मधुरीमा (पर्व-२) भाग-२

कथा मधुराची, कथा रीमाची, कथा सच्च्या मैत्रीची




मधुरीमा (पर्व-२)भाग-२


एक नामांकित डॉक्टर म्हणून आत्मविश्वासाने जगणारी रीमा आज गुन्हेगार म्हणून कोर्टाच्या आवारात उभी होती. पावसाने भिजलेली… तशीच कुडकुडत…


सुनिताताई आणि रोहित तिच्या मागे आले होते. सुनिताताई आपल्या लेकीच्या डोळ्यातलं वाचायचा निष्फळ प्रयत्न करत होत्या. 


"रीमा, अगं बोल गं… काहीतरी बोल… अशी गप्प गप्प राहू नकोस… हे बघ आम्ही आहोत तुझ्यासोबत… सांग बेटा काय झालं?" सुनिताताई आर्जवे करत होत्या. त्यांच्या डोळ्यातला पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता. रीमा मात्र शून्यात नजर लावून तशीच स्तब्ध उभी होती… तिच्या डोळ्यांत एक शुष्कता होती… फक्त शुष्कता!



त्याच वेळी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कुठेतरी…


रात्रीचे दोन वाजून गेले होते. दिवसभराच्या दगदगीनंतर मधुरा गाढ झोपली होती. अचानक मधुरा दचकून उठली… घामाने चिंब भिजली होती… खूप घाबरली होती… तिच्या हाता पायांना कंप सुटला होता… घशाला कोरड पडली होती… तिने बाजूला पाहिलं… नितीन अगदी गाढ झोपला होता. एव्हाना आपण स्वप्न बघत होतो याची जाणीव तिला झाली होती.


तिच्या घशाला कोरड पडली होती. पाणी पिण्यासाठी तिने बाजूच्या टेबलवर ग्लास शोधला पण ती आज झोपायच्या आधी नेमकं पाणी आणायला विसरली होती. ती एवढी घाबरलेली होती की उठून पाणी आणायची तिच्यात हिम्मत नव्हती. मधुरा बेडवरच बसली. पडलेलं स्वप्न आठवून तिचं मुसमुसणं सुरूच होतं. तेवढ्यात नितीनला जागी आली.


"मधु, काय झालं?" नितीन तिच्याजवळ बसत बोलला. नितीनला बघून मधुरा त्याच्या कुशीत शिरली आणि हमसुन हमसुन रडायला लागली. नितीन मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. थोड्यावेळाने मधुरा शांत झाली.


"नितीन, पुन्हा तेच स्वप्न पडलं रे… मी हॉस्पिटलमधून बाहेर जायला निघाले आणि तिकडे झाडाखाली… एका बाईकवर तोच माणूस बसला होता…  त्याने काळ्या रंगाचं हेल्मेट घातलं होतं आणि त्या हेल्मेटला काळी काच लावलेली होती… मी निघाले आणि तो माणूस माझा पाठलाग करायला लागला होता… मी खूप फास्ट गाडी चालवत होते… तो माणूस माझ्या मागेच होता… नितीन… तो माणूस मला मारून टाकेल रे…" मधुरा अजूनच रडायला लागली.


"मधु… स्वप्न होतं ते… शांत हो बरं…" नितीन


"हो… स्वप्न होतं… पण आपण भारतात होतो तेव्हाही मला तो माणूस दिसायचा… रीमा सोबत असली की नेमका तो माणूस माझ्या मागे यायचा नाही… मी तुम्हा लोकांना सांगत होते… पण तुम्ही ते सर्व माझे भास ठरवले…" मधुरा


"ठीक आहे, बरोबर आहे तुझं… आता आपण कुठे आहोत? एवढ्या दूर, हजारो किलोमिटर दूर तो तुझा पाठलाग करत येईल का? नाही ना… स्वप्न पाहिलंस तू… आता असं रडू नको बरं. थांब मी तुझ्यासाठी पाणी आणतो." नितीन


"मी पण येते तुझ्यासोबत, मला भीती वाटतेय… नितीन, माझं डोकं खूप दुखतंय रे." मधुरा


"मधु, तुला आताच काय म्हटलं मी ,आत्ता आपण कुठे आहोत…? घाबरायचं कशाला? ओके… चल, आपण दोघे पाणी पिऊ… कॉफी घेशील का? बरं वाटेल तुला…" नितीन बोलतच तिथून उठला आणि दोघे स्वयंपाकघरात जायला निघाली. जाता जाता मधुरा नितीच्या रुममध्ये डोकावली. नीति अगदी गाढ झोपली होती.


