली.
“सुमनताईंना देवाज्ञा झाली.” मधुकररावांच्या तोंडून हे वाक्य ऐकताच मधुरा मटकन खालीच बसली.
‘भेटायला जायचं होतं मला… मम्मी, माझी वाटही नाही पहिली तुम्ही.’ मधुराच्या डोळ्यांत पाणी तरळलं. तिने रोहितला फोन लावला. त्याला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं आणि मधुकररावांना सोबत घेऊन गावाकडचा रस्ता पकडला.
कितीतरी वर्षांनी ती गावाकडं चालली होती. लग्नानंतर दिल्लीला गेल्यावर तिचं गावाला येणं झालंच नव्हतं. त्यानंतर आयुष्यात एवढ्या उलथापालथी झाल्या होत्या की तिचं सगळं आयुष्य बदलून गेलं होतं.
आष्टेकर वाड्यासमोर तिने गाडी थांबवली. तिला आठवलं, तिच्या लग्नात ह्या वाड्याचीही रौनक काही औरच होती. वैभवाची साक्ष देणारा आष्टेकरांचा वाडा आज अगदीच भकास वाटत होता, अगदी जीव गेल्यासारखा.
भूतकाळातल्या सगळ्या घटना आठवत मधुरा आत गेली. सुखी संसाराची स्वप्नं उराशी घेऊन अगदी तिच्या जीवावर बेतेपर्यंतचा सगळा प्रवास अगदी क्षणात डोळ्यांसमोरून गेला. समोर सुमनताईंचं निपचित पडलेलं कलेवर बघून मधुरा भानावर आली.
“सुमन सुटली ह्या सर्वातून… माझी अजून किती परीक्षा बाकी आहे त्या विधात्यालाच ठाऊक.” पुरुषोत्तमराव आवंढा गिळत म्हणाले.
“पप्पा…” मधुरा पुढं काही बोलू शकली नाही.
“तिला मुखाग्नी तू द्यावास अशी तिची इच्छा होती आणि बघ ना, तू भारतात परत येईपर्यंत तिने दम काढला. तिची इच्छा पूर्ण करशील ना.” पुरुषोत्तमरावांनी मधुरासमोर हात जोडले. मधुराने त्यांचे हात घट्ट पकडले आणि त्यांच्या गळ्यात पडून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
क्रमशः
© डॉ. किमया संतोष मुळावकर