मधुरीमा (पर्व-२) भाग-३

कथा मधुराची, कथा रीमाची, कथा सच्च्या मैत्रीची




मधुरीमा (पर्व-२) भाग ३


मधुराचं विमान भारताच्या दिशेने झेपावलं होतं; पण तिचं मन मात्र भूतकाळात हरवलं होतं.

*************************************
साधारणतः तीन वर्षांपूर्वी-

(नीतिच्या वाढदिवसाच्या दिवशी नितीनने मधुराला आणि अरविंदने रीमाला लग्नाची मागणी घातली होती, दोघी अगदी आनंदाने यासाठी तयार झाल्या होत्या, त्यानंतर पुढे…)


"मी काय म्हणते राधिकाताई, खरंतर आता लग्नाची तारीख ठरवून घ्यायला पाहीजे म्हणजे कसं, आपल्याला त्या दृष्टीने तयारी करता येईल हो की नाही?" एक दिवस दुपारी सुनिताताई मधुराच्या घरी आल्या होत्या. चहा घेत राधिकाताईंच्या आणि त्यांच्या गप्पा सुरु होत्या. 


"हो ना… पण खरं सांगू, मधुराला लग्नाबद्दल काही विचारायची माझी हिम्मतच होत नाहीये. आधीचा अनुभव एवढा भयंकर होता… असं वाटतंय आपलं लेकरू आपल्याजवळच असलेलं बरं." राधिकाताई उसासा टाकत बोलल्या.


"जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. किती काळ लोटला… आपण सगळं विसरून पुढे आलोच आहोत ना… मग उगीच कशाला जाणीवपूर्वक परत तेच आठवायचं… आणि सगळ्यात महत्त्वाचं… नितीनमुळेच आपल्या मधुराला पुन्हा आयुष्य मिळालंय… त्याच्यासारखा मुलगा शोधून सापडायचा नाही बरं…" मधुकररावही दोघींच्या गप्पात सामील झाले.


"हो… भाऊजी बरोबर बोलत आहेत… राधिकाताई… तुम्ही कसलीच चिंता करू नका." सुनीताताई


"मग एखाद्या रविवारी नितीन आणि त्यांच्या घरच्यांना बोलवून घेऊ… भेटी होतील आणि पुढचं काही ठरवताही येईल… तेव्हाच अरविंदरावांना देखील बोलावून घेऊ… मी नितीनला फोन करतो… अरविंदरावांनाही करू का?" मधुकरराव


"राहू द्या… आपण रीमालाच अरविंदला फोन करायला लावू… त्याच्या घरातल्या लोकांना म्हणे हिंदीसुद्धा येत नाही… सगळे बंगालीच बोलतात… आपल्याला तर हिंदीही धड बोलता येत नाही… बरं आहे ना… विहिणबाई घरी आल्या की काही बोलायचं कामच नाही…" सुनीताताईंच्या या वाक्यावर सगळे खळखळून हसले. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मधुकरराव दार उघडायला गेले.


"अरे वा! वा! वा! अलभ्य लाभ…! या! वेलकम!" मधुकरराव दारातच उभं राहून बोलत होते.


"मधुराच्या आई, पाहिलं का कोण आलंय ते! एकदा आपलं घड्याळ मागे पडलं का बघून घ्या… एक वेळ घड्याळ मागे पडेल पण सूर्य कसा मागेच राहील बरं… अजून अंधार पडला नाहीये म्हणून म्हटलं." मधुकरराव


"काय काका! खेचताय का आमची?" रीमा हसतच म्हणाली. रीमा आणि मधुरा आज कधी नव्हे ते दुपारीच घरी आल्या होत्या.


"हो ना, बघ तर… अलभ्य लाभ म्हणे." मधुरा


दोघी आत आल्या, हॅन्डवॉश करून दोघी सोफ्यावर बसल्या.


"तुम्ही सकाळी गेलेल्या रात्रीच येता ना म्हणून म्हटलं." मधुकरराव


"हो, म्हणूनच तर लवकर आलो आज… तसंही ओ.पी.डी.त पेशंट नव्हते. आय.पी.डी.तले सगळेच स्टेबल होते. आपलं फिरतं रुग्णालयात आज गिरीजा मॅडमच्या असिस्टंटचा नंबर होता, मग काय… आज वेळच वेळ आणि आजचा सगळा वेळ तुमच्यासाठी…!" मधुरा बोलत होती. तेवढ्यात नीति आतून धावतच आली.


"मम्मा! आज तू लवकर आली! मग चल ना आपण गार्डनमध्ये जाऊ… किती दिवस झालेत गं आपण गेलोच नाही गार्डनमध्ये…" नीति मधुराच्या गळ्यात पडत लाडीकपणे बोलली.


"सगळं प्रेम मम्मालाच ना… मी जाते मग घरी." रीमा मुद्दामच नीतिला चिडवत होती. रीमाला पाहून नीति तिच्याजवळ गेली. गार्डनमध्ये जाण्यासाठी आता तिचं रीमाला मस्का लावणं सुरू होतं.


