मधुरीमा पर्व २ (भाग २८)

कथा मैत्रीची
मधुरीमा पर्व २ (भाग २८)

हॉस्पिटलमधून मधुरा घरी पोहोचली. तिने बॅगमधून मोबाईल काढला. मोबाईल आलेल्या मिसकॉलची लिस्ट ती बघत होती. त्यात तिला एक अनोळखी नंबर दिसला.

‘कुणाचा नंबर असेल हा?’ मधुरा विचार करत होती.

“मधु, अगं लक्ष कुठंय तुझं. नितीचा ताप उतरला नाही.” राधिकाताई


“अगं हो, तेच काम करत होते. बालरोगतज्ञांकडं घेऊन जाते तिला. त्यांनाच फोन लावत होते.” मधुरा


“अगं, डॉक्टरकडं न्यायची काय गरज आहे, तूच देतेस ना औषध तिला नेहमीच.” मधुकरराव


“हो बाबा, पण तरी नेऊन आणते. उगीच माझ्या हातून काही चुकायला नको.” मधुरा म्हणाली आणि नितीला घेऊन बालरोगतज्ञांकडं गेली.


“हिला काय झालं? आज कधी नाही ते नितीला दुसऱ्या डॉक्टरकडं घेऊन गेली.” राधिकाताई


“जाऊ दे गं, तिचीच मनस्थिती ठीक नसेल. सकाळीच मुंबईवरून आलीये आणि दिवसभर हॉस्पिटलमध्ये दगदग… नेऊ दे तिला. आई म्हणून जगू दे. डॉक्टर तर काय ती रोजच असते.” मधुकरराव म्हणाले.

“हो तेही आहेच म्हणा.” राधिकाताई म्हणाल्या आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या सूचना स्वयंपाकवाल्या मावशींना द्यायला आत निघून गेल्या.

मधुरा नितीला घेऊन हॉस्पिटलमधून परत आली. तिनं स्वतःच्या हातांनी नितीला जेवू घातलं, तिला औषध दिलं आणि तिला झोपी घालता घालता स्वतः झोपली.


दुसरा दिवस उजाडला. मधुरा सकाळी उठली. उठल्या उठल्या तिनं मोबाईल पाहिला.


‘कमाल आहे, हॉस्पिटलमधून एकही फोन नाही!’ मधुरा आश्चर्यानं पुटपुटली आणि तयार होऊन बाहेर आली. डायनींग टेबलवर मधुकरराव आणि राधिकाताई चहा घेत बसले होते.


“बरं वाटतंय का?” राधिकाताई

“हो आई, ताप नव्हता रात्री. झोपलीये शांत. दोन दिवस शाळेत नको पाठवू तिला.” मधुरा


“आणि तुला? बरं वाटतंय ना?” राधिकाताई खुर्चीवरून उठत म्हणाल्या.


“हो, गं. मला का विचारतेय?” मधुरा


“अगं चेहरा कसा दिसत होता तुझा.” राधिकाताईंनी मधुरासमोर चहाचा कप ठेवला.


“थकवा गं… जाऊ दे… रात्री नीट झोप झाली तर फ्रेश वाटतंय.” मधुरा निवांतपणे चहा घेत होती.


“आज एवढं शांततेत बसलीयेस. रात्री पण हॉस्पिटलमध्ये कॉल वगैरे आला नाही.” मधुकरराव


“आता डॉक्टरांची संख्या वाढलीये ना… म्हणून मग रिलॅक्स.” मधुरा मंद हसली. शांतपणे नाश्ता वगैरे करून, नितीला खाऊ पिऊ घालून सकाळची औषधी देऊन मधुरा हॉस्पिटलमध्ये पोहोचली.


“मॅडम, राउंड घ्यायचा ना?” मधुरा रिसेप्शनवर दिसल्या दिसल्या कांचन सिस्टरनं तिला विचारलं.


“माझा पेशंट नाहीये ना ऍडमिट, मग कशाला राउंड. ओ.पी. डी. सुरू करूया.” मधुरा बोलत तिच्या चेंबरमध्ये आली.

“कांचन दहा मिनिटांनी पेशंटला पाठव आणि कुणालाही आत पाठवू नकोस.” रीमा मागून येत म्हणाली. कांचन बाहेर गेली.


“मधु, ही काय पद्धत झाली का? काल तुझी नाईट शिफ्ट होती ना?” रीमा तावाने म्हणाली.


“हो, एकही नवीन पेशंट आला नाही.” मधुरा


“अगं पण हॉस्पिटलमध्ये तर पेशंट होते ना.” रीमा चांगलीच चिडली.


“मग, मी सांगितलं होतं, एकही माझा पेशंट ऍडमिट नव्हता. आणि तसेही जे पेशंट ऍडमिट आहेत त्यांना इतक्या विचित्र प्रकारे ट्रिटमेंट देत आहेत. ते सगळं माझ्या तत्वात बसतच नाही.” आता मधुराही चिडली होती.


“हे बघ मधु, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते.” रीमा


“नक्कीच. आपल्या दोघींचीही वेगळी आहेच. पण आपण एकमेकींच्या विचारांचा आदर करतो… रादर करायचो.” मधुरा

“करायचो! म्हणजे?” रीमा


“हे बघ रीमा, आपण एक अनुभवी डॉक्टर आहोत आणि असं एखाद्या नवशिक्यासारखं आपण भांडत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. प्लिज.” मधुरा म्हणाली आणि रीमा चिडून तिच्या केबिनमधून बाहेर निघून गेली.

“मॅडम…” थोड्यावेळात कांचन सिस्टरनं दरवाज्यावर नॉक केलं.


“कांचन, पाठव पेशंटला.” मधुरा डोकं धरून बसली होती.


“मॅडम, तुमच्याकडं पेशंट नाहीयेत सध्या. ही कॉफी घ्या. बरं वाटेल.” कांचननं कॉफीचा मग टेबलवर ठेवला.


“थँक्स कांचन, ह्याची खूप गरज होती.” मधुरानं कॉफीचा एक घोट घेतला. कांचन तिथंच रेंगाळली होती.


“काही बोलायचंय का?” मधुरा


“नाही मॅडम, येते मी.” कांचन चेहऱ्यावरचे भाव लवपत पटकन बाहेर निघून गेली.


‘काहीतरी आहे. कालपासून कंचनला काहीतरी सांगायचंय… पण मग ही सांगत का नाहीये…’ मधुरा पुन्हा विचारात पडली.


क्रमश:
©® डॉ. किमया संतोष मुळावकर



🎭 Series Post

View all