नितीनने पाण्याचा ग्लास दिला आणि मधुराने गटागट पाणी पिलं. नितीन कॉफी बनवत होता. मधुरा तिथे अस्वस्थपणे फेऱ्या मारत होती.


"नितीन, एक वेगळीच बेचैनी जाणवतेय रे… " मधुरा


"स्वप्न पडलं ना म्हणून वाटत असेल." नितीन


"माहिती नाही… पण असं वाटतय काहीतरी बिघडलंय… काहीतरी चुकीचं होतंय… तिकडे भारतात सगळं नीट असेल ना? आई-बाबा बरे असतील ना रे? एक फोन लावू का? बोलूनच घेते…" मधुरा


"आता कशाला लावतेस फोन… त्यांना माहितीये ना इकडे मध्यरात्र असते म्हणून… उगीचच टेन्शन घेतील ते…" नितीन


"हो, बरोबर आहे तुझं… असं करते रीमालाच फोन लावते." असं म्हणत मधुराने रीमाचा मोबाईल लावला; पण रीमाचा फोन बंद येत होता. मधुराने हॉस्पिटलमध्ये फोन लावला; पण तिथेही नुसती रिंग वाजत होती… कोणीच फोन उचलत नव्हतं.


"काय झालं? लागला का फोन?" नितीनने कॉफीचा मग मधुरासमोर धरला.


"रीमाचा फोन बंद येतोय." मधुरा


"केस सुरू असेल काहीतरी. ओ. टी.त वगैरे असेल." नितीन


"हो असू शकते; पण मग हॉस्पिटलमध्ये कोणी का फोन उचलत नाहीये?" मधुरा चिंतेत होती.


"मधु, किती काळजी करशील. कॉफी घे… थंड होईल." नितीन बोलला आणि मधुराने मान डोलवली. कॉफी घेत घेत तिने टी. व्ही. सुरू केला आणि तिचं एक एक चॅनेल बदलणं सुरू होतं.


"आता एवढ्या रात्री तुला टी. व्ही. वर काय बघायचंय?" नितीन


"माहिती नाही… खूप अस्वस्थ वाटतंय… म्हणून काहीतरी असंच." मधुरा एक एक चॅनल बदलत होती. तेवढ्यात तिने एक भारतीय न्यूज चॅनेल लावलं. त्यावर हेड लाईन सुरू होती… "डॉक्टर बनी डायन…"


"या न्यूजवाल्यांना दुसरं काही कामच नसतं… काहीही हेडलाईन बनवतात… काय तर म्हणे डॉक्टर बनी डायन… रुग्णाचे नातेवाईक पण ना, अगदी रुग्ण मरायला टेकायला आला की डॉक्टरकडे आणतात आणि मग तो रुग्ण मेला की हे असलं काहीतरी बरळतात…" चिडतच मधुराने चॅनेल बदललं.


"अगं लाव तर ते चॅनेल… बघू तरी नेमकं मॅटर काय आहे ते." नितीन बोलला. 


"तुला पण ना, भारीच इंटरेस्ट असल्या गोष्टींमध्ये." मधुराने परत तेच चॅनेल लावलं. कोर्टाच्या आवारातून एक पत्रकार बातमी सांगत होता.


"आपण बघत आहात शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ, मधुरीमा हॉस्पिटलच्या सर्वेसर्वा डॉ. रीमा कानिटकर यांना अटक झालीये. स्त्री भ्रूण हत्या, मानवी अवयव तस्करी असे गंभीर आरोप त्यांच्यावर आहेतच तसेच आर्थिक गैरव्यवहार, रुग्णांसोबत हलगर्जीपणा असे आरोपही त्यांच्यावर आहेत. आता हे बघायचं आहे की न्यायालय त्यांना कोणती कठोर शिक्षा देणार?" पत्रकार बोलत होता. तेवढ्यात पोलीस रीमाला परत पोलीस व्हॅन मध्ये नेत होते. ते बघून सगळे पत्रकार तिकडे धावले.


