मधुरीमा पर्व २ (भाग २६)

कथा मैत्रीची
मधुरीमा पर्व २ (भाग २६)

“जायलाच हवं का?” नितीनने मधुराला मागून मिठी मारली. मधुरा बेडरूममध्ये तिचं सामान भरत होती. लग्नानंतर मधुरा मुंबईला आली होती. तिच्या पंधरा दिवसांच्या सुट्ट्या संपत आल्या होत्या.

“काय करू? नाईलाज आहे.” मधुरा मागे वळली. नितीनने मिठी अजूनच घट्ट केली.

“थँक्स नितीन!”

“कशासाठी?”

“थँक्स फॉर एव्हरीथिंग. आज तुझ्यामुळं माझ्या आयुष्यात हा दिवस आहे.”


“खरं सांगू मधुरा, तुला अगदी पहिल्यांदा पाहिलं होतं ना तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो होतो… मध्यंतरी काही काळ असा गेला, मला वाटलं की मी तुला गमावून बसलोय. पण किती भाग्यवान आज तू माझ्या सोबत आहेस.”

“आणि मी पण भाग्यवानच आहे. नितीन, आईंचं आणि नीतीचं किती मस्त सूत जुळलं ना रे. मला थोडी काळजी वाटत होती.”


“नीती आहेच तेवढी गोड… खरं सांगू तुझ्यापेक्षा जास्त मी तिलाच मिस करणार आहे.” नितीन बोलत होता. त्याच्यासोबत बोलत बोलत मधुराने राहिलेलं सामान भरलं. रात्रीच्या ट्रेननी मधुरा आणि नीती परत निघाल्या. दुसऱ्यादिवशी दोघी घरी पोहोचल्या. राधिकाताईंनी दोघींचं औक्षण केलं.


“हे कशाला गं आई?” मधुराला आश्चर्य वाटलं.


“लग्नानंतर पहिल्यांदा घरी आलीस म्हणून.” राधिकाताईंनी दोघींवरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. मधुरा घरात आली. तिने चहा नाश्ता घेतला, आणि ती फ्रेश झाली.


“मधु, कुठं निघालीस?” राधिकाताई मधुराला तयार झालेलं बघून म्हणाल्या.


“अगं कुठं म्हणून काय विचारतेय? हॉस्पिटलमध्ये.” मधुरा म्हणाली.


“आताच प्रवास करून आलीस. उद्या जा हवं तर किंवा दुपारी जा. थकली असशाली, आराम कर जरा.” राधिकाताई


“नको गं आराम वगैरे, एवढी काही मी थकली नाहीये. जाऊन येते. बरं आई, मी नसताना रीमाने चक्कर मारली का गं?”

“नाही गं. एरव्ही कधी तू गावाला गेलीस तर रीमाची न चुकता चक्कर व्हायची. दोन चार दिवसांत एखादा फोन व्हायचा. ह्यावेळेस मात्र तिचा फोनही आला नाही आणि तीही.”


“बिझी असेल हॉस्पिटलमध्ये. जाऊ दे. मी जाऊन येते. मलाही हॉस्पिटलमध्ये गेल्याशिवाय चैन पडणार नाही. आई, ऐक ना… नीतीला आज राहू दे घरी, पण उद्यापासून मात्र तिची शाळा नियमितपणे सुरू बरं का.” मधुरा गाडीची चावी घेत म्हणाली. कार काढून मधुरा हॉस्पिटलच्या दिशेनं निघाली.


‘पंधरा दिवसांत सगळं वेगळंच वाटतंय, नाही का? की माझ्याच मनात तसा विचार येतोय?’ मधुराला स्वतःवरच हसू आलं. नितीनसोबत घालवलेले तर मंतरलेले क्षण आठवतच मधुरा हॉस्पिटलमध्ये पोहोचली.


‘मधुरीमा’ हॉस्पिटलची पाटी वाचूनच तिचा उर अभिमानाने भरून आला.


पार्किंगमध्ये गाडी पार्क करून मधुरा आत जायला निघाली. तितक्यात तिला हॉस्पिटलच्या बाहेर अचानक गर्दी जमा झालेली दिसली. हॉस्पिटलच्या वेटिंग एरियात काही बायकांचा आक्रोश सुरू होता. त्या बायकांना बघून बाकी ओ पी डी साठी आलेल्या बायकाही भेदरून गेल्या होत्या. मधुरा काय झालं असेल हा विचार करत आत येतच होती. तितक्यात स्ट्रेचरवर पांढऱ्या कपड्यात लपेटलेली बॉडी घेऊन हॉस्पिटल स्टाफ बाहेर आला. त्या बॉडीला बघून त्या बायकांचा आक्रोश अजूनच वाढला. स्टाफने स्ट्रेचरवरून ती बॉडी ऍम्ब्युलन्समध्ये ठेवली. बाकी गर्दीही त्यामागे निघून गेली.


‘बापरे! काय झालं असेल? एवढ्या वर्षांत ह्या हॉस्पिटलमध्ये असा प्रसंग एखाद दोनवेळा आला असेल… पेशंट क्रिटिकल असेल तर आय.सी. यु. त लगेचच पाठवतो की… मग नेमकं काय झालं असेल? रीमाने पेशंट का पाठवला नसेल?’ मधुराच्या डोक्यात शंकांचं काहूर माजलं होतं. तिची नजर रीमाला शोधत होती. तेवढ्यात तिला कांचन दिसली.


“कांचन सिस्टर…” मधुराने हाक मारली.


क्रमशः
© डॉ. किमया संतोष मुळावकर

🎭 Series Post

View all