"बरं… जाऊ गार्डनमध्ये; पण एका अटीवर… तुझी नानी तिच्या हातचा फक्कड चहा पाजेल तरच." मधुराचं वाक्य पूर्ण व्हायलाच उशीर, राधिकाताई चहा घेऊन आल्या होत्या. नीतिच्या हट्टापायी सर्वजण गार्डनमध्ये गेले. गार्डनमधल्या लॉनवर सगळे चटई टाकून बसले होते. नीति तिथले खेळणे खेळण्यात गुंग झाली होती. मधुकरराव, राधिकाताई, सुनिताताई, मधुरा आणि रीमा यांच्या गप्पा मस्त रंगल्या होत्या. बोलता बोलता मधुकररावांनी लग्नाचा विषय काढला.


"मधुरा… रीमा… लग्नाचं काही ठरवलं का तुम्ही…? आमच्या दोन्ही जावयासोबत काही बोलणं झालं का?" मधुकरराव


"हो ना, एकदा बोलून ठरवून घ्या बरं… म्हणजे लग्न कुठे करायचं? कसं करायचं? केव्हा करायचं? त्यानुसार सगळी तयारी वगैरे बघावं लागेल ना." सुनिताताई


"आणि वय झालं गं आता आमचं… आमचे डोळे मिटायच्या आत तुमचं लग्न झालं म्हणजे बरं होईल." राधिकाताई बोलत होत्या तेवढ्यात नीति तिथे आली.


"ए नानी, कोणाचं लग्न गं? मम्माचं…? ए मम्मा, मग तू पण लग्न होऊन दुसऱ्या घरात जाशील का? मी पाहिलंय ना, टी. व्ही. मध्ये, त्या हिरोईनचं लग्न होतं आणि मग ती दुसऱ्या घरी जाते… साडी नेसून, खूप सारे दागिने घालून स्वयंपाक करते, तू तर साडी नेसतंच नाही… मग कसं करशील? आणि तुझं हॉस्पिटल मग…? आणि मला नेशील ना सोबत? मी तुला सोडून कुठ्ठे जाणार नाही…" बोलता बोलता नीतीचा चेहरा रडवेला झाला.


"कुठे नाही जाणार मम्मा तुला सोडून! कळलं? आपण डॅडालाच इथे आणू, चालेल ना?" रीमा नीतिला जवळ घेत बोलली.


"हो! य्ये…! आपण डॅडाला इकडे बोलावू." नीतीच्या चेहऱ्यावर हास्य फुललं.


"चल मग, आता आपण नवीन खेळणे खेळू, ते बघ तिकडे आहेत… आजकाल आजीसोबत जास्तच टी.व्ही. बघायला लागलीस हां तू…टी. व्ही.बघून डोळे काळे होतील आणि मोठा भिंगाचा चष्मा लागेल तेव्हा कळेल तुला." रीमा नीतिला घेऊन गेली. जाता जाता तिच्या आणि नीतिच्या गोष्टी सुरू होत्या.


"एवढूशी पोर पण अगदी बरोबर बोलली… खरंच नुसतं लग्न कर म्हणणं किती सोपं आहे ना… कितीतरी असे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मिळत नाहीयेत…" मधुरा स्वतःशीच पुटपुटली.


"मधुरा, काय विचार करतेय ?" मधुकरराव


"बाबा, नीति किती बरोबर बोलली ना… लग्न तर होऊन जाईल; पण हॉस्पिटलचं कसं होईल…? आता दुसरीकडे परत सुरुवात करणं सोपं नाहीये… गुंता आहे सगळा… जेवढा सोडवायला जावा तितका अजूनच वाढत जातो." मधुरा


"अगं मग एकदा बोला सगळे मिळून…काही ना काही तर रस्ता सापडेल की…" राधिकाताई बोलल्या.


इतक्यात मधुराला हॉस्पिटलमधून फोन आला. मधुरा ज्युनिअर डॉक्टरला योग्य त्या सूचना देत होती. तेवढ्यात रीमा आणि नीति तिथे आल्या. मधुराच्या एकंदरीत बोलण्यावरून हॉस्पिटलमधून फोन आहे, हे रीमाला कळलं होतं. 


"मधुरा, एनीथिंग सिरीयस?" रीमा


"हम्म…पेशंट आलीये एक… तसाही आज माझा कॉल डे आहे. मी जाऊन येते." मधुरा


"मी पण येते, दोघीही जाऊ" रीमा


"तुम्ही जा हवं तर हॉस्पिटलमध्ये… आम्ही टॅक्सीने जातो घरी." मधुकरराव


"तुम्हाला घरी सोडतो आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये जातो… रस्त्यातच तर घर आहे, फारसा उशीर होणार नाही." रीमा 


राधिकाताई, मधुकरराव, सुनिताताई आणि नीतिला सोडून रीमा आणि मधुरा परत हॉस्पिटलमध्ये गेल्या. नेहमीप्रमाणे एक नवीन आवाहन हॉस्पिटलमध्ये त्यांची वाट बघत होतं. त्या दोघी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या तर हॉस्पिटलचं चित्र अगदी पालटलं होतं… रिसेप्शन युनिटची पूर्ण तोडफोड झालेली होती… खिडक्या तोडल्यामुळे सगळीकडे काचा विखुरलेल्या होत्या. बाकीच्या रुग्णांचे नातेवाईक घाबरून एका कोपऱ्यात उभे होते.


क्रमशः

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all