"डॉ.रीमा… काय बोलाल यावर तुम्ही?" एक पत्रकार


"आता नेमकं तुम्हाला काय वाटतंय?" दुसरी पत्रकार


"मधुरीमा हॉस्पिटलच्या तुमच्या सहकारी डॉक्टर मधुरा कुठे आहेत? त्यांचाही या कटात समावेश आहे का?" अजून एक पत्रकार


"आम्ही असं ऐकलंय की त्या परदेशात जाण्याआधी त्यांनी मधुरीमाचे सगळे अधिकार तुमच्या स्वाधीन केले होते; या अधिकारांचा तुम्ही गैरवापर का केला?" अजून एक प्रश्न आला. रीमा कोणत्याच प्रश्नावर काहीच उत्तर देत नव्हती.


टी. व्ही. वरची ही बातमी बघून मधुरा आणि नितीन एकदम स्तब्धच झाले होते.


"नितीन, अरे हे काय? काय सुरू आहे हे सगळं…,?" मधुराच्या आवाजाला कंप सुटला होता.


"हो ना… रीमावर एवढे गंभीर आरोप! कसं शक्य आहे? रीमा असं काही करणं शक्यच नाही." नितीन


"नितीन, तो पत्रकार मानवी अवयव तस्करी म्हणत होता… तुला आठवतं नितीन… रुद्र… रुद्र यात पकडला गेला होता… कदाचित रुद्र तर परत आला नसेल ना…? पण तो कसा येईल? तो तर वेड्यांच्या इस्पितळात होता ना?" मधुरा घाबरून बोलत होती.


"नितीन, मला जावं लागेल भारतात परत… रीमाला गरज आहे आता माझी… या प्रकरणाचा मला छडा लावावाच लागेल… असं करते मी उद्याच हॉस्पिटलमध्ये बोलून सरळ तात्काळ राजीनामा देऊन देते." मधुराला काहीच सुचत नव्हतं.


"आपण जाऊ, मी इथे विद्यापीठात बोलून घेतो… तिकीटाचंही बघावं लागेल." नितीन


"तू आणि नीति इथेच रहा… काही दिवसांचाच प्रश्न आहे… एवढ्या नामांकित विद्यापीठात तुला सन्मानाने लेक्चरर्स घ्यायला बोलावलंय… या गोष्टींच्या मागे लागून तू हे घालवू नको सगळं…" मधुरा


"अगं, पण तू एकटी काय करशील…?" नितीन


"नितीन, ही लढाई मधुरीमाची आहे… आणि यात जो कोणी असेल त्याला तर आता तर मी सोडणार नाही…" मधुराच्या डोळ्यांत संताप होता.


मधुराला भारतात परत जाण्यासाठी सहा दिवसांनंतरचं तिकीट मिळालं होतं. हे सहा दिवस मधुराला सहा युगासारखे वाटले. दरम्यान तिचं सुनिताताईंसोबत फोनवर बोलणं झाल होतं; पण त्यांनाही या गोष्टीबद्दल विशेष काहीच माहिती नव्हती. या काळात न्यायालयाने रीमाच्या केसची पुढची तारीख दिली होती आणि तोपर्यंत रीमाला पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. 


नितीन आणि नीति मधुराला सोडायला विमानतळावर आले होते. मधुराने एकटीने भारतात परत जाऊ नये असंच नितीनला वाटत होतं पण मधुराची जिद्द त्याला माहिती होती म्हणून त्याने याविषयावर वाद घालणं टाळलं होतं.


चेक इन करून मधुरा विमानात बसली. राहुन राहुन तिला रीमावर लागलेले आरोप आठवत होते… मानवी अवयव तस्करी… तिला आठवत होता रुद्र… \"रुद्रचा आणि या गोष्टीचा काही संबंध असेल ?\" या विचाराने तिचं डोकं अक्षरक्षः फुटायाला लागलं होतं. मधुराचं विमान भारताच्या दिशेने झेपावलं आणि तिचं मन मात्र भूतकाळात…


क्रमशः

©® डॉ. किमया मुळावकर


🎭 Series Post